भुईमुग हे एक तेलबिया वर्गातील महत्वाचे पिक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के तेलासाठी, 10 टक्के प्रक्रिया करून खाणे व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (25 टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे.
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने तीन हंगाम आहेत. खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या अधिक असते. मात्र उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते.महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमुगाखालील लागवडीखालील क्षेत्र साधारणत: 2.36 लाख हेक्टर, तर उन्हाळ्यात 0.425 लाख हेक्टर एवढे असते. खरिपात भुईमुगाची उत्पादकता साधारणत: 1,000 ते 1,100 किलो प्रति हेक्टर असते तर उन्हाळ्यात साधारणत: 1,400 ते 1,450 किलो प्रति हेक्टर एवढी असते. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे तसेच वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.
जमीन:
भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त 12-15 सें.मी. एवढीच राखावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते. तसेच भुईमुगाच्या लागवडीसाठी भुसभुशीत जमिनीची निवड करावी कारण भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. तसेच शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
हवामान:
भुईमुग हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. मात्र पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे व फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान साधारणत: 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
पेरणीची वेळ:
उन्हाळी भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करावी. भुईमुगाची पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
बियाणाचे प्रमाण:
पेरणीकरिता सुमारे वाणानुसार 100 ते 125 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. परंतु, बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेला वाण, हेक्टेरी रोपांची संख्या, बियाण्यांचे 100 दाण्यांचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर आदी बाबींचा विचार करावा. यासाठी एसबी 11, टीएजी 24 या उपट्या वाणांसाठी 100 किलो, तर फुले प्रगती, टीपीजी 41, जेएल 501 या वाणांसाठी 125 किलो बियाणे लागते व निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी 80 ते 85 किलो बियाणे वापरावे.
सुधारित वाण:
उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाणांची निवड केली तर उत्पादनात 35-40 टक्क्यांनी वाढ होते
भुईमुगाचे सुधारित वाण :
वाण |
पक्वतेचा कालावधी (दिवस) |
प्रकार |
हंगाम |
सरासरी उत्पादन (क्विं./हे.) |
शिफारशीत जिल्हे |
एस.बी.11 |
105-110 |
उपटी |
खरीप, उन्हाळी |
खरीप: 12-14 |
संपूर्ण महाराष्ट्र |
फुले प्रगती (जे.एल.-24) |
90-95 |
उपटी |
खरीप |
18-20 |
संपूर्ण महाराष्ट्र |
टीएजी -24 |
खरीप: 100-105 |
उपटी |
खरीप, उन्हाळी |
खरीप: 12-14 |
संपूर्ण महाराष्ट्र |
फुले व्यास (जे.एल.-220) |
90-95 |
उपटी |
खरीप |
20-24 |
जळगाव, धुळे, अकोला |
टी.एम.व्ही. -10 |
120-125 |
निमपसरी |
खरीप |
22-23 |
सांगली, कोल्हापूर |
आयसीजीएस-11 |
125 - 130 |
निमपसरी |
खरीप |
20-30 |
सांगली, कोल्हापूर |
कोयना(बी-95) |
125-130 |
निमपसरी |
खरीप |
25-30 |
पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर |
एम-13 |
120-125 |
पसरी |
खरीप |
13-17 |
सांगली, कोल्हापूर, सातारा |
कराड 4 -11 |
140-145 |
पसरी |
खरीप |
15-20 |
बीड उस्मानाबाद |
फुले उनप (जे.एल.-286) |
90-95 |
उपटी |
खरीप/उन्हाळी |
20-24 |
पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे |
टीपीजी-41 |
125-130 |
उपटी |
रब्बी/उन्हाळी |
25-28 |
पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे |
