तीनही हंगामात घ्या वांग्याचे पीक; होईल उत्पन्नात वाढ जाणून घ्या लागवड पद्धत

26 January 2021 10:48 PM By: KJ Maharashtra
वांगे पिकाची लागवड

वांगे पिकाची लागवड

अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात. या शेतीत वांग्याचे पीक हे अधिक पैसा देणारं आहे. हे पीक राज्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही जमीन प्रकारात घेतलं जातं. पण जर तुमची शेत जमीन ही मध्यम काळी असेल तर तर वांग्याचे पीक जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्‍यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्‍या गाळवट जमिनीत वांग्‍याचे उत्‍पादन चांगले येते.

कशी कराल पूर्वमशागत

मुख्‍य शेतात रोपांची लागवड करण्‍यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्‍या शेवटच्‍या पाळीसोबत दर हेक्‍टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्‍यावे.

 

लागवडीचा हंगाम

वांग्‍याची लागवड तिनही हंगामात करता येते.खरीप बियांची पेरणी जूनच्‍या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्‍टमध्‍ये केली जाते. रब्‍बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्‍टेबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर- नोव्‍हेंबरमध्‍ये लावतात.उन्‍हाळी हंगाम–बी जानेवारीच्‍या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारीत करतात.

  • वाण

मांजरी गोटा : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्‍यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्‍य महिन्‍यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर ४ते ५ दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन ३०० ते ४०० क्विंटल.

वैशाली : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्‍यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्‍यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्‍यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन ३०० क्विंटल.

प्रगती : या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्‍या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्‍यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्‍या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्‍या कालावधी  १७५ दिवस असून १२ ते १५ तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन  २५०  ते  ३००  क्विंटल.

अरूणा : या जातीची झाडे मध्‍यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्‍यात लागतात. फळे मध्‍यम आकाराची आणि अंडाकृती असून त्‍यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन  ३००  ते ३५०  क्विंटल वांग्‍याच्‍या वरील जाती शिवाय कृष्‍णा एम एच बी १० या अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत जाती आहेत.

 

बियांचे प्रमाण

५०० ग्रॅम / हेक्‍टर सुधारीत जातींसाठी १५० ग्रॅम / हेक्‍टर संकरीत जातीसाठी

  • लागवड

वांग्‍याची रोपे गादीवाफयावर तयार करतात. गादीवाफे ३ बाय १ मिटर आकाराचे आणि १० ते १५ सेमी उंचीचे करावेत. गादीवाफयाभोवती पाणी देण्‍यासाठी सरी ठेवावी. एक हेक्‍टर वांगी लागवडीसाठी अशा  १५  ते  २० वाफयातील रोपे पुरेशी होतात. वांग्‍यांच्‍या एक हेक्‍टर लागवडीसाठी ४००  ते ५०० ग्रॅम बी पुरते. मात्र त्‍यापेक्षा जास्‍त म्‍हणजे  ८०० ते १००० ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत. म्‍हणजे काही रोप न जगल्‍यास ही रोप नांगे भरण्‍यासाठी वापरता येतात. गादी वाफयावरील रोपे १२ ते १५ सेंटीमिटर उंचीची झाल्‍यावर म्‍हणजे ६ते ८ पानांवर आल्‍यावर लावणीस तयार होतात. बी पेरणीपासून साधारणपणे ४ ते ५ आठवडयात रोपे लागवडीसाठी तयार होतात. बियांची उगवण होईपर्यंत वाफयांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफयाच्‍या भोवती असलेल्‍या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे.

लागवडीनंतर रोपावर पाने लहान होणे किंवा बोकडया (लिटल लिफ) या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणून रोपवाटिकेमध्‍ये वाफयावर बी पेरताना फोरेट १० टक्‍के दाणेदार औषध ३ बाय १ मीटर आकाराच्‍या वाफयासाठी २० ग्रॅम या प्रमाणात बियाण्‍याच्‍या दोन ओळींमध्‍ये टाकावे. रोपावरील मावा, तुडतुडे फूलकिडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी बी पेरल्‍ यानंतर दोन आठवडयांनी १२ मिलीलिटर एन्‍डोसल्‍फॉन (३५टक्‍के) किंवा २० मिलीलिटर मॅलेथिऑन (५० टक्‍के ) किंवा २.५ मिलीलीटर फॉस्‍फॉमिडॉन ( ८५  टक्‍के) किंवा १० मिलीलिटर डयमेथोएट (३० टक्‍के ) किंवा १० मिलीलीटर फार्मोथिऑन (२५ टक्‍के ) १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

