हा तसा बघायला गेला तर वादग्रस्त मुद्दा आहे. काही शास्त्रज्ञ,तज्ञ आणि शेतकरी म्हणतात की जेठा मोडणे हे गरजेचेच आहे. काही म्हणतात की जेठा कोंब मोडणे ही चुकीची पद्धत आहे. मला ही प्रामाणिकपणे वाटते की जेठा कोंब मोडणे ही चुकीची पद्धत आहे. त्या मागचे कारण सांगायचा आधी आपण थोडं उसाचा लागणी पासून फुटव्या पर्यंत चा काळ थोडा सविस्तर बघुया.
उसाची लागण आपण ज्यावेळी करतो त्या वेळी उसाचे टिपरे कापून घेतो. काही ठिकाणी ३ डोळ्याचे टिपरे वापरतात,काही ठिकाणी २ डोळ्याचे टिपरे वापरतात तर काही शेतकरी १ डोळा टिपरी वापरतात. आम्ही १ डोळा टिपरी ची लागण करतो. ज्या वेळी आपण लागण करतो त्या वेळी बेणे हे ९ ते ११ महिन्याचं असावं. त्या मागचे मुख्य कारण असे की ९-११ महिन्यात उसा मध्ये असलेली साखर ही ग्लुकोस स्वरूपात असते. ११ महिन्यानंतर त्याचं रूपांतर फ्रुक्टोज मध्ये होण्यास सुरुवात होते. एकदा कांडी मधली साखर ही फ्रुक्टोज मध्ये रूपांतरित झाली की त्याचा उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते. शिवाय ९-११ महिन्यात कांडी मध्ये असलेल नत्राचे प्रमाण ही योग्य असते. आपण ज्यावेळी कांडी जमिनीत पुरतो त्यावेळी उसाचा डोळा हा कांडी मध्ये असलेली साखर आणि नत्र वापरून मुळ्या आणि इतर अवयव तयार करण्यास सुरुवात करते. साधारण ४ थ्या दिवशी मुळी सुटण्यास प्रारंभ होतो.
तिथून पुढे उसाला पानं फुटतात जे प्रकाशसंश्लेषण करून साखर तयार करतात.हा जो सर्वप्रथम कोंब आलेला असतो त्याला खलील बाजूस अतिसूष्म पेरे असतात आणि त्या पेऱ्यांमध्ये अतिसूष्म डोळे असतात. त्या डोळ्यातुन आणखीन काही कोंब बाहेर येतात त्याला आपण फुटवे म्हणतो. त्या फुटव्याना ही डोळे असतात त्यातून एखादा दुसरा फुटवा आणखीन निघतो. ४५-६० दिवसांत बाळ भरणी आपण करतो. ६५-७० दिवसांत आपल्याला जेठा कोंब मोडायची गरज असते. जेठा कोंब आपण काढतो तो म्हणजे फुटव्यांची संख्या वाढवण्या करता आणि फुटव्यांची वाढ चांगली होण्या करिता.प्रत्येक झाडात ४ मुख्य संजीवके सक्रिय असतात. ऑक्सिन, सायटोकायनिन,जिब्रेलीन आणि इनहीबिटर्स. ह्या परिस्थितीत आपण ऑक्सिन आणि सायटोकायनिन चा विचार करू. ऑक्सिची निर्मिती ही कुठल्याही झाडाचा शेंड्यावर होत असते.ऑक्सिन ची निर्मिती उसाचा बाबतीत त्याचा जेठे मध्ये होत असते आणि सायटोकायनिनची निर्मिती ही मुळीचा शेंड्यामध्ये होते. ऑक्सिन हे शेंड्यातून मुळी कडे प्रवास करते तर (त्यामुळेच काही तणनाशके ही ऑक्सिनचे एक रूप आहेत) सायटोकायनिन हे मुळी पासून शेंड्यापर्यंत प्रवास करते. ह्या दोघांची निर्मिती ही योग्य प्रमाणात झाली तर जेठा मोडायची गरज भासत नाही. जेठा ही चांगला वाढतो आणि फुटवेही चांगले जोमदार मिळतात. आपण जर जेठा मोडला तर ऑक्सिची निर्मिती थांबून झाडामध्ये फक्त सायटोकायनिन निर्मिती वाढणार ज्या मुळे आपल्याला जेठा मोडल्यावर उसाची फुटवे वाढल्या सारखे जाणवतात. आम्ही जेठा न काढण्या मागचे कारण असे की आम्ही ऑक्सिन आणि सायटोकायनिन ची मात्रा योग्य ठेवण्यावर भर देतो. जेठा मोडल्यामुळे आपले आर्थिक नुकसान करून घेतो. एकरी आपण ६४६० रोप किंवा एक डोळा कांडी लावतो
(४.५फूट×१.५फूट) जर आपण उसाचा पूर्ण पिकामधून जेठेचे १ किलो वजन येईल असे गृहीत धरले तर आपले ६.४ टन वजन हातचे जाते. शेतकरी हिशोब अस लावतात की जर जेठा मोडला तर फुटवे जास्त येतील. पण जास्त फुटवे आले तर ते कालांतराने मरून जातात आणि शेवटी १०-१२ फुटवेच हातात राहतात.ऊस ज्यावेळी तुटतो त्या वेळी जर गड्यात १० फुटवे असतील तरी आपण हंगामाचा शेवटी एकरी ४००००-५०००० ऊस काढू शकतो. जेठा मोडून काही मरके ऊस घेण्या पेक्षा सुरुवाती पासून शेवटपर्यंत १०-१२ चांगले पोसलेले ऊस कधीही चांगले.