जेएल-501 |
खरीप: 105-110 |
उपटी |
खरीप/उन्हाळी |
खरीप: 18-20 |
संपूर्ण महाराष्ट्रासाठी |
आरएचआरजी - 6083 |
120 |
उपटी |
खरीप/उन्हाळी |
30-35 |
संपूर्ण महाराष्ट्रासाठी |
आरएचआरजी -6021 |
120-125 |
उपटी |
उन्हाळी/खरीप |
30-35 |
पश्चिम महाराष्ट्रासाठी |
फुले भारती (जेएल-776) |
110-115 |
उपटी |
खरीप |
20-25 |
उत्तर महाराष्ट्रासाठी |
बीजप्रक्रिया:
रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 50 ग्रॅम थायरम किंवा 20 ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा 30 ग्रॅम मन्कॉझेब किंवा 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक बियाण्यास चोळावे. नंतर 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम रायझोबियम आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे. त्यामुळे पिकाच्या मुळावर भरपूर गाठी येतात व हवेतील नत्र अधिकाधिक शोषून घेण्यास मदत होते. बियाणे पेरणीच्या अगोदर २४ तास भिजवत ठेवल्यास बियाण्याची उगवण क्षमता वाढते. बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात साधारणतः 15 टक्के वाढ होते. बीजप्रक्रिया करताना बियाण्यावर प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची व नंतर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
पेरणीतील अंतर:
उपट्या जातीसाठी 30x10 सें.मी. तर निमपसऱ्या जातीसाठी 30x15 सें.मी. पेरणीतील अंतर ठेवावे. तसेच भुईमुगाची पेरणी सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर 30 सेंमी व दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे. जेणेकरून हेक्टरी 3.33 लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल. टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची २५ टक्के बचत होते. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रतिहेक्टरी 3.33 लाख रोपे मिळतात. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.
पेरणीची पद्धत:
भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल.
1. सपाट वाफा पद्धत:
भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर करायची झाल्यास ३० सेंमी अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सेमी तर दोन रोपांतील अंतर 10 सेमी ठेवावे व पाणी द्यावे. त्यानंतर 7-8 दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात.
2. भुईमुगाची इक्रिसॅट पद्धतीने लागवड:
या पद्धतीस गादीवाफा सरी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक एक मीटरवर 30 सेमी रुंदीची सरी सोडावी म्हणजे 70 सेमीचा रुंद वरंबा तयार होईल त्यावर 20 सेमी अंतरावर चार ओळी पाडून भुईमुगाचे बी टोकून लागवड करतात.
इक्रिसॅट पद्धतीच्या रुंद गादी वाफ्यावर पेरणी केल्याने मऊ व भुसभुशीत वरंब्यामध्ये मुळांची वाढ व शेंगांचे पोषण उत्तम होते. जास्तीचे पाणी निचरा होऊन बाजूच्या सऱ्यातून शेताबाहेर जाते. रुंद वरंब्यावर बी टोकण्यापूर्वी शिफारसीत खतमात्रा पेरून द्यावी. नंतर पाणी देऊन वाफे ओलसर करून शिफारशीत तणनाशकाची फवारणी करावी. नंतर वाफ्यावर पॉलिथिन शीट अंथरून बसविले जाते. पॉलिथिनला 20 सेमी ओळीतील अंतर ठेवून दोन रोपांनादेखील 20 सेमी अंतरावर 4 सेमी व्यासाची छिद्रे तयार केली जातात. प्रत्येक छिद्राच्या ठिकाणी दोन बिया टाकल्या जातात. पॉलिथिन शीटची रुंदी 90 ते 95 सेमी असते आणि रुंद वरंब्यावर 70 सेमी ठेवून उर्वरित पॉलिथिनच्या दोन्ही बाजू सरीच्या खोबणीत मातीत दाबाव्यात. त्यामुळे फिल्म सरकत नाही. गादीवाफे उताराला आडवे असावेत.
भुईमुग लागवडीच्या इक्रिसॅट पद्धतीचे फायदे:
- जास्त झालेले सरीतील पाणी काढून देता येते किंवा पाणी द्यावयाचे झाल्यास सरीतून देता येते.
- पाण्याचा निचरा चांगला होतो.
- मुळांच्या जवळ हवा खेळती राहते.
- ओळीतील रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो.
- भुसभुशीत मातीत शेंगा चांगल्या पोसतात.
- उत्पन्नात 2 ते 3 पटीत वाढ होते.
