मातीचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतातून मातीचा योग्य पद्धतीने नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासून घेणे हे शेतकऱ्याचे पहिले कर्तव्य आहे. प्रयोगशाळेत मातीमधील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालशचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, मातीचा सामू, विद्युत वाहकता आदी घटकांचे प्रमाण, त्याला अनुकूल पीक व त्या पिकासाठी खताची शिफारस या बाबींची विस्तृत मातीची आरोग्यपत्रिका तयार करून शेतकऱ्याला दिली जाते. मातीचा सामू ६.५ ते ७.५ असल्यास पिकाच्या विकासासाठी आदर्श असतो. मातीतील सेंद्रिय कर्ब हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीत राहून पिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवाणूंचे खाद्य असते.
शिवाय सेंद्रिय कर्ब जर जास्त (१ टक्क्यापेक्षा जास्त) असेल तर जमिनीत पाणी चांगले मुरते, ओलावा टिकून राहतो, माती भुसभुशीत राहते. म्हणून चांगले कुजलेले शेणखत, लेंडीखत, गांडूळखत किंवा हिरवळीच्या खतांच्या रासायनिक खतांसोबत आवश्य डोस द्यावा. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी १७ अन्नद्रव्याची गरज असते. नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नघटक बहुतांश शेतकरी वापरतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे दुय्यम अन्नघटक असून, शेतकरी यांच्या वापराकडे दुर्लक्ष करतात.युरियासारखे प्रचलित, स्वस्त खते वापरून शेतकरी पिकाचे आणि मातीचेही नुकसान करत आहेत.
माती परीक्षण अहवालनुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहीलच आणि उत्पादनसुद्धा वाढेल.
शेतातील काडी कचरा, गवत न जाळता मूलस्थानी पिकाच्या अवशेषाचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढू शकते. पाणलोट क्षेत्र विकासावर भर देऊन माथा ते पायथा योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील. शेतातील झाडांची संख्या घटत आहे. बांधावर, पाणलोट क्षेत्रात, गायरान आदी क्षेत्रांत वृक्षारोपण असेल तरच मातीची धूप थांबू शकेल. पिकाची फेरपालट करावी. मुगानंतर ज्वारी आणि सोयाबीननंतर गहू पेरावा.
डाळवर्गीय पिके हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर करतात जे पुढील पिकाला उपलब्ध होते व मातीतील अन्नद्रव्याचे संतुलन राखले जाते. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी संतुलित खत वापर अत्यंत गरजेचे आहे. माती हे अत्यंत दुर्लभ पण दुर्लक्षित संसाधन आहे, ही जागरूकता देशातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.
Share your comments