
Summer moong cultivation
डॉ. आदिनाथ ताकटे
उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व हवामान उष्ण असल्यामुळे मूग पीक चांगले प्रकारे येऊ शकते.उन्हाळ्या मधील मूग लागवडीचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा फायदा म्हणजे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो.जर सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर मुगाचेचांगले उत्पादन उन्हाळ्यात मिळू शकते. या लेखात आपण उन्हाळी मूग लागवडीबद्दल माहिती घेऊ.
जमीन
- मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी.पाणथळ, क्षारपड, चोपण तसेच उताऱ्यावरील हलक्या जमीनीवर मुगाची लागवड करू नये.
पूर्वमशागत
- रब्बी पिकाची काढणी नंतर जमिनीवर पडलेले अवशेष, पालापाचोळा वेचून जमीन स्वच्छ करावी.
- जमिनीची खोल नांगरटनंतर कुळवच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी देतांना ५-१० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.
पेरणीची वेळ आणि पद्धती
- उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. उशिरा पेरणी केल्यास हे पीक पावसात सापडण्याची शक्यता असते.पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी. ठेवावे.हेक्टरी १५-२० किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर ३ वर्षानी बदलावे.
बीजप्रक्रिया
- पेरणीपूर्वी २.५ ग्रॅम थायरम किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रती किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच उगवण चांगली होण्यासाठी आणि रोप अवस्थेतीलबुरशीजन्य रोगापासुन संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास४ ग्रॅम ट्रायकोडर्माचीबीजप्रक्रिया करावी.त्यानंतर जीवाणू संवर्धक रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे पीएसबी २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियम मुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
खतमात्रा
- पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत व कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन द्यावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद (४४ किलो युरिया (१ गोणी) व २५० किलो एसएसपी (५ गोणी) किंवा १०० किलो डीएपी द्यावे ) द्यावे.१५-२० किलो एमओपी दिल्यास उत्पादनात वाढ होते.
विद्रांव्या खतांची फवारणी
- पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी करावी.
- तसेच शेंगा भरत असतांना २ टक्के डीएपीची (२० ग्रॅम डीएपी प्रती लिटर पाणी)फवारणी करावी.
उन्हाळी मुगाच्या सुधारित वाण
वाण |
पीक कालावधी |
उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टर) |
वैशिष्टे |
वैभव |
७०-७५ |
१४-१५ |
भुरी रोग प्रतिकारक्षम, टपोरे हिरवे दाणे. |
बी.पी.एम.आर-१४५ |
६५-७० |
१२-१४ |
लांब शेंगा, टपोरे हिरवे दाणे, भुरी रोग प्रतिकारक्षम. |
बी.एम.-२००२-०१ |
६५-७० |
१२-१४ |
टपोरे दाणे, लांब शेंगा अधिक उत्पादन, भुरी रोग प्रतिकारक्षम. |
बी.एम.-२००३-०२ |
६५-७० |
१२-१४ |
टपोरे दाणे, लांब शेंगा अधिक उत्पादन, भुरी रोग प्रतिकारक्षम. |
बी एम-४ |
६०-६५ |
१०-१२ |
मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य |
पी. के.व्ही. ग्रीन गोल्ड |
७०-७५ |
१०-११ |
एकाच वेळी पक्वता येणारा वाण, भुरी रोग प्रतिकारक्षम. |
पी.के.व्ही,ए.के.एम-४ |
६५-७० |
१०-१२ |
अधिक उत्पादन, मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता येणारा वाण, भुरी रोग प्रतिकारक्षम. |
उत्कर्ष |
६५-७० |
१२-१४ |
अधिक उत्पन्न, टपोरे हिरवे दाणे |
पुसा वैशाखी |
६०-६५ |
६-७ |
उन्हाळी हंगामासाठी योग्य |
फुले एम-२ |
६०-६५ |
११-१२ |
मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य |
फुले चेतक |
६५-७० |
१२-१५ |
टपोरे हिरवे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादनक्षम |
एस-८ |
६०-६५ |
९-१० |
हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य |
आय.पी.एम.४१०-३ (शिखा) |
६५-७० |
११-१२ |
उन्हाळी हंगामासाठी, पिवळा विषाणू प्रतिकारक |
आय.पी.एम.२०५-७ (विराट) |
५२-५६ |
१०-११ |
उन्हाळी हंगामासाठी, पिवळा विषाणू प्रतिकारक |
आंतरमशागत
- पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकी डवरणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १०-१२ दिवसानी परत एखादे खुरपणी करावे. शक्यतो पेरणी पासून ३०-३५ दिसापर्यंत शेत ताण विहरीत ठेवावे.
पाणी व्यवस्थापन
- पेरणीपूर्वी एक पाणी द्यावे व वापस्यावर आल्यानंतर पेरणी करावी. पेरणीनंतर पहिल्यांदा ३-४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पिकास साधारणपणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा भरताना पाण्याच्या ताण पडू देऊ नये.
वरील प्रमाणे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उन्हाळी मुगाची जातीपरत्वे ४ ते ५ क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृदशास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर, मो. ९४०४०३२३८६
Share your comments