बीट लागवडीतील प्रमुख चार प्रकार , जाणून घ्या! लागवड पद्धत

बीट लागवड

बीट लागवड

ही लहान द्विवर्षायू (दोन वर्षे जगणारी) ओषधी असून तिच्या ग्रंथिल मुळांनाही बोटी ही संज्ञा आहे. हे मूळ मांसल, रसाळ, लाल, तांबूस, पिंगट, पिवळसर किंवा पांढऱ्या रंगाचे असते व आकाराने ते शंकूसारखे अथवा भोवऱ्यासारखे अथवा लांबट निमुळते असते. मुळाच्या वरच्या बाजूला किंचित जाडसर मोठ्या खंडित पानांचा झुबका असतो व टोकास शाखायुक्त फुलोरा (परिमंजरी) असतो. त्यावर नियमित द्विलिंगी पंचभागी, छदयुक्त आणि पोकळ्या नसलेली फुले असतात. फुलोऱ्यातील दोन ते तीन फुले एकत्रितपणे वाढल्याने  घोसफळ बनते. त्यातील प्रत्येक फळ (बी)कपालिका (कवचयुक्त  व पक्व झाल्यावर अलग होणारे) असते.प्रत्येक घोसफळात २ ते ५ गोलसर बिया असतात.

बीटचे लागवडीतील प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

  1. भाजीचा बीट
  2. साखरेचा बीट
  3. पालेभाजीचा बीट [⟶ पालक-२]
  4. जनावरांना खाऊ घालण्याचा बीट (मँजेल वूर्झेल). यांशिवाय बगीच्यात शोभेसाठी लावण्यात येणारे बीटचे प्रकारही आहेत. यांपैकी भारतात पहिले तीन प्रकार विशेषकरून लागवडीत आहेत.
  • भाजीचा बीट :-

(हिं. चुकंदर इं.बीट रूट, गार्डन बीट). याचे ग्रंथिल मूळ भाजीसाठी वापरतात. यूरोप,अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडामध्ये व्यापारी प्रमाणावर आणि परसबागेत लागवड केली जाते, उत्तर भारतात थंडीच्या हंगामात आणि महाराष्ट्र व दक्षिण भारतात वर्षाच्या सर्व हंगामांत त्याची लागवड करतात; परंतु गाजर, सलगम अथवा मुळा यांच्याइतके हे पीक भारतात महत्वाचे नाही. आकाराप्रमाणे भाजीच्या बीटचे निरनिराळे प्रकार आहेत. भारतात क्रिग्झन ग्लोब आणि डेट्रॉइट डार्क रेड हे प्रकार विशेषेकरून लागवडीत आहेत. त्यांचा आकार वाटोळा अथवा अंडाकृती असतो. मूळ कापल्यावर त्यातील बराचसा भाग लाल व रसाळ असून पांढरा, काष्ठमय चक्राकार भाग थोडा असल्यास तो प्रकार चांगला समजतात.

जमीन :- हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते; परंतु त्याला चांगल्या निचऱ्याची, ओल धरून ठेवणारी दुमट; भुसभुशीत जमीन चांगली मानवते. क्षाराचे प्रमाण थोडे फार जास्त असलेली आणि किंचित अम्लीय जमीन चालते; परंतु जास्त आम्लीय जमीन चालत नाही.

पेरणी :- पेरणी ऑक्टोबरच्या मध्यास करतात. एका हेक्टरसाठी ५-६ किग्रँ बी लागते. दोन ओळीतील अंतर प्रकाराप्रमाणे ३० ते ५० सेंमी. ठेवतात. सर्वसाधारणपणे ज्याला बी असे नांव आहे असे ते घोसफळ असते व त्यात २ ते ५ बिया असतात त्यामुळे एका जागी एकापेक्षा जास्त रोपे उगवून येतात. यासाठी बी उगवून विरळणी करणे आवश्यक असते. विरळणीनंतर दोन रोपांतील अंतर १० ते २० सेंमी ठेवतात. हेक्टरी ६० ते ७० किग्रॅ. नायट्रोजन, १०० - १२० किग्रॅ फॉस्फरस आणि ६० ते ७० किग्रॅ.पोटॅश या प्रमाणात खते देतात. बीटच्या पिकाला हेक्टरी १५ किग्रॅ. पर्यत बोरॅक्स दिल्याने बोरॉनची कमतरता भरुन निघते. बोरॉन कमी असल्यास बीटच्या आतील भागावर काळे डाग पडतात अथवा तो कुजतो. बी लावल्यापासून ८ - १० आठवड्यांनी बीट खणून काढतात. एका हेक्टर मधून २०,००० ते २५,००० किग्रॅ भाजीचे बीट मिळतात. भारतात बीटचे बी सु. १,३०० मी पेक्षा जास्त उंचीवरील प्रदेशात तयार होते. हेक्टरी सु. २,००० किग्रॅ. बी मिळू शकते. भाजीच्या बीटमध्ये ८५% भाग खाद्य असून त्यांत ८७.७% जलांश, १.७ % प्रथिन आणि ८.८% कार्बोहायड्रेट असतात.