जेठा न मोडल्यामुळे फायदा होतो. मी मार्च,२०१८ मध्ये ऊस लागण केली आणि ७ महिन्यात त्याची तोडणी केली. ७ महिन्यात मला १८ कांडी ऊस मिळाला. त्या प्रयोग बद्दल अधिक वाचण्यासाठी ह्या लिंक वर भेट द्या
https://www.facebook.com/411729315960995/posts/654166611717263/.
त्या प्लॉटमध्ये आम्ही जेठा मोडला नव्हता. हे लोकांना अशक्य वाटते कारण कांडी धारायलाच ४-४.५ महिने लागतात तर ७ महिन्यात १८ कांडी ऊस कसं शक्य आहे. त्यामध्ये खुप घटकांचा समावेश आहे. त्यातील एक घटक आहे ऑक्सिन. ऊस सर्व साधारण महिन्याला ३ कांडी तयार होतो. ३ कांडी ऊस तयार होत असेल तर ३ पानं महिन्याला तयार होत असतात. म्हणजे शेंड्यातून १० दिवसाला एक पान तयार होते. पण हे समीकरण थोडे बदलते ज्यावेळी ऑक्सिन ची मात्रा आणि सायटोकायनिन ची मात्रा योग्य असते त्यावेळी. मी एकदा निरीक्षण करत असताना मला जाणवले की काही जिवाणूचे प्रयोग केल्या नंतर १० दिवसात नवीन पान तयार होणारे ९ दिवस, ६ दिवस असे करत करत ४ दिवसाला तयार होत होते. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा सायटोकायनिन आणि ऑक्सिनची निर्मिती ही योग्य प्रमाणात होत असेल. आपण ६०-६२ कांडी ऊस आल्याचे बातम्या वाचले असतील. ६०-६२ कांडी ऊस ज्या वेळी घेतो त्यावेळी ऑक्सिन (Apical dominance) हे त्या मागचे मुख्य कारण असते.
त्यासाठी आम्ही २ गोष्टींचा वापर करतो. एक फोटोसिंथेटिक बॅक्टरीया जे ऑक्सिची (इंडोल असिटिक ऍसिड) निर्मिती करतात आणि गौमूत्र (सायटोकायनिन) गौमुत्रामध्ये सायटोकायनिन आहे असा शोधनिबंध नाही. पण प्रा.भीमराज भुजबळ ह्यांनी आपल्या पीक संजीवकांची किमया ह्या पुस्तकात गौमुत्रामध्ये सायटोकायनिन असण्याची शक्यता वर्तवली आहे. सायटोकायनिन ह्या संजीवकांचा स्वभाव त्याचा अतिरेक झाल्यावर होणारे दुष्परिणाम आणि गौमूत्र ह्या मध्ये साम्य आहे पण तोवर आपण एखादा शोधनिबंध प्रकाशित होण्याची वाट बघू. कारण सायटोकायनिन १०० प्रकारचे असतात. आम्ही फोटोसिंथेटिक बॅक्टरीया आणि गौमूत्र (१६लिटर पंपास २५०मिली) ह्याची फवारणी करतो बाळ भरणीचा आधी ३ वेळा. पानांची रुंदीही चांगली वाढते आणि पेर्यातील अंतर ही चांगले वाढते. ज्या वेळी आपण ही मात्रा योग्य ठेवतो त्यावेळी आपल्याला निश्चित चांगले परिणाम मिळू शकतात.
शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीचा जरूर विचार करावा. एखादा गुंठा हा जेठा न मोडता ठेऊन त्याचे किती उत्पादन मिळते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपल्या शेती मध्ये बदल करावे. आमच्या शेती करण्याचा पद्धती मध्ये जेठा न मोडता आम्हाला चांगले उत्पादन मिळते. गेली ३-४ वर्ष आम्ही जेठा मोडायचे बंद केले आहे. त्यामुळे आम्हाला चांगला आर्थिक फायदा झाला.
Share your comments