
सोयाबीन बाजाराला पुन्हा मिळाली उभारी
ब्राझीलसह महत्वाच्या देशांमध्ये उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत आहे.
याचा देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळतोय. त्यामुळे सोयाबीन दरात ३०० ते ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे.
या देशांतील सोयाबीन उत्पादन घटीचे अंदाज जसजसे पुढे येतील तसे आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही दर सुधारण्याची शक्यता आहे, असं जाणकारांनी सांगितलं.
जागतिक बॅंक आणि युएसडीए च्यामते २०२२/ मध्येही सोयाबीन तेजीत राहण्याची शक्यता आहे. या संस्थांच्या माहितीनुसार २०२१ मध्ये सोयाबीनचे दर ४३ टक्क्यांनी वाढून ५८३ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते.
तर चालू वर्षात एक टक्क्यांनी वाढ होऊन ५८८ डाॅलरवर राहण्याची शक्यता आहे. वातावरणाचा फटका बसल्याने अनेक देशांमध्ये सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
ब्राझील, अर्जेंटीना, पेरुग्वे, चीन, कॅनडा, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील उत्पादन कमी आले. त्यामुळे २०२२ मध्ये जागतीक सोयाबीन उत्पादन ०.६ टक्क्यांनी घटून ३ हजार ६४० लाख टनांंवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
जागतीक सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझीलमध्ये काढणी क्षेत्र ४ टक्क्यांनी वाढले असले तरी उत्पादकता घटल्याने यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादन ३ टक्क्यांनी कमी येण्याचा अंदाज आहे.
जागतीक पातळीवर २०२० मध्ये सोयाबीन निर्यात १ हजार ७३० लाख टन होती. यात ब्रझीलचा वाटा ८३० लाख टन आणि अमेरिकेतून ६५० लाख टनांचा वाटा होता. जागतीक निर्यातीत या दोन्ही देशांचा वाटा ८५ टक्के आहे. त्यानंतर पेरुग्वेमधून ६६ लाख टन, अर्जेंटीनातून ६४ लाख टन आणि कॅनडातून ४४ लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती.
म्हणजेच सोयाबीन निर्यात करणाऱ्या अनेक देशांत यंदा उत्पादन घटणार आहे. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारात उमटत आहेत. सीबाॅटवर सोयाबीनचे मार्चचे वायदे १५९९ सेंट प्रतिपाऊंने झाले. तर दलियन एक्सचेंजवर सोयाबीनचे वायदे ६ हजार ३२१ युआन प्रतिटनाने झाले.
देशातील बाजार समित्यांत सोयाबीनचे सर्वसाधारण दर ६ हजार ते ६ हजार ७५० रुपयाने झाले. सोयाबीनच्या दरात ३०० रुपायांनी सुधारणा झाली.
या सुधारणेसह महाराष्ट्रात सोयाबीनचा दर ६ हजार ते ६ हजार ७०० रुपयांवर आहे. लातूर बाजार समितीत कमाल दर ६ हजार ६२१ रुपये तर सर्वसाधारण दर ६ हजार ५०० रुपयांवर होता.
हिंगोलीत सर्वसाधारण दर ६ हजार ३०० रुपये तर अकोला बाजारात ६ हजार २०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले.
मध्य प्रदेशात सोयाबीनला ५ हजार ९०० ते ६ हजार ८०० रुपये दर मिळाला.
इंदोरमध्ये सोयाबीनला ६ हजार ४०० ते ६ हजार ८०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. देवासमध्ये ५ हजार ९०० ते ७ हजार ५०० रुपये, खंडवा येथे ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये आणि उज्जैन येथे ६ हजार ८०० ते ७ हजार रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे देशातील सोयाबीन दरालाही आधार मिळत आहे. महत्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांत जसजसे उत्पादन घटीचे अहवाल पुढे येतील तसे आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही दर सुधारतील, असे जाणकारांनी सांगितले.
जागतीक सोयाबीन उत्पादनात घट झाली. तसेच पाम तेल उत्पादनही कमी आहे. युक्रेन आणि रशियातील वादामुळे सुर्यफूल तेल उपलब्धतेत अडचणी येत आहेत.
या सर्व घटकांमुळे देशातील सोयाबीन बाजार सुधारला. सध्याचे फंडामेंटल्स सोयाबीन दर सुधारण्यास अनुकूल आहेत. - गौरव कोचर, सोयाबीन प्रक्रियादार, इंदोर
ब्राझील आणि अर्जेंटीनासह अनेक देशांत सोयाबीन उत्पादनात घट येण्याची शक्यात आहे.त्यामुळे देशातील बाजारांत सोयाबीनचे दर सुधारले आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये दर मिळत आहे.
पुढील काळात अशीच स्थिती राहिल्यास दर आणखी वाढतील, अशी शक्यता आहे. - अशोक अगरवार, व्यापारी, लातूर
Share your comments