साखरेचा बीट :-

(इं. शुगर बीट) १७७४ मध्ये ए.एस्. मार्ख्ग्राफ या जर्मन रसायनशास्त्रज्ञांना आढळून आले की, बीटच्या दोन जातींतील शर्करा उसाच्या शर्करेशी तंतोतंत जुळणारी आहे. या पिकाला खरे महत्त्व एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले. युध्दामुळे फ्रान्सला उसाच्या साखरेचा तुटवडा भासू लागला व नेपोलियन यांनी साखर तयार करण्यासाठी बीटच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. ल्बी व्हिल्मोरिन या फ्रेंच वनस्पतीशास्त्रज्ञांनी निवड पध्दतीने बीटमधील साखरेचे प्रमाण ७.५% वरुन १६ ते १७% पर्यत वाढविले. त्यामुळे बीटपासून साखर तयार करणे फायदेशीर होऊ लागले. सध्या जगातील एकूण साखरेच्या उत्पादनापैकी सु.४४% उत्पादन बीटपासून मिळते. जरी बीटपासून तयार केलेली साखर उसापासून तयार केलेल्या साखरेप्रमाणेच असली,तरी लोकांच्या मनात बीटपासून तयार केलेल्या साखरेविषयी प्रतिकूल ग्रह कित्येक वर्षे होता. साखरेचा बीट माथ्याच्या बाजूला रूंद व खाली वरच निमुळता असतो. टोकाच्या बाजूला बारीक सोटमूळ असते व ते क्वचित प्रसंगी १.२ ते २ मी. खोलवर जाते. माथ्याच्या खालील भागाला मान म्हणतात व तो भाग गुळगुळीत व सर्वात रूंद असतो. मानेच्या खालील बीटचा भाग दोन्ही बाजूंना चपटा असून त्यावर उभी खाच असते. गाभा पांढरा असतो आणि साल जवळजवळ पांढरी असते. या बीटमध्ये सु.१५% साखर असते व काही वेळा ती २०% पर्यतही असते. एकाच शेतातील निरनिराळ्या बीटमध्ये साखरेचे प्रमाण १० ते २०% या मर्यादेत असते.

क्षेत्र : १९७८ साली जगातील साखरेच्या बीटखालील क्षेत्र ९०.२६ लक्ष हेक्टर आणि २८.९१ कोटी टन उत्पादन होते. सर्वांत जास्त क्षेत्र (३७.६३ लक्ष हेक्टर) आणि सर्वात जास्त उत्पादन (९.३८ कोटी टन) रशियात होते. उत्पादनाच्या दृष्टीने रशियाच्या खालोखाल अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, प.जर्मनी, पोलंड व इटली हे देश महत्त्वाचे आहेत. अमेरिकेतील प्रती हेक्टरी उत्पन्न रशियापेक्षा ८१% जास्त होते. यूरोपातील सर्व देशांत साखरेच्या बीटची लागवड होते. जगातील एकूण बीटच्या उत्पादनापैकी जवळजवळ निम्मे उत्पादन यूरोप खंडात होते. आफ्रिका खंडात सर्वात जास्त उत्पादन  मोरोक्कोत (२३.९५ लक्ष टन) होते. आशिया खंडात चीन, तुर्कस्थान आणि इराण हे बीटच्या लागवडीचे महत्वाचे देश आहेत.

