गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा प्रभाव वाढत आहे.अशा वातावरणात ऊस पिकास तांबेरा, तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होतो. सध्या स्थितीत कोल्हापूर सांगली सातारा या भागात वरील रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
पहाटेच्या दवबिंदू मळे हवेमार्फत या रोगाचा प्रसार वाढतो.त्यामुळे त्यांचे वेळीच नियंत्रण करावे.
सध्यास्थितीत आडसाली किंवा पूर्वहंगामी उसावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पूर्वी कमी प्रमाणात आढळणाऱ्या या रोगाचा आता 40 टक्के इतका प्रादुर्भाव वाढला आहे.
- तपकिरी ठिपके :-
- रोगकारक बुरशीं: सरकोस्पोरालॉन्जि पस
- जास्त पावसाच्या भागात प्रादुर्भाव होतो.
- रोगाचा प्रादुर्भाव हा रोपांपेक्षा 7 ते 8 महिने वयाच्या पिकावर होतो.जुन्या पानाच्या दोन्ही बाजूवर अंडाकृती लालसर ते तपकिरी ठिपके दिसतात.ठिपक्याभोवती पिवळसर वलय दिसते.
- प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकात मिसळून मोठे होतात. टिपक्या मधील पेशी मरतात. आणि प्रकाश संश्लेषणक्रिया खंडित होते.
- प्रकाश संश्लेषण क्रियामंदावल्यामुळे उसाच्या कांड्यांची जाडी व लांबी कमी होते.ऊसातील शर्करा व वजन घटते.
- रोगाचा प्रसार 75 ते 80 टक्के सापेक्ष आद्रता असलेल्या वातावरणात हवा, पावसाचे पाणी व दवबिंदू मार्फत होतो.
- को.86032 व एमएस 10001 या जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव इतर वाणापेक्षा कमी प्रमाणात होतो.
- तांबेरा :
- रोगकारक बुरशी:पुकशीनिया कुहनाय
- कोल्हापूर, सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यातील नदीकाठच्या क्षेत्रात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.
- को.सी.671 को.94012 को.व्हि.एस. आय.9805 या जाती अधिक बळी पडतात.
- को. 86032 व फुले 265 या जाती वर सुद्धा हा रोग दिसून येतो.
- सुरुवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते.पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात.त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो.ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदू च्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो.
- त्यामुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रियेत मंदावून ऊस वाढीवर विपरीत परिणाम होतो.
- उपाययोजना:
- प्रमाणित, बीजप्रक्रिया केलेलेरसरशीत, निरोगी व योग्य वयाचे बियाणे वापरावे. खोडवा उसाचे बेणे लागवडीसाठी टाळावे.
- वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खत मात्रा द्याव्यात.
- हवेमार्फत पसरणाऱ्या रोगापासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन या मुलद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे प्रति हेक्टरी 1.5 टन बॅग राख अधिक सिलिकेट विरघळविणाऱ्या जिवाणूचेखत 2.5 लिटर या प्रमाणात वापर करावा
- एकरी नऊ किलो सिलिकॉन खतांच्या वापराने ऊसातील रोग प्रतिकार शक्ती वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र तशी विद्यापीठांची शिफारस नाही.
- रासायनिक नियंत्रण (दोन्ही रोगांसाठी): फवारणी प्रतिलिटर पाणी
- प्रोपिकॉनॅझोल 1 मि.ली किंवा
- मॅन्कोझेब 3 ग्रॅम.
Share your comments