भारतात होते विविध प्रकारची शेती ; जाणून घ्या! काय आहेत फायदे

03 November 2020 03:26 PM By: KJ Maharashtra


आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सुमारे ६५-७०% जनता शेती अथवा शेती निगडित व्यवसायांवर अवलंबून आहे.शेतीतून माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजा भागवल्या जातात.उत्पादन खर्च, विक्री खर्च, उत्पादनातील अवास्तव वाढ किंवा घट, बाजारपेठेची मागणी, जमिनींच्या किमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे उद्देश व प्रकार निश्चित केले जातात. त्यांची थोडक्यात माहिती घेऊ-

 1) उदरनिर्वाहासाठीची शेती :

भारतातील बरेच शेतकरी शेतीकडे ‘नफ्यासाठी शेती’असे पाहत नाही. यात शेतीचे लहान लहान तुकडे विखुरलेले असतात.बहुधा शेतकरी शालेय शिक्षण कमी असलेला असतो.योग्य बियाणे तसेच माती परीक्षणाच्या अहवालानुसार खत-पाण्याचा वापर केला जात नाही.शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत बहुधा नसतो. सर्व कुटुंब शेतात राबते.शेतीची कामे हातानेच केली जातात.पर्यायाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण अत्यल्प असते.

2) फिरती शेती :

 या पद्धतीत जंगलांचा काही भाग तेथील झाडे, झुडपे तोडून व जाळून साफ करतात. या जमिनीवर मिश्र पद्धतीने अथवा स्वतंत्रपणे वेगवेगळी पिके घेण्यात येतात. दोन किंवा तीन वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कस कमी झाल्याने उत्पादन घटते. म्हणून ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेती करण्यात येते. भारतात अशा प्रकारच्या शेतीची पद्धत ईशान्य भागातील आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश व मिझोराम, तसेच ओरिसा व आंध्र प्रदेश इ. राज्यांमध्ये आढळून येते. महाराष्ट्रात पश्‍चिम घाटात अशी शेती करतात. अशा शेतीमध्ये भात,नाचणी,वरी यांसारखी धान्ये तसेच काही प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. प्रत्येक राज्यात अशी शेती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. आसामध्ये ‘झूम शेती’ केरळमध्ये ‘पोणम्’ तर आंध्र व ओरिसा ‘पोडू’ या नावाने ओळखली जाते. या शेतीमुळे नैसर्गिक वने नष्ट होत असून मातीची धूपही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शासन अशा शेतीस प्राधान्य देत नाही.


3) बागायती शेती :

बागायती शेतीत मुख्यत: फळबाग, भाजीपाला, विविध फळे, फुलशेती यांचा समावेश होतो. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामग्रीचा वापरसुद्धा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकवणारा असल्याने खरीप व रब्बी हंगामाबरोबर उन्हाळी पिकेही घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारामाही पीक घेणे शेतकरी पसंत करतात. पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीनुसार बागायती शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फवारा सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.

फळबागांमध्ये महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यासारखी पिके घेतली जातात; तर कोकणात आंबा, चिकू, नारळ, सुपारी इ. पिकांचा समावेश असतो. भाजीपाल्याच्या शेतीत पाण्याची उपलब्धता व चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असणे आवश्यक असते. पूर्वीपासून फुलांचा वापर होणार्‍या ठिकाणांच्या आसपास फुलशेती थोड्याफार प्रमाणात केली जात असे. आता व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब केलेला आहे.

 


4) कोरडवाहू शेती :

 ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान ७५० मीमी. पेक्षा कमी आहे, अशी ठिकाणे कोरडवाहू शेतीप्रदेश म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्राचा फार मोठा भूभाग कोरडवाहू शेती प्रकारात समाविष्ट होतो. यामध्ये ज्वारी, बाजरी ही पिके घेतली जातात तर बोर,डाळिंब,सीताफळ यांसारख्या पिकांपासूनही शेतकर्‍यांना फायदा मिळवता येतो.

5) मिश्र शेती :

यात पिके व पशुधन याचा समावेश होतो.रोखविक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात तर पशुधन संवर्धनातून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करता येते. शेतीमध्ये लावलेल्या पिकांच्या उरलेल्या काडांचा जनावरांना वैरण म्हणून उपयोग करता येतो व जनावरांच्या मलमूत्राचा खत म्हणून उपयोग होऊ शकतो.अशा शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते व जोखीम कमी असते. अलीकडे यात यांत्रिकीकरणही येऊ लागले आहे. शेतात वेगवेगळी आंतरपिके,एकेरी अगर बहुविध पिके ही घेता येतात.

 

 

6) मत्स्यशेती :

मत्स्यशेतीसाठी शेतातील माती खोदून मोठ्या आकाराची पाण्याची तळी तयार करून त्यात मत्स्यबीज सोडतात. माशांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात क्षारपड, तसेच पाणथळ जमिनीत ज्यावेळी इतर पिके घेणे फायदेशीर नसते, त्यावेळी मत्स्यशेती फायद्याची होते. अलीकडे यात शेतकरी कोळंबीचे उत्पादनही घेतात.

