लातूर - जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शेतीसाठी सुपर फॉस्फेट खताचे फायदे पाहता याच खताचा वापर वाढवावा असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने व कृषि विकास अधिकारी सुभाष चोले जिल्हा परिषद, लातूर यांनी केले आहे.
मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिका यांच्या आधारे एकात्मीक अन्न द्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकरी बांधव जागरुक होत आहेत. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी नंतर सर्वाधिक मागणी एसएसपी खताची होत आहे.
एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये फॉस्फरस, सल्फर, केंलशिअम तसेच कांही प्रमाणात सुक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकामध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरतो आहे.
एसएसपी खतामध्ये 16 टक्के स्फुरद व 11 टक्के गंधक असल्याने तेलबिया पिकासोबत कडधान्य पिकासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. स्फुरद घटक प्रथिने बनण्यासाठी मदत करतो आणि गंधक हा घटक तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत करतो. प्रथिने तेलाचे प्रमाण वाढल्याने पिकाचे उत्पादन वाढते.
सुपर फॉस्फेट खतात आता बोरॉन, झिंक हे घटक देखील टाकून बाजारात उपलब्ध् केले जात आहे. यामुळे पिकास कीड रोग प्रतिकारक शक्ती मिळण्यास, उत्पादन वाढण्यास मदत होते. सुपर फॉस्फेट खत हे कॉम्प्लेक्स खताच्या तुलनेत खुप स्वस्त आहे. परंतू त्यापासून मिळणारे फायदे वाखाणण्याजोगे आहेत. हे खत आपल्या देशात तयार होते व कोणत्याही कृषि केंद्रात सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. DAP.10:26:26, 12:32:16, 15:15:15, 19:19:19, 20:20:00 या सारखे कॉम्प्लेक्स खत आयात करावे लागते म्हणून महाग असते, त्यासाठी शासनाचे परकीय चलन खर्च होते.
शिवाय त्यावर अनुदान म्हणून मोठी रक्कम शासनास दयावी लागते तेंव्हा ते शेतकऱ्यांच्या आवाक्यात येतात, त्या तुलनेत सुपर फॉस्फेट खत केंव्हाही स्वस्तच म्हणावे लागेल.
Share your comments