1. कृषीपीडिया

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे असं बोलकं वर्णन केल्या जाते

त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे असं बोलकं वर्णन केल्या जाते

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचे असं बोलकं वर्णन केल्या जाते

त्याच भाषेत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय, त्याच्या पाठोपाठ म्हाताराही पडून गेला आहे. आता सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल. हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत. 

बहुधा प्रत्येक पाऊसनक्षत्रासाठी गावाकडे स्वतंत्र म्हणी आहेत. पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती (स्वाती नक्षत्रातला पाऊस पिकाला खर्‍या अर्थाने उभारी देतो, रूपरंग देतो. त्यामुळे या नक्षत्रात पाऊस झाला तर खर्‍या अर्थाने माणिक मोती पिकतात)

पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा (चित्रा नक्षत्रातला पाऊस बिनभरवशाचा असतो. पडला तर इतका पाऊस पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही, अगदी वाडग्यात काढून ठेवलेलं उष्टावण असो की ताजं जेवण असो ते एकतर सादळून तरी जातं नाहीतर बेचव तरी होऊन जातं. म्हणून मग त्याची चव जाते. मग त्याचं वर्णन भात खाईना कुत्रा अशा शेलक्या शब्दात आलंय)

पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. काही खेड्यात गरदाडा असा ही शब्द आढळतो. त्याचा अर्थ खबदाड, भागदाड असा होतो. म्हणजे काय तर हा पाऊस इतक्या ताकदीने पडतो की घरच्या माळवदाला भगदाडे पडावीत. एकंदर मतीतार्थ असा की आर्द्राचा पाऊस पडझड करून जातो.

पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं),

आता आश्लेषा नक्षत्र सुरु आहे त्यासाठीची म्हण अशी आहे - मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा. म्हणजे काय ? 

आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत ! 

पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख ( असं का म्हटलंय - पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं )

पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा. (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे) 

पडता हस्ती कोसळतील भिंती ही साधी सुलभ म्हण आहे. हस्त नक्षत्रातला पाऊस दिवसभर जरी कोसळला नाही तरी त्याचा मारा इतका ताकदवान असतो की भिंती कोसळाव्यात. खेड्यापाड्यातली माय मराठी निसर्गाच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं मत नोंदवते मग ते फटकळ असो वा काहीसं अश्लील, त्यात वास्तव झळकतंच            

गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो. शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लेहजा ढंगदार आणि न्यारा आहे. गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही.

English Summary: This is how the rain stars are described in the village Published on: 30 April 2022, 10:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters