व्यापारी तत्वावर कमी कालावधीत येणारे नगदी शेंग भाजीची लागवडीच्या तंत्रज्ञान माहितीचा उहापोह या लेखात केला आहे.चवळी ही शेंगवर्गातील भाजी असून,महाराष्ट्रात सर्व भागातून तिची लागवड केली जाते.चवळीचा सालीसकट कोवळ्या शेंगा व कोवळे दाणे,तसेच पूर्ण वाळलेले दाणे अशा स्वरूपात भाजीत,आमटीत व उसळीत वापर करतात. काही ठिकाणी कोवळे कोंब पानासकट खुडून त्यांची भाजी केली जाते.झाडांचा वापर जनावरांना चारा म्हणूनही केला जातो.चवळीच्या ओल्या शेंगाचा भाजीसाठी, तर वाळलेल्या बियांचा उसळीसाठी उपयोग होतो, तसेच हिरवळीचे खत म्हणून जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि धूप थांबविण्यास चवळी हे फारच उपयुक्त पीक आहे.वाढीची सवय -चवळी ही आधाराने वाढणारी, वेलवजा वर्षायू वनस्पती आहे. यामध्ये आता झुडूपवजासारख्या जाती सुद्धा उपलब्ध आहेत. बहुतेक शेतकरी झुडूपवजा प्रकारच्या चवळीची लागवड करतात. चवळीच्या झाडांची पाने गडद हिरवी आणि चकचकीत असतात. फुलांचा रंग पांढरा, गुलाबी, निळा किंवा जांभळा असतो. शेंगांचे घोस पानांच्या बेचक्यात येतात. शेंगा चपट्या किंवा गोल असून काही जातींमध्ये शेंगांची लांबी 50 सेंमीपर्यंत असते.
जाती -लागवडीसाठी चवळीच्या खालील सुधारित जाती उपलब्ध आहेत.पुसा फाल्गुनी - ही जात झुडूपवजा वाढणारी असून उन्हाळी हंगामासाठी अतिशय चांगली आहे. शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असून 10 ते 12 सेंमीपर्यंत लांब असतात. त्यांचे दोन बहर येतात. लागवडीपासून 60 दिवसांत शेंगांची काढणी सुरू होते. हेक्टरी 90 ते 110 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.पुसा कोमल - ही जात करपा रोगास प्रतिकारक असून याचे रोपटे झुडूपवजा व मध्यम उंचीचे असते. 90 दिवसांत पीक तयार होते. हेक्टरी 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.पुसा दो फसली - ही झुडूपवजा वाढणारी जात असून, उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामांत लागवड करता येते. शेंगा सुमारे 18 सेंमी लांब असून शेंगांची काढणी लागवडीपासून 67 ते 70 दिवसांत सुरु होते. हेक्टरी उत्पन्न 100 क्विंटलपर्यंत मिळते.पुसा बरसाती ही जात लवकर येणारी (45 दिवस ) असून पावसाळी किंवा खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे. शेंगा 15 ते 25 सेंमी लांब असून त्यांचे 2-3 बहार येतात. या जातीच्या हिरव्या चवळीचे उत्पादन 85-90 क्विंटल प्रतिहेक्टरी येते.