दोन ओळीतील आणि दोन रोपांतील अंतर जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे आणि जातीनुसार ठेवावे. काळया कसदार जमिनीत १०० बाय १०० सेंटीमीटर मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीत ७५  बाय ७५ सेंटीमीटर आणि हलक्‍या जमिनीत ६०  बाय ६०  किंवा ७५  बाय ६० सेंटीमीटर अंतर ठेवावे. रोपांची लागवड करण्‍यासाठी सरी वरंबे पाडून वरंब्‍याच्‍या बगलेत एका जागी रोप लावावे. कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा झिमझिम पाऊस सुरू असताना केल्‍यास फायदेशीर ठरते. उन्‍हाळयात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी ४ नंतर ऊन कमी झाल्‍यावर करावी.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन वांग्‍याच्‍या बागायती पिकास दर हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्‍फूरद आणि ५०  किलो पालाश द्यावे. त्‍यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्‍फूरद आणि पालाश रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावे. आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्‍या लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावे. ही खते ९ ते १० सेंटीमीटर खोलीवर झाडाच्‍या बुध्‍याभोवती १० ते १५  सेंटीमीटर अंतरावर बांगडी पध्‍दतीने द्यावीत. वांग्‍याच्‍या कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र आणि २५ किलो स्‍फूरद द्यावे.

रोपांची लागवड केल्‍यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे. पाण्‍याच्‍या पाळया जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतात. खरिपाच्‍या पिकास पाऊस नसताना १० ते १२ दिवसांच्‍या अंतराने हिवाळयात ७ ते ८ दिवसांच्‍या अंतराने आणि उन्‍हाळयात ५ ते ६ दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याच्‍या पाळया द्याव्‍यात. वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पध्‍दतीने पाणी देऊन पाण्‍याची बचत करता येते.

वांग्‍याच्‍या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतरमशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्‍यक आहे. त्‍याकरिता आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्‍यावे. तसेच झाडास मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारुनही करता येतो. वांगी पिकांमध्‍ये आंतरपीक म्‍हणून मुहा आणि पालेभाज्‍या ( पालक, मेथी, कोथिंबीर इ.) घेता येतात.

 

 

कीड व रोग

बोकडया किंवा पर्णगुच्‍छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते. ती लहान आणि बोकडल्‍यासारखी दिसतात. याचा प्रसार तुडतुडयांमुळे होतो.

उपाय

बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रती वाफ्यास २५ ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

रोपे लावण्‍यापूर्वी मोनोक्रोटोफॉस ३६  डब्‍ल्‍ये. एस. सी. १५ मिली व ऐंक्रामायसिन ५ ग्रॅम व १० लिटर पाणी

मर : हा बुरशीजन्‍य रोग असून जमिनीत असणा-या फयूज्‍यारियम नावाच्‍या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरेमधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्‍यास आतील पेशी काळपट दिसतात. झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.

उपाय

रोगास बळी न पडणा-या जातींची लागवड करावी. पिकांची फेरपालट करावी. नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्‍यास ३ ग्रॅम प्रतिकिलो थायरम बियाण्‍यास चोळावे.

ब) किड

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी – या किडीमुळे वांगी पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. चिकट पांढ-या रंगाच्‍या या आळया शेंडयातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात. आाणि त्‍यामुळे झाडाची वाढ खुंडते फळे लहान असताना अळी देठारजवळून फळात शिरून फळाचे नुसकान करते.

उपाय

किड लागलेले शेंडे अळिसकट नष्‍ट करावेत. ४० ग्रॅम कार्बारिल किंवा १४ मिली मोनोक्रोटोफॉस ३६ टक्‍के किंवा २.४ मिली सायफरमेथिन, २५ टक्‍के १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी किंवा १० टक्‍के कार्बारिल भूकटी दर हेक्‍टरी २० किलो या प्रमाणात झाडांवर धुरळावी.

तुडतुडे – हिरवट रंगाची किड असून पानातील रस शोषून घेते त्‍यामुळे पाने आकसल्‍यासारखी दिसतात. तसेच या किडीमार्फत बोकडया या विषाणू रोगाचा प्रसार होतो.

 


उपाय

रोपांच्‍या पुर्नलागवडीनंतर २ आठवडयांनी १२ मिली एन्‍डोसल्‍फान  ३५ टक्‍के प्रवाही किंवा २० मिली मेलॉथिऑन ५० टक्‍के प्रवाही १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

मावा – ही अतिशय लहान आकाराची किड पानांच्‍या पेशीमध्‍ये सोंड खुपसून पानातील रस शोषून घेते.

उपाय

२० मिली मेलॅर्थिऑन  ५० टक्‍के प्रवाही १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

eggplant crop eggplant crop cultivation वांग्याचे पीक वांगे
English Summary: Take eggplant crop in all three seasons, will increase the yield Learn the method of cultivation

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.