शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे मिरचीची लागवड करताना कीड व रोगमुक्त सशक्त रोपे रोपवाटिकेत तयार करणे म्हणजे भविष्यातील मिरची पिकावरील कीड रोगाचा बऱ्याच अंशी प्रतिबंध करणे यासारखे ठरू शकते. शेतकरी बंधूंनो मिरचीच्या रोपवाटिकेत म्हणजेच मिरचीची रोपे मुख्य शेतात लागवड करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे मिरचीच्या पीक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कोणत्या बाबी कराव्यात या अनुषंगाने काही महत्त्वाच्या टिप्स खाली दिल्या आहेत.
(१) मिरचीची रोपे शिफारशीत पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावरच तयार करावीत.
(२) मिरचीच्या गादीवाफा तयार करताना प्रति 2 चौरस मीटर गादी वाफे करिता चांगले कुजलेले दोन किलो शेणखत अधिक Trichoderma Viride 1% WP (TNAU) Strain हे जैविक बुरशीनाशक दहा ग्रॅम या प्रमाणात एकत्रित गादीवाफ्यावर जमिनीवर सारख्या प्रमाणात टाकून जमिनीत मिसळून द्यावे व ताबडतोब पाणी द्यावे व वाफसा आल्यावर गादीवाफ्यावर ओळीने बी पेरावे.
(२) ज्या भागात मिरची पिकावर रोपवाटिकेत रोप कोलमडणे व मर ( Damping off ) या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तेथे जमिनीत ट्रायकोडर्मा व्हिरीडी पाच किलो प्रती हेक्टर याप्रमाणे 150 किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
(३) मिरची पिकात रोपवाटिकेत रोपावस्थेत मर रोगाचा किंवा रोप कोलमडणे या रोगाचा (Damping off ) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याकरिता मिरची बी गादी वाफ्यावर पेरणी करण्यापूर्वी प्रथम Captan 75 % WS 20 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात किंवा Metalaxyl - M 31.8 % E.S. 2 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया प्रक्रिया करावी.
(३) वर निर्देशित बीज प्रक्रिया झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर मावा तुडतुडे फुलकिडे यांच्या प्रतिबंध करिता Imidachlopride 70 % WS 10 ते 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात किंवा फुल किडीच्या प्रतिबंध करिता Thiamethoxam 30 % FS 7 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
(४) वर निर्देशित बीज प्रक्रिया झाल्यानंतर सरतेशेवटी अर्ध्या तासानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी एक टक्का डब्ल्यू TNAU Strain या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
(५) मिरची पिकात बीज प्रक्रिया करताना सर्व बियाण्यास बीजप्रक्रिया चा घटक एकसमान लावून सावलीत सुकवावे व नंतर गादीवाफ्यावर शिफारशीप्रमाणे पेरणी करावी बीज प्रक्रिया करताना थंड ठिकाणी सावलीमध्ये करावी.
(६) मिरची रोपवाटिकेत गादीवाफ्यावर बी टाकल्यानंतर साधारणता मिरचीची रोपे पंधरा दिवसाची झाल्यानंतर आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी
Diemethoate 30 % EC 2 मिली अधिक एक लिटर पाणी
किंवा
Imidachlopride 17.8 SL 0.5 मिली अधिक एक लिटर पाणी
आवश्यकतेनुसार वर निर्देशित कीटकनाशक फवारणी करताना Mancozeb 75 % WP हे बुरशीनाशक 2.5 ते 3 ग्रॅम प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार मिश्रण करून फवारणी करू शकता.
(७) शेतकरी बंधूंनो मिरची रोपवाटिकेत रस शोषणाऱ्या विविध किडीच्या व्यवस्थापना करता पिवळे चिकट सापळे व निळे चिकट सापळे लावावेत.
(८) मिरची रोपवाटिकेत रोपांची मर आढळून आल्यास किंवा रोपे कोलमडलेल्या सारखी दिसल्यास (Damping off ) गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन Captan 75 % WP 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून घेऊन गादीवाफ्यावर रोपाच्या मुळाजवळ जमिनीत आळवणी (Drenching) करू शकता.
(9) शेतकरी बंधूंनो मिरचीची रोपे मुख्य शेतात पुनर्लागवड करण्यापूर्वी Diemethoate 30 % EC 10 ते 15 मिली किंवा Imidachlopride 17.8 % S.L. 5 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात कोणतेही एक
कीटकनाशक घेऊन किंवा या कीटकनाशका ऐवजी पाच टक्के निंबोळी अर्काचे द्रावण दहा लिटर घेऊन व या द्रावणात Mancozeb 75 WP हे बुरशीनाशक 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात टाकून द्रावण तयार करावे. या द्रावणात मिरचीच्या रोपाची शेंडे पाच मिनिटे बुडवून घ्यावे व त्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर मिरची रोपाची मुळे 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक दहा लिटर पाणी या द्रावणात पाच मिनिटे बुडवून नंतरच मिरची रोपांची मुख्य शेतात लागवड करावी.
वन निर्देशीत बाबीचा मिरची रोपवाटिकेत प्रतिबंधात्मक व निवारणत्मक पीक संरक्षण तंत्रज्ञान म्हणून अंगीकार केल्यास रोपवाटिकेत प्रभावी पीक संरक्षण करण्यासंदर्भात फायदा होतो.
टीप : (१) कृपया कोणत्याही रसायनाचा वापर पिकासाठी करण्यापूर्वी अद्यावत लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून रसायने वापरतांना लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच वापरावीत
(२) अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी, प्रमाण पाळावे तसेच फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा व योग्य निदान करून गरजेनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन रसायनाचा वापर करावा.
Share your comments