वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये जास्त करून शेतकरी गिलके, कारले,काकडीसारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. परंतु वेलवर्गीय फळभाजी पिकांमध्ये दोडका हे पिक खूप महत्त्वपूर्ण असून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते खूप लाभदायी आहे. भारताच्या अनेक ठिकाणी दोडका लागवड केली जाते. तसे पाहायला गेले तर दोडका हे भाजीपाला पीक शेतकऱ्यांना एक आर्थिकदृष्ट्या फायद्याचे पीक आहे. या लेखात आपण दोडका लागवडीच्या बाबतीतल्या महत्वाच्या काही बाबी समजून घेऊ.
दोडका लागवडीतील महत्त्वाच्या गोष्टी
1- लागवडीआधी हवामानाचा विचार- समशीतोष्ण व कोरडे हवामान या पिकासाठी उत्तम असून कमी तापमान आणि जास्त आर्द्रता या पिकास मानवत नाही. 25 ते 35 अंश सेंटिग्रेड तापमान दोडका पिकासाठी उत्तम आहे. म्हणून लागवड करण्याआधी हवामानाचा विचार खूप महत्त्वाचा आहे.
2- लागणारी जमीन- लागवड करायचे ठरले तर जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी कसदार निवडावी. खारवट जमिनीत लागवड करणे टाळावे व जर काळी जमीन असेल तर जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जर 50 टक्क्यांच्या वर असेल तर अशा जमिनीत देखील दोडका लावू नये. म्हणून जमिनीची देखील योग्य निवड महत्त्वाची आहे.
3- लागवडीचा कालावधी आहे खूप महत्त्वाचा- जर लागवड करायची असेल तर जून-जुलैमध्ये खरीप हंगामासाठी आणि जर उन्हाळी लागवड करायचे असेल तर जानेवारी ते मार्च हा कालावधी उत्तम आहे.
नक्की वाचा:Organic Farming: सेंद्रिय भाजीपाला महाग का होतोय? कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल
4- पूर्वमशागत- लागवड करण्याआधी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून तणांचे अवशेष वेचून जमीन स्वच्छ करणे गरजेचे असून कंपोस्ट खत टाकने देखील महत्त्वाचे आहे.
5- लागवड पद्धत- चांगली मशागत करून झाल्यानंतर 120 ते 150 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडून लागवड करता येते.दोडक्याचे बी लागवडी आधी पाण्यात सहा तास भिजत ठेवून वरंब्याच्या एका बाजूवर बियाणे 90 सेंटिमीटर अंतरावर तीन चार बिया टाकून लागवड करावी.
खरीप हंगामामध्ये गादी वाफ्यावर लागवड केल्यानंतर तीन आठवडे झाले की रोपांची विरळणी करून एका जागेवर फक्त एक निरोगी रोप ठेवावे.
6- खत व्यवस्थापन-दोडका पिकासाठी खतांचे व्यवस्थापन करताना जर माती परीक्षण केलेले असेल तर खूप उत्तम ठरते.परंतु सर्वसाधारणपणे एका एकर क्षेत्राचा अंदाज घेतला तर दोडक्यासाठी 30 किलो नत्र आणि 20-20 किलो स्फुरद आणि पालाश प्रत्येकी द्यावे.
एवढेच नाही तर पिक संपूर्ण तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. वेलींच्या आधारासाठी बांबू अथवा झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर केला तरी चालतो. जर शक्य असेल तर तारांवर देखील वेली पसरवून त्यापासून चांगले उत्पन्न मिळते.
7- पाणी व्यवस्थापन- ठिबक सिंचनाचा वापर करणे खूप गरजेचे असून याद्वारे पाणी देताना आजूबाजूची पाने कोरडे राहतात यामुळे झपाट्याने वाढ होते तसेच पाणी देताना खोडाचा देठ भिजणार नाही याची काळजी घ्यावी.
हिवाळ्यात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळी पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये सकाळी नऊच्या आधी पाणी देणे गरजेचे आहे.
8- दोडक्याची काढणी- साधारणतः 60 दिवसांनंतर हे पीक फुलोरा अवस्थेत येते व त्यानंतर बारा ते पंधरा दिवसात फळ तयार होतात. तेव्हा दोडक्याचे काढणी कराल तेव्हा कोवळ्या फळांची तोडणी करावी व तोडणी दोन ते चार दिवसांच्या अंतराने केलेली चांगली असते.
हे ओळखण्यासाठी नखानी फळावर हळूच दाबल्यावर व त्याचे व्रण पडल्यावर फळे कोवळी आहेत असे समजावे. साधारणतः प्रति हेक्टर सात ते दहा टन उत्पादन मिळते.
Share your comments