रासायनिक खते:
भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्यएक असतात. उन्हाळी भुईमुगासाठी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 400 किलो जिप्सम असे प्रमाण ठेवावे. त्याचबरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. स्फुरदयुक्त खते सिंगल सुपर फॉस्फेट द्वारे दिल्यास त्यामध्ये असलेल्या गंधकाचा भुईमुगासारख्या पिकास चांगला फायदा होतो. पेरणीच्या वेळी 200 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे, तर उर्वरित 200 किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते.
सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर:
- लोह: भुईमुग पिकात लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात व नंतर पांढरी पडलेली दिसल्यास पिकावर 35 ते 45 दिवसांनी 0.5 टक्के फेरस सल्फेटची फवारणी करावी.
- जस्त: ज्या जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असते अश्या जमिनीत भुईमुगाची पाने लहान राहतात. पानाच्या शिरामधील भाग पिवळा होऊन नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. यासाठी पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट 20 किलो प्रतिहेक्टवरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे. पिकात कमतरता आढळल्यास 2.5 किलो झिंक सल्फेट 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- बोरॉन: कॅल्शियमचे अधिक प्रमाण असलेल्या जमिनीत पिकाच्या सुरवातीच्या काळात बोरॉनची कमतरता भासून पीक निस्तेज दिसते. अशा वेळी पीक 30 ते 35 आणि 50 ते 55 दिवसांचे झाल्यावर बोरॅक्स ची फवारणी (0.05 ते 0.01 टक्का) करावी किंवा पेरणीपूर्वी 5 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे.
आंतरमशागत:
भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या 15-20 दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या 10-12 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 35-40 दिवसांनंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.
तणनाशकाचा वापर:
तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
तणनाशकांची शिफारस:
- पेंडीमिथॅलीनची फवारणी 7 मि.लि. प्रतिलिटर पाणी पेरणीनंतर 48 तासांच्या आत पीक उगवणीपूर्वी जमिनीत भरपूर ओल असताना करावी. त्यामुळे पीक सुरवातीच्या 20 ते 25 दिवस तणविरहीत राखता येते.
- पेरणीनंतर २० दिवसांनी तण उगवल्यानंतर: इमॅझिथापर (10 टक्के एसएल) दोन मिली प्रति लिटर पाणी तसेच गवतवर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास क्विझॉलोफॉफ ईथाईलची फवारणी 2 मि.लि. प्रतिलिटर ही फवारणी पेरणीनंतर 20 दिवसांनी जमिनीत मुबलक ओलावा असताना करावी.
पाणी व्यवस्थापन:
उन्हाळी भुईमुग पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 12 ते 13 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा राहतो. फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून 22-30 दिवस ) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून 40-45 दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून 65-70 दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन:
- मावा, फूलकिडे, तुडतुडे प्रादुर्भाव दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी.
- दुसरी फवारणी 15 दिवसांनंतर डायमिथोएट- 500 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यातून फवारणी (प्रतिहेक्टरी) करावी.
- पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी- क्विनॉलफॉस (25 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी. गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात.
- टिक्का रोग नियंत्रण: मॅन्कोझेब 2 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- तांबेरा रोग नियंत्रण हेक्साकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी प्रति या प्रमाणे फवारणी करावी.
काढणी व उत्पादन:
भुईमुग पिकाची पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली म्हणजे पिक तयार झाले असे समजावे. शेंगांचे टरफल टणक होते तसेच शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. त्यावेळी पिकाची काढणी करावी. शेंगांना असणारी माती स्वच्छ करावी. भुईमुग काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण 8-9 टक्क्यांपर्यंत खाली आणावे आणि शेंगा पोत्यात भरून ठेवावेत. उन्हाळी भुईमुगाची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड केल्यास 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते.
श्री. शक्तीकुमार आनंदराव तायडे, (पीएच. डी.विद्यार्थी) व श्री. नितीन राजाराम दलाल (सहाय्यक प्राध्यापक)
(उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर)
७३८७७२५९२६
Share your comments