उन्हाळी तीळ पिकावर प्रामुख्याने खालील किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
(1) तुडतुडे : उन्हाळी तीळ पिकावर तुडतुडे या किडीची पिल्ले व प्रौढ अवस्था पानाच्या खालच्या बाजूवर राहून रस शोषण करतात त्यामुळे पानाच्या कडा वाकतात व नंतर पाने लालसर तपकिरी रंगाची होऊन वाळतात व गळतात. तुडतुडे ही कीड पर्णगुच्छ या रोगाचा वाहक म्हणून तीळ पिकात कार्य करते.
(2) तीळ पिकावरील पाने गुंडाळणारी, खाणारी व बोंडे पोखरणारी अळी : अंड्यातून बाहेर पडलेली अळी कोवळी पाने खाते व पानाची गुंडाळी करून त्यात राहते व नंतर बोंडात शिरून बी खाते
(3) गादमाशी : तिळाच्या फुलाचे आतील भागात या किडीची माशी अंडी घालते व या अंड्यातून अळ्या बाहेर पडून फुलातील स्त्रीकेसर खाऊन नष्ट करतात व अशा ठिकाणी बोंडे तयार न होता बोंडाचे रूपांतर गाठीत होते अशा गाठीत बी तयार होत नाही.
उन्हाळी तीळ पिकावरील वर निर्देशित किडीच्या एकात्मिक व्यवस्थापना करता गरजेनुसार खालील एकात्मिक व्यवस्थापन योजना अंगीकार करावी.
(1) उन्हाळी तीळ पिकात साधारणता एकरी पंधरा ते वीस पक्षी थांबे उभारावेत.
(2) तुडतुडे गादमाशी व इतर रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापना करता साधारणता एकरी 20 पिवळे चिकट सापळे लावावेत.
(3) उगवणीनंतर साधारणता 25 ते 30 दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
(4) उन्हाळी तीळ पिकावरील तुडतुडे व पाने गुंडाळणारी अळी या या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास योग्य निदान करून तज्ञांशी सल्लामसलत करून गरजेनुसार क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 ते 40 मिली अधिक दहा लिटर पाणी लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.
टीप : (१) रसायनाची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा.
(२) रसायने फवारताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा.
Share your comments