7) एकात्मिक शेती :

एकात्मिक शेतीत एकाच शेतातून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेण्यात येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून ‘भात-मत्स्य एकात्मिक शेतीचे’ देता येईल. यात भाताच्या शेतात अडवून ठेवलेल्या पाण्यात मत्स्यपालन केले जाते. या प्रकारच्या शेतीमध्ये भातासारख्या मुख्य पिकाबरोबरच मत्स्यपालनातून अतिरिक्त उत्पन्न शेतकर्‍यास मिळते. यामुळे एखाद्या हंगामातील अयशस्वी होण्याचा धोका कमी होतो. मत्स्यपालनामुळे शेतीतील तण व भातावरील किडींवरील नियंत्रण ठेवता येते. तसेच मातीतील पोषकतत्त्वे ढवळली जाऊन भाताचे उत्पादन वाढते. भारतातील इशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय इ. राज्यांमध्ये या प्रकारची शेती केली जाते.

8) सेंद्रिय शेती :

शेतीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशके वापरल्याने जमिनीची गुणवत्ता खालावते.  तसेच शेतीमालात आरोग्यास अहितकारक रासायनिक अवशेष आढळून आल्याने अलीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. पाला-पाचोळा जमिनीत कुजवून ताग अथवा धैंचासारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करून तसेच इतर सेंद्रिय पदार्थ कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्याचे पुनर्भरण करतात. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणार्‍या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते व शहरात अशा मालाला मोठ्या प्रमाणावर मागणी असून किंमतही जास्त मिळते.

9) संरक्षित शेती :

कमी क्षेत्रातून जास्तीत-जास्त उत्पन्न काढण्याच्या उद्देशाने जमीन हवामान, उष्णता, आर्द्रता इ. नैसर्गिक घटकांवर नियंत्रण ठेवून नगदी पिकांचे उत्पादन हरितगृहात घेतली जाते. हरितगृहाचे अनियंत्रित, अंशत: नियंत्रित किंवा पूर्ण नियंत्रित असे तीन प्रकार असतात. हरितगृहामध्ये अलीकडे गुलाब, कार्नेशन, जरबेरा, ट्यूलिप इ. फुलांची शेती यशस्वीरित्या केली जाते.

 


10) शेतीपर्यटन :

अलीकडे शेतीपर्यटनही अनेक शेतकरी शेतीव्यवसाय म्हणून यशस्वीरित्या करताना दिसतात. यामध्ये शेती व त्या संबंधीच्या क्रियाकलांमध्ये रुची असलेले लोक पर्यटक म्हणून शेतीस भेट देतात व शेतकर्‍यांकडून ठरावीक मोबदल्यावर शेतीविषयक मूलभूत माहिती घेतात. सध्या असे लोक विशेषत: लहान मुलांसह शेतीस भेट देऊन ते रोज खात असलेल्या अन्नाचे उगमस्थान जवळून पाहू शकतात. त्याचबरोबर शेतमालाच्या उत्पादनाबाबत जागरूकता निर्माण होते व चांगल्या गुणवत्तेच्या शेतीमालास चांगला भावही मिळतो.

अशा तऱ्हेने शेतीची पद्धत ठरवताना जमिनीचा प्रकार, पाणी व इतर निविष्ठांची उपलब्धता, वातावरण आणि बाजारपेठ इ. घटकांचा विचार प्रामुख्याने केला जातो. तसेच त्यातून होणारा तुलनात्मक फायदा हा सुद्धा शेतीची पद्धत निवडताना एक महत्त्वाचा घटक ठरतो. बदलते हवामान, अस्थिर बाजारपेठ आणि शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेली त्रोटक जमीन या सर्वांचा विचार करता शेतकर्‍यांनी हुशारीने एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब करून मिश्र पिके आणि शेतीस पूरक व्यवसाय यांची सांगड घातल्यास शेतकर्‍यांना शेती ‘व्यवसायात’ फायदा होईल.

 


लेखक :-

  • श्री. गजानन शिवाजी मुंडे,

     कृषी सहाय्यक, (उद्यानविद्या विभाग)

     कृषी महाविद्यालय नागपूर. (डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला)

      ई.मेल.munde007@rediffmail.com

  • प्रा. शुभम विजय खंडेझोड

     (सहायक प्राध्यापक) उद्यानविद्या विभाग,

     डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव.

      इ. मेल. shubhamkhandezod4@gmail.com

  • प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे

     सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)

     श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती 

agriculture method agriculture शेती प्रकार उदरनिर्वाहासाठीची शेती Farming for subsistence फिरती शेती Nomadic farming बागायती शेती horticulture
English Summary: There were different types of agriculture in India, find out what are the benefits

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.