हवामान : हे समशीतोष्ण प्रदेशात वाढणारे पीक आहे. सर्व साधारणपणे असे म्हणता ये ईल की, उसाच्या लागवडीसाठी फार थंड हवामान असणारे देश साखरेच्या उत्पादनासाठी बीटवर अवलंबून असतात. बीट तयार होण्याच्या हंगामात २०o ते २२o से. तापमान आसल्यास त्यातील सखरेचे प्रमाण सर्वात जास्त असते. ३०o से.पेक्षा जास्त तापमान असल्यास साखरेचे प्रमाण घटते. संशोधनामुळे उपोष्ण प्रदेशातील उंचावरील भागात या पिकाची हिवाळ्यात बायायती खाली लागवड करता ये ईल, असे सिध्द झाले आहे. सिरिया, इराक, इराण, अल्जेरिया व इस्त्राएल या देशांत या पिकाला व्यापारी महत्त्व प्राप्त होत आहे.पाकिस्तानातही त्याची लागवडसुरु झाली आहे. भारताच्या उपोष्ण भागात हे पीक प्रायोगिक अथवा अर्धव्यापारी चाचणीच्या अवस्थेत आहे. काश्मीर खोऱ्यात ते पावसाच्या पाण्यावर उन्हाळी हंगामात घेता ये ईल अशी शक्यता वाटते. राजस्थानातील गंगानगरच्या साखरेच्या कारखान्यात भारतात प्रथमच बीटपासून २९८ टन साखरेचे उत्पादन १९७७-७८ मध्ये करण्यात आले. महाराष्ट्रात फलटण येथे बीटपासून साखर बनविण्यासाठी प्राथमिक स्वरुपाचे प्रयत्न करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील हवामानास योग्य असे साखरेच्या बीटचे प्रकार निर्माण करण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी या संस्थेने एक प्रकल्प हाती घेतला आहे.

जमीन : हे पीक चांगल्या निचऱ्याच्या दुमट अथवा चिकण माती मिश्रित दुमट जमिनीत चांगले येते. मातीचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ७ च्या आसपास असावे. लवणमय आणि क्षारीय जमिनीतही हे पीक येऊ शकते; परंतु अम्लधर्मी जमिनीत त्याची चांगली वाढ होत नाही.

फेरपालट : हे पीक जमिनीत वास्तव करणाऱ्या अनेक रोगांना बळी पडते. रासायनिक द्रव्यांचा वापर करून त्यांचे नियंत्रण करणे कष्टाचे व खर्चाचे असते. यासाठी दीर्घ मुदतीच्या पीक फेरपालटाचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात येते. मोठ्या क्षेत्रावरील पीक ३ — ५ वर्षाच्या फेरपालटात घेणे आवश्यक असते.

 

प्रकार: रॅमनस्काया ०६ या व्दिगुणित [⟶ बहुगुणन] व बहुअंकुरीय प्रकाराची भारतात व्यापारी प्रमाणावर लागवडीसाठी शिफारस करण्यात येते. हा प्रकार उत्पन्नाला चांगला असून त्याची प्रतही चांगली आहे. शिवाय त्याचे बीजोत्पादन देशातच राष्ट्रीय बीज महामंडळामार्फत काश्मीर व काल्पा (हिमाचल प्रदेश) खोऱ्यात करण्यात येते. महत्वाच्या रोगांना हा प्रकार प्रतिकारक आहे.

मशागत व पेरणी :- जमीन नांगरून भुसभुशीत करून तीवर फळी फिरवितात. पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करणे आवश्यक असते. उशिरा पेरणी केल्यास उत्पन्न आणि साखरेच्या प्रतिशत प्रमाणावर परिणाम होतो. हे पीक सपाट वाफ्यात किंवा सरीच्या वरंब्यावर ओळीत ५० सेंमी. अंतर ठेवून पेरतात अथवा हाताने लावतात. हेक्टरी सु.१० किग्रॅ बी लागते. बी उथळ (३ सेंमी. खोलीवर) पेरतात. बी चांगले उगवून येण्यासाठी सु.१५o से. तापमानाची जरुरी असते. बीटचे बी घोसफळ असल्याने प्रत्येक बियातून ३ — ४ रोपे निघतात. यासाठी जोमदार वाढणारे एकच रोप ठेवून बाकीची उपटून टाकतात. ओळीत दर २० सेंमी. अंतरावर एक रोप राहील अशा तऱ्हेने विरळणी करतात.

वरखत :-

पूर्व मशागतीच्या वेळी दिलेल्या शेणखत अगर कंपोस्ट खताखेरीज हेक्टरी १२० किग्रॅ.नायट्रोजन आणि जमिनीत फॉस्फरस व पोटॅशियम यांचा अभाव असल्यास ८० किग्रॅ.फॉस्फरस व १०० किग्रॅ. पोटॅश देतात. पेरणी, विरळणी व मातीची भर देण्यापूर्वी अशा तीन हप्त्यांत नायट्रोजन विभागून देतात. खत दिल्यावर पाणी देणे आवश्यक असते.

