अगदी कमीत कमी गुंतवणूक आणि हातात येणारे उत्पन्न जर जास्त असेल तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. विविध पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकरी हाच प्रयत्न करत असतात. परंतु बरेच पिकांमध्ये गुंतवणूक जास्त असते परंतु त्यामानाने जे काही उत्पन्न किंवा एकूण नफा मिळतो तो खूपच कमी असतो. आपण या लेखामध्ये अशाच एका पिकाची माहिती घेणार आहोत ज्याकडे शेतकरी हव्या त्या प्रमाणात लक्ष देत नाही. ते पिक म्हणजे गवती चहा हे होय.
गवती चहाची बाजारपेठ
गवती चहापासून मिळणाऱ्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर यापासून जे काही तेल काढले जाते त्याला बाजारपेठेमध्ये खूप मोठी मागणी आहे. याच्या तेलाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योग तसेच तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या मध्ये मोठ्या प्रमाणात होतो.
या कारणामुळेच गवती चहाला बाजारपेठेत खूप मागणी आहे. या पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुष्काळग्रस्त पट्टा असेल तर अशा ठिकाणी याची लागवड खूप चांगला नफा देऊ शकते. जर एका माहितीचा विचार केला तर गवती चहा लागवडीतून एका हेक्टर क्षेत्रात तुम्ही एका वर्षात चार लाख रुपये पर्यंतचा निव्वळ नफा मिळवू शकतात.
नक्की वाचा:Cultivation: 'या' वनस्पतीची करा एकदा लागवड, कमवाल लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
गवती चहा लागवडी मधील फायदेशीर गोष्टी
आपल्याला माहित आहे कि, प्रत्येक पिकाला खतांची आवश्यकता असते. परंतु गवती चहाला कुठल्याही प्रकारच्या खताची आवश्यकता भासत नाही.
दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राण्यांकडून नष्ट करण्याचा या पिकाला धोका नसतो व तिसरी गोष्ट महत्त्वाची हे सांगता येईल की एकदा लागवड केली तर पाच ते सहा वर्ष सतत उत्पादन चालू राहते.
गवती चहाची लागवड आणि काढणी
गवती चहाच्या लागवडीसाठी सर्वोत्तम काळ म्हणजे फेब्रुवारी ते जुलै हा आहे. तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर वर्षातून तीन ते चार वेळा याची काढणी म्हणजेच कापणी करता येते.गवती चहा पासून जे काही तेल काढले जाते त्या तेलाची किंमत 1000 रुपये ते 1500 रुपये प्रति लिटर आहे.
लागवडीनंतर गवती चहा ची पहिली कापणी तीन ते पाच महिन्याच्या दरम्यान केली जाते. गवती चहा कापणीसाठी तयार आहे की नाही हे माहीत करून घेण्यासाठी ते फोडून त्याचा वास घ्यावा. जर त्याचा वास तीव्र स्वरूपाचा आला तर समजून घ्या की गवती चहा कापण्यासाठी तयार आहे.
गवती चहा मिळणारे आर्थिक उत्पन्न
एका हेक्टरमध्ये गवती चहाची लागवड केली तर सुरुवातीला वीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो. एकदा लागवडीसाठी हा खर्च केल्यानंतर वर्षातून तीन ते चार वेळा काढणी करता येते.
गवती चहापासून एका हेक्टर मध्ये वर्षभरात सुमारे तीनशे पंचवीस लिटर तेल निघते. या तेलाची बाजारपेठेतील किंमत प्रति लिटर 1200 ते 1500 रुपये आहे. यानुसार हिशोब केला तर हेक्टरी चार ते पाच लाख रुपये मिळणे शक्य आहे.
Share your comments