डोंगर उताराच्या हलक्या जमिनीही उपयुक्त ठरतात. मात्र निचरा न होणाऱ्या भारी काळ्या जमिनीत शेवगा लागवड करू नये. अशा जमिनीत पाण्यामुळे झाडांची मुळे कुजतात. झाडे मरतात. जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.हवामान - उत्तम वाढीसाठी समशीतोष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. सर्व साधारण २५-३५ अंश सेल्सिअस तापमानात शेवग्याची वाढ चांगली होते. झाडास फुले व शेंगा भरपूर लागतात. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच ढगाळ हवामान, अतिथंड तापमान, धुके आणि अति पाउस या पिकाच्या वाढीस बाधक ठरते.जाती - पी.के.एम-१, पी.के.एम.-२, कोकण रुचिरा, भाग्या (के.डी.एम.-०१), ओडिसी लागवड - बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड कमी पावसाच्या प्रदेशात जून-जुलै महिन्यामध्ये करावी, तर कोकणासारख्या अति पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत करावी.
व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास मे-जून महिन्यांत २x२x२ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. त्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत,२०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५०० ग्रॅम निंबोळी खत व १० ग्रॅम दाणेदार कीटकनाशक मातीत चांगले मिसळून घ्यावे.खड्डा भरून घ्यावा. हलक्या जमिनीत लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५x२.५ मी व मध्यम जमिनीसाठी ३x३ मी अंतर ठेवावे. शेवग्याचे बियाणे उपलब्ध झाल्यावर त्याचे प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करावी. बियाणे टोकताना त्यास इजा होऊ नये म्हणून बी न दाबता हळुवारपणे पिशवीत ठेवून नंतर त्यावर माती टाकावी, पाणी द्यावे. शेवग्याचे बी पिशवीत लावल्यानंतर एक महिन्याच्या आत लागवड होईल याची काळजी घ्यावी.खत व्यवस्थापन - शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो. त्यामुळे बहार घेताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे. छाटणी झाल्यावर मात्र एकदा शेणखत वापरावे. शेणखताबरोबरच रासायनिक खतांचा वापर करावा. एकरी ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. त्यानंतर ३० ते ४० दिवसांनी पुन्हा एकदा एकरी ५० किलो युरिया द्यावा.
माती परीक्षणानुसार जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढ यानुसार नत्राचे प्रमाण कमी-जास्त करावे. पहिला बहार निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात. अशावेळी पुन्हा एकदा वरीलप्रमाणे खतांचे नियोजन करावे. अशाप्रकारे वर्षातून दोनदा रासायनिक खतांचा वापर करावा. शक्य असल्यास सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगाचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा. शेंगांची फुगवण कमी होत असल्यास तसेच फूलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढविण्यास स्फुरद खतांचा वापर जास्त करावा.छाटणी - शेवग्याचे रोप २.५-३ फूट वाढल्यानंतर त्याचा शेंडा छाटावा. रोपाचा शेंडा छाटल्याने त्याला फांद्या फुटतात. सर्वसाधारपणे प्रत्येक खोडावर ४-५ फांद्या ठेवाव्यात. खोडावर ठेवलेल्या ४-५ फांद्या वाढल्यानंतर १.५-२ फुटांवर परत शेंडा खोडावा. झाड कमी उंचीचे आणि डेरेदार करून घ्यावे. रोपांची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन असल्यास सहा महिन्यांनी शेवग्याला फुले येऊन एक वर्षाच्या आत पहिले उत्पादन मिळते. जून-जुलैमध्ये लागवड केलेल्या झाडाचा पहिला बहार मार्च-एप्रिल या महिन्यात संपतो.
त्यानंतर झाडाची छाटणी केली पाहिजे. छाटणी लवकर किंवा उशिरा करून बाजारपेठेच्या मागणीनुसार शेंगांचे उत्पादन घेता येते. वर्षातून एकदाच छाटणी करावी. गरजेनुसार फांदीचा शेंडा काढून उंची नियंत्रणात ठेवावी. छाटणी केल्यानंतर खोडावर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावे.पीक संरक्षण- कीड १) पाने खाणारी अळी : क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन १.५ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.२) फळमाशी : नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रामाणात फवारणी करावी.रोग १ ) करपा : कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मँकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रामाणात फवारणी करावी.२ ) मररोग (मुळकुज) : कार्बेंडाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑंक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी द्रावणाची आळवणी करावी.काढणी व उत्पादन- शेंगा जातीनुसार लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांत तोडणीस येतात. पुढे ३ ते ४ महिने तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात. शेंगा काढणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी.
Share your comments