बघता बघता इवल्याशा अंकुराचे रूपांतर सशक्त रोपांमध्ये झाले आहे. दिवसागणिक होणारी पिकाची वाढ ही मनामध्ये समाधानाची भावना निर्माण करते. हा पंधरवडा हा फुलोरा अवस्थे आधीचा सर्वात महत्त्वाचा कालावधी असतो. ह्या पंधरा दिवसात होणारी पिकाची वाढ ही त्या पिकाचे भवितव्य ठरवते. इथून पुढे आपली खरी कसोटी सुरू होते. मागील काही दिवसात आपण जे काटेकोर नियोजन करत आहोत त्याचे परिणाम आपल्याला ह्या दिवसात दिसतात.
तसा सोयाबीन पिकाचा दुसरा महिन्यात स्फुरद ह्या अन्नद्रव्यांचे वर्चस्व असते. ह्या दिवसात ००:५२:३४ ह्या खताचे दहा दिवसाचा अंतराने तीन फवारण्या कराव्यात. प्रत्येक फवारणी मधून एकरी १किलो ००:५२:३४चा वापर करावा. काही वर्षांपूर्वी फुलोऱ्यामध्ये सुष्मअन्नद्रव्याचे महत्व सांगणारे संशोधन जगासमोर आले. ह्याच दिवसात आम्ही सुष्मअन्नद्रव्याचा तीन फवारण्याही करतो.
सुष्मअन्नद्रव्याची पूर्तता झाल्यास सोयाबीन पिकाचा सशक्त फुलोरा नैसर्गिकरित्या भेटतो. एखाद्या संप्रेरकांचा वापर करून कमकुवत फुलोरा आणण्यापेक्षा झाडाची अन्नद्रव्यांची गरज भागवून नैसर्गिक फुलोरा आणणे ही गोष्ट माझा मते शाश्वत उत्पादनाकडे घेऊन जाईल. ह्याच दिवसात आपणास दिलेल्या स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
ह्या पंधरवड्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येलो मोझाक व्हायरसची लागण. येलो मोझाक व्हायरस म्हणजे,काही झाडांवर पिवळे सुष्म ठिपक्यांचे अनियमित पुंजके निदर्शनास येतात. ह्या झाडांची वाढ इतर झाडाचा तुलनेने कमी असते. त्यांना शेंगाही कमी लागतात. पण ह्या झाडांचा बाबतीत सर्वात धोकादायक बाब ही आहे की ह्या झाडांवरील व्हायरसचा प्रसार हा इतर झाडांनाही होत असतो. रसशोषक किडींमुळे ह्या व्हायरसचा प्रसार मोठ्याप्रमाणात होत असतो. अशी झाडे योग्य वेळी उपटून न टाकल्यास काही दिवसातच पूर्ण क्षेत्र व्हायरसग्रस्त होते.
ह्या दिवसात कीड आणि अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. उंट आळी आणि पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव ह्या दिवसात प्रकर्षाने जाणवतो. उंट आळीवर नियंत्रण मिळवणे सोपे आहे. मागील लेखामध्ये सांगितलेल्या तंबाखू अर्क, निंबोळी अर्क किंवा निर्गुडीचा अर्काची फवारणी केल्यास आपल्याला चांगले नियंत्रण मिळते.
निर्गुडीचा अर्का-(१०लिटर पाणी मध्ये २किलो निर्गुडीचा पाला घालून त्याला उकळावे. तयार द्रावण प्रति पंप एक लिटर घालून फवारावे)
निंबोळी अर्का(१०लिटर पाणी मध्ये २किलो निंबोळीचा पाला घालून त्याला उकळावे. तयार द्रावण प्रति पंप एक लिटर घालून फवारावे).
तंबाखू अर्काचा(१०लिटर पाणी मध्ये २किलो तंबाखू धस पाला घालून त्याला उकळावे. तयार द्रावण प्रति पंप एक लिटर घालून फवारावे).
ह्या तीन पैकी कोणतीही फवारणी घेतल्यास उंट अळीचे नियंत्रण करणे सोपे जाते. रसशोषक किडीसाठी इमामेकटिन बेंझोइट+इमिडकलोपरिडचा वापर करावा.
पण ह्या वर्षी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेने ह्या वर्षी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीड जमिनीतून आपली सुप्तावस्था पूर्ण करते. किडीवर सुप्तावस्थेतच जर नियंत्रण मिळवता आले तर पुढे किडीचा प्रकोप जाणवणार नाही. वेळोवेळी जमिनीतून बिव्हेरिया मेंटरहीजम ह्या बुरशींचा वापर होणे गरजेचे आहे. परिस्थिती वेगाने वेगळे वळण घेत आहे. पूर्वीसारखे जाता येता शेतीचे नियोजन करून शेती करणे हा आता खऱ्या अर्थाने भूतकाळ झाला आहे. त्यामुळे शेती अधिक काटेकोर आणि विचारपूर्वक निर्णय घेऊन करणे गरजेचे आहे.
Share your comments