असीम - ही जात 80 ते 85 दिवस मुदतीची असून खरीप हंगामासाठी अधिक योग्य आहे. पहिली तोडणी 45 दिवसांत मिळते. एकूण 8 ते 10 तोडण्या 35 ते 40 दिवसांत आटोपतात. या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या मांसल आणि रसरशीत 15 ते 18 सेंमी लांब असतात. बी पांढर्या रंगाचे असून फुले पांढरी असतात. हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पादन खरीप हंगामात 75, तर उन्हाळ्यात 60 क्विंटल असते.ऋतुराज झुडूपवजा वाढणारी जात असून पेरणीनंतर उन्हाळ्यात 40 दिवसांनी आणि खरिपात 30 दिवसांनी फुलावर येते. फुले जांभळी असून शेंगा 22 ते 24 सेंमी लांब कोवळ्या असतात. खरीप हंगामात पहिली तोडणी 40 ते 45 दिवसांनी मिळते. त्यानंतर 10-12 तोडण्या होतात. हिरव्या शेंगा आणि बी या दोन्हींसाठी ही जात उपयुक्त असून प्रतिहेक्टरी शेंगांचे उत्पादन 85 क्विंटलपर्यंत मिळते. बियांचे हेक्टरी उत्पादन 10 क्विंटलपर्यंत मिळते. खरीप हंगामात पीक 60 ते 65 दिवसांत आणि उन्हाळी हंगामात 75 ते 80 दिवसांत निघते.हवामान -हे उष्ण हवामानातील पीक असून कोरड्या आणि दमट दोन्ही हंगामांत येऊ शकते. मात्र कडाक्याची थंडी सहन करू शकत नाही. तापमान 20 अंशांच्या खाली गेल्यास झाडांना फुले व शेंगा येत नाहीत. मात्र उष्ण तापमान 40 अंश सेंग्रेमध्ये चवळीचे पीक टॅग धरते आणि पाण्याचा चांगला पुरवठा असल्यास जोमाने वाढून उत्पन्न देते.
जमीन -जमिनीच्या बाबतीत हे पीक तितकेसे चोखंदळ नाही. अगदी हलक्या ते मध्यम किंवा आभारी जमिनीतही ते येऊ शकते. पाण्याचा निचरा न होऊ शकणार्या भारी चिकन मातीच्या जमिनी या पिकासाठी निवडू नये. लागवड केलेल्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. उत्तम निचरा होणार्या 6 ते 8.5 आम्ल विम्ल निर्देशांक असलेल्या सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीत चवळीचे पीक चांगले येते.लागवडीचा हंगाम ः चवळीची लागवड साधारणतः उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामांत करतात, पण महाराष्ट्रात हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडत नसल्याने चवळीचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते. उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारी, मार्चमध्ये, तर खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात करतात. हिवाळी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड करतात. विदर्भातील शेतकरी ज्वारी पिकात मिश्रपीक म्हणून चवळीचे पीक घेतात.पूर्वमशागत व पेरनी - जमिनीचे क्षेत्र नांगरट करून कुळवाने भुसभुशीत करावे. मशागत करताना हेक्टरी 10-15 टन कंपोस्ट अथवा शेणखत टाकावे. भाजीसाठी पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबे तयार करावेत. दोन रोपांतील अंतर 15 सेंमी ठेवून वरंब्याच्या मध्यावर बी टोकावे. दोन सरींमधील अंतर 45 सेंमी ठेवावे.
हल्ली उच्च प्रतीच्या, कोवळ्या व एकसारख्या लांबीच्या शेंगांची मागणी असल्याने झुडूपवजा चवळी पिकाची लागवड गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने करून पीक आणि खतांच्या मात्रा ठिबक सिंचन पद्ध्त वापरून द्यावे. ठिबक सिंचन पद्धत आणि गादीवाफ्यावर लागवड केल्यास शेंगांची प्रत उत्तम मिळून उत्पादन मिळते.जमिनीची मशागत झाल्यानंतर गादीवाफे 60 सेंमी रुंद, 30 सेंमी उंच आणि दोन गादीवाफ्यात 40 सेंमी अंतर ठेवून तयार करावेत. गादीवाफ्यावर लागवड दोन ओळींत करावी. दोन ओळींत 45 सेंमी अंतर ठेवून दोन रोपांमध्ये 15 सेंमी यानंतर ठेवावे. हेक्टरी 15 किलो बियाणे पुरते.खते - जमिनीची सुपीकता, लागवडीचा हंगाम व जाती यानुसार खताचे प्रमाण ठरवावे लागते, तसेच मातीपरीक्षण लागवडीपूर्वी करून घेणे आवश्यक आहे. तरी साधारणतः चवळी पिकाला हेक्टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.जमिनीची मशागत झाल्यानंतर संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्ध्या नत्राची मात्रा बी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे. पहिली खुरपणी झाल्यानंतर म्हणजे अंदाजे 25 ते 30 दिवसांनी राहिलेला अर्धा नत्राचा हप्ता द्यावा.
Share your comments