शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

Thursday, 18 April 2019 07:56 AM


नदीकाठचे तसेच कॅनॉल काठच्या सिंचनाखालील क्षेत्रातील जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे अशा सिंचन क्षेत्रातील परिसरात भूगर्भातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढल्याने पाणी क्षारयुक्त झाल्याचे दिसते. विहीर किंवा बोरवेलला पाणी असूनही मनुष्यास/जनावरास पिण्यायोग्य राहिले नाही आणि शेतीला वापरताना काळजी घेतली नाही तर जमिनी क्षारपड होतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सिंचनाचे पाणी तपासून शेतीसाठी नियोजन करावे. पाणी पृथ:करणानुसार शेतीसाठी सामू हा 6.5 ते 8.0 पर्यंत असावा तर विद्युत वाहकता म्हणजे पाण्याची क्षारता ही 0.75 डेसीसायमन प्रति मीटर पेक्षा कमी असावी. ठिबक सिंचनासाठी पाण्याची विद्युत वाहकता (क्षारता) ही ३.१२ डेसीसायमन प्रति मीटर (किंवा टीडीएस 2000 पीपीएम) पेक्षा जास्त असल्यास अयोग्य समजले जाते. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या तोटयामध्ये क्षारांचे खडे होऊन ठिबक संचाची कार्यक्षमता कमी होते. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतवारी (तक्ता क्र. 1) मध्ये दिली आहे.

पाणी क्षारयुक्त होण्याची कारणे:

सिंचनासाठी पाण्याचा शेतीसाठी अमर्याद वापर, एकसारखी पिक पद्धती, पावसाचे प्रमाण कमी, सेंद्रिय पदार्थांचे जमिनीतील कमी होत असलेले प्रमाण, निचऱ्याचा अभाव आणि क्षारपड जमिनींचे वाढत असलेले क्षेत्र या सर्व बाबींमुळे भूगर्भातील पाणी क्षारयुक्त (मचूळ) झाले आहे.

जास्त क्षारयुक्त पाणी मनुष्याच्या पिण्यात आले तर मुतखड्याचे आजार जडतात, कारण या भाज्यांमध्ये ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असल्याने पाण्यातील कॅल्शियम, सोडियम सारख्या क्षारांबरोबर संयोग होऊन क्षारखडे मुत्राक्षयात तयार होतात.

क्षारयुक्त पाणी जमिनीत वापरताना घ्यावयाची काळजी:

 • हलक्या ते मध्यम चांगला निचरा असलेल्या जमिनीस क्षारयुक्त पाणी वापरावे. काळ्या खोल जमिनीस बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
 • सेंद्रिय खतांचा (शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत इ.) वापर प्रत्येक पिकास शिफारशीनुसार करावा.
 • दोन ते तीन वर्षातून एकदा तरी धैचा किंवा ताग जमिनीत पेरून नंतर फुले आल्यावर गाडावेत.
 • क्षारयुक्त पाणी चांगल्या पाण्यात मिसळून पिकांना दयावे किंवा आलटून पालटून दयावे.
 • क्षारयुक्त पाण्याचा वापर अमर्याद न करता मर्यादित हलके परंतु वारंवार दयावे.
 • पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करावा.
 • पेरणीसाठी बियाणांचा 15 ते 20 टक्के शिफारशीपेक्षा जास्त वापर करावा.
 • पिकांची लागवड सपाट वाफ्यात न करता सारी वरंबा पद्धतीने करून लागवड वरंब्याच्या बगलात करावी.
 • क्षार प्रतिकारक पिकांची निवड करावी. उदा. गहु, बाजरी, मका, ज्वारी, सोयबीन, कापुस, उस, वांगे, कोबी, पालक, शुगरबीट, आवळा, पेरू, चिक्कू, इ.
 • मात्र क्षार संवेदनशील पिकांची लागवड करू नये. उदा. वाटाणा, मुग, उडीद, चवळी, तीळ, घेवडा आणि लिंबूवर्गीय फळपिके (संत्रा, मोसंबी, लिंबू), स्ट्रोबेरी इ.

अशा प्रकारे पाणी क्षारयुक्त असल्यास वरीलप्रमाणे बाबींचा अवलंब करूनच मचूळ पाण्याचे व्यवस्थापन करावे. अन्यथा माणसांचे आणि जनावरांचे किंबहुना जमिनीची आरोग्य धोक्यात येईल आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होईल.

तक्ता क्र. 1 शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतवारी

अ.क्र.

घटक

उत्तम प्रतीचे

मध्यम प्रतीचे

अयोग्य पाणी

1

सामू

6.5 ते 7.5

 7.5 ते 8.5

8.5

2

क्षार (डेसीसायमन /मी)

< 0.25

0.25 ते 2.25

2.25

3

कार्बोनेट (मि.ई/लि)

नसावेत

0.5 ते 1.5

1.5

4

बायकार्बोनेट (मि.ई/लि)

< 1.5

1.5 ते 8.0

8.0

5

क्लोराईड (मि.ई/लि)

< 4.0

4 ते 10

10

6

सल्फेट (मि.ई/लि)

< 2.0

2 ते 12

12

7

रिसिडयुअल सोडियम कार्बोनेट (मि.ई/लि)  

< 1.5

1.5 ते 2.5

2.5

8

सोडियम शोषण गुणांक

< 10

10 ते 26

26

9

मॅग्नेशियम कॅल्शियम गुणांक

< 1.5

1.5 ते 3.0

3.0

10

बोरॉन (पीपीएम)

< 1.0

1.0 ते 2.0

2.0


तक्ता क्र. २ क्षारयुक्त पाण्याद्वारे जमिनीत मिसळणारे क्षार

पाण्याची विद्युत वाहकता

(क्षारता डेसी सायमन/मी.)

एक पाण्याच्या पाळीद्वारे (6 सेंमी) जमिनीत मिसळणारे क्षार (किलो/हेक्टरी)

0.5

192

1.0

384

1.5

576

2.0

768

2.5

960

3.0

1,152

3.5

1,344

4.0

1,536


डॉ. अनिल दुरगुडे आणि प्रकाश तापकीर
(मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, म.फु.कृ.वि. राहुरी- 413722)
9420007731/ 9421837186

saline soil क्षारपड माती कॅल्शियम ऑक्झालेट calcium oxalate saline water drip sprinkler ठिबक तुषार
English Summary: Saline Water Management for Agriculture

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.