मौजे पळसवाडी, ता.उस्मानाबाद येथे श्री.देवीदास कोळगे यांच्या शेतात ड्रोनद्वारे पिक फवारणी बाबत चाचणी घेण्यात आली. केवळ १२ लिटर पाणी व २०० एम.एल. औषधामध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत आर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर फवारणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, पाणी याची बचत तर होणारच आहे मात्र या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन वेळेत कीड अथवा रोगांचा प्रार्दुभाव निदर्शनास आणुन लागलीच फवारणी करणे शक्य आहे.
कीटकनाशके व रासायनिक औषधांच्या फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांना बाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पिक वाढल्यानंतर साप अथवा तत्सम प्राण्यांच्या भीतीने मजुर फवारणीसाठी पिकात जात नाहीत. तसेच मजुराद्वारे फवारणी करताना किटकनाशक, औषधे व पाण्याची जास्त गरज भासते. फवारणीसाठी वेळ देखील जास्त लागतो. हंगामात वेळेवर मजुर देखील मिळत नाहीत. या अडचणी लक्षात घेऊन आपण यामध्ये सुलभता आणण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने ड्रोनच्या माध्यमातुन कीटकनाशक फवारणीचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येत आहे
यासाठी कॅमेरा असणारा ड्रोन व फवारणी करणारा ड्रोन याचे प्रत्येकी २ संच उपलब्ध केले जाणार आहे.
या अनुषंगाने प्रशिक्षणासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेंटर फॉर एक्सलन्स इन ड्रोन टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली असून सेन्सएकर, हैद्राबाद या कंपनीशी करार करून त्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षण व संशोधनासाठी मदत केली जाणार आहे. ड्रोन च्या वापरामुळे माध्यमांमुळे ५०% पेक्षा जास्त कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा ८०% पर्यंत कपात होणार आहे. यावेळी बोलताना सेन्सएकर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनोद कुमार म्हणाले की, या माध्यमांमधून फवारणी केल्यामुळे अधिक दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे थेट कीटकावर याचा परिणाम होणार असून त्यामुळे पिकांची उत्पादनक्षमता सुद्धा वाढणार आहे. यापूर्वी तीन बँड मल्टी स्पेक्ट्रम कॅमेराचा वापर केला जात होता परंतु भारतामध्ये पहिल्यांदाच १० बँड मल्ट्री स्पेक्ट्रम कॅमेरा या प्रयोगासाठी वापरलेला आहे. या माध्यमातून कीटकांचे निरीक्षण केले जाऊन या मधून कुठल्या पद्धतीच्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे,
हे सहज लक्षात येईल. यावर योग्य वेळी फवारणी करुन उत्पन्नात भरघोस प्रमाणात वाढ होणार आहे.
'सेंटर ऑफ एक्सलन्स'च्या माध्यमातुन महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सहाय्याने ड्रोन तंत्रज्ञाना विषयी अधिक अभ्यास केला जाणार असून ड्रोनचे प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येथे उभारण्यात येणाऱ्या 'ट्रेनिंग सेंटर'च्या माध्यमातून कृषी सेवा देण्यासाठी इच्छुक व्यक्तीस ड्रोन वापराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या चाचणी वेळी माजी नगराध्यक्ष श्री.नानासाहेब पाटील, तेरणा कारखान्याचे माजी संचालक व प्रगतशिल शेतकरी श्री.रेवणसिद्ध लामतुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.विक्रमसिंह माने, श्री.बाळासाहेब कोळगे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
पीक फवारणीच्या वेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी व प्रशिक्षणार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. हा प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण व स्वतःच्या शेतीमध्ये उपयोग करण्याविषयी उत्सुकता दाखवली.
Share your comments