पाणी व तण काढणे :-

पाण्याच्या सु. ८ — १० पाळ्या आवश्यक असतात. या पिकाला जरुरीपुरतेच पाणी देणे आवश्यक आहे. पाणी जास्त झाल्यास ते ग्रंथिल मुळांस हानिकारक असते. तणांमुळे या पिकाची वाढ खुंरटते, यासाठी किमान पहिले दोन महिने तण काढून टाकणे आवश्यक असते. बीटानॉल व रोनीट ही तणनाशके या पीकातील तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरली आहेत. वर खताचा शेअवटचा हप्ता दिल्यानंतर डिसेंबरमध्ये पिकाला मातीची भर देतात.

काढणी व उप्तन्न :-

साखरेच्या बीटची काढणी पेरणीपासून २० — ३० आठवड्यांनी (एप्रिल-मे महिन्यात) करतात. खालची पाने तपकिरी व इतर पाने पिवळी पडल्यावर बीट काढावयास तयार झाले असे मानतात; परंतु साखारेचे प्रमाण पाहूनच काढणी करतात. देशी नांगराने बीटची काढणी करतात व त्यावरील माती काढून ते साफ करतात. यासाठी पाण्याचा वापर करीत नाहीत कारण त्यामुळे बीट लवकर कुजतात. काढलेल्या बीटच्या वरच्या भागातील सर्व पाने ताबडतोब काढणे आवश्यक असते असे न केल्यास  साखरेच्या उताऱ्यात घट येते. यूरोप व अमेरिकेत हेक्टरी ३५,००० ते ४०,०००/- किग्रॅ.बीट आणि १०,००० ते १२,००० किग्रॅ. ओला पाला मिळतो. काढणीनंतर बी ट साखर कारखान्यात ४८ तासांच्या आत पाठविणे आवश्यक असते. तसेच त्यांचा ढीग घालून काही तासांपुरताही ठेवणे इष्ट नसते. यासाठी बीटची लागवड कारखान्याच्या आसपास  असणे फायदेशीर असते.

 

साखरेचे उप्तादन :

उसापासून साखर तयार करण्याच्या कारखान्यात बीटचा रस काढण्यासाठी आणि तो स्वच्छ करण्यासाठी विशेष प्रकारची यंत्र सामुग्री बसवून साखरेचे उत्पादन करता येते; परंतु गूळ अथवा खांडसरी बनविता येत नाही. उसाचा रस ज्या पध्दतीने काढतात त्या पध्दतीने बीटचा रस काढता येत नाही. तसेच तो स्वच्छ करण्याची पध्दतही वेगळी आहे.  शेतातून आलेला बीट पाण्याने स्वच्छ धूवून त्याच्या पातळ चकत्या करतात. गरम पाण्यात विसरण पध्दतीने (रेणू एकमेकांत मिसळण्याच्या पध्दतीने) त्यातील साखरेचा अंश काढून घेतला जातो. या क्रियेसाठी विशेष यंत्र सामुग्रीचा वापर करतात.साखरेच्या द्रावणावर प्रथम चुन्याची क्रिया करतात व नंतर कार्बन डाय-ऑक्साईडाच्या साहाय्याने विरंजन करण्यात येते. त्यानंतरची साखर तयार करण्याची कृती उसाच्या स्वच्छ केलेल्या रसापासून साखर तयार करण्याच्या कृतीप्रमाणे असते.

दुय्यम उत्पादने व त्यांचा उपयोग :-

साखरेच्या बीटचा रस काढल्यावर राहिलेला चोथा पशुधाद्य म्हणून फार उपयोगी आहे. तो काकवीत मिसळून जनावरांना खाऊ घातल्यास ती तो आवडीने खातात.बीटच्या काकवीपासून लॅक्टिक अम्ल, ब जीवनसत्त्व व अनेक प्रकारची औषधे तयार करतात व ती विशेष प्रकारच्या किण्वनासाठीही (संथ अपघटनांच्या घटकद्रव्ये अलग होण्याच्या क्रियेसाठीही) उपयोगात आणतात. बीटचा ओला पाला जनावरांना तसाच खाऊ न घालता तो वाळवून त्यांत दर १०० किग्रॅ.ला ६० ग्रॅ.या प्रमाणात बारीक पूड केलेला चुना मिसळून दुभत्या गाईना खाऊ घालतात. ओल्या पाल्यात ऑक्झॅलिक अम्ल असल्याने तो तसाच खाऊ घालत नाहीत.

 लेखक 

1) ज्ञानेश्वर सुरेशराव रावनकार

    पी.एच.डी. विद्यार्थी (भाजीपाला शास्त्र)

    उद्यानविद्या विभागडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

  2) प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे

      सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)

      श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती

 

 

 

 

भाजीचा बीट साखरेचा बीट पालेभाजीचा बीट beet cultivation बीट लागवडीतील प्रमुख प्रकार
English Summary: The four major types of beet cultivation, learn the method of cultivation

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.