पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील भात गिरणीधारक यांनी एकत्र येऊन जुन्नर तालुक्याच्या कांदळी गावात तांदळावर प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या कामास सुरुवात केली. जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्गदर्शनाखाली येथील औद्योगिक वसाहती जवळ ६ कोटी ६२ लाख रुपये खर्च करून अद्यावत राइस मिल क्लस्टर प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्प प्रक्रियेतून उच्च दर्जाची तांदूळ निर्मिती करणे शक्य होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या तांदळाला वाढीव भाव मिळणार आहे.
या प्रकल्पाचा लाभ प्रामुख्याने दोन्ही तालुक्यातील भट उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून ग्राहकांना देखील कणी, खडे रहित दर्जेदार तांदूळ उपलब्ध होणार आहे. या दोन्ही तालुक्यातील मावळ पट्टा विशेष करून आदिवासी परिसरात भात मुख्य पीक आहे. पारंपारीक पद्धतीने साळीपासून तांदूळ निर्मिती करताना उप्तादनात घट होते. शिवाय तांदळाची कणी होऊन तांदूळ कमी दराने देखील शेतकऱ्याला विकावा लागतो. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून या प्रकल्पातून ते नुकसान टळणार असल्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले.
तसेच या प्रकल्पाने आकर्षक तांदूळ निर्मिती शक्य होणार असून तांदळाची प्रतवारी सुधारून दर वाढीस मदत होऊन शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिवाय या प्रकल्पाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचेही आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. प्रकल्प उभारणीसाठी ६ कोटी ६२ लाख रुपये खर्च असून शासनाने पाच कोटी ३० लाख रुपये अनुदान दिले आहे.
सभासद भाग भांडवल ६६ लाख २६ हजार रुपये असून ६६ लाख २६ हजार रुपये बँक कर्ज घेण्यात आले असल्याची माहिती राइस मिल क्लस्टरचे अध्यक्ष रमेश वर्पे यांनी दिली. तर मूलभूत सुविधांमुळे या औद्योगिक वसाहती जवळ उद्योग उभारणीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचेही ते म्हणाले. प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाले. तर महाराष्ट्र बँकेचे अचल प्रबंधक राहुल वाघमारे यांच्या हस्ते अर्थसाहाय्यतेचा धनादेश संचालक मंडळाला देण्यात आला.
शिवाय प्रकल्पाला जागा उपलब्ध करून देणारे सुहास घाडगे याना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, कांदळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, उपाध्यक्ष अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र बँकेचे रोहन पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल सावंत, सरपंच विक्रम भोर, राइस मिल क्लस्टरचे अध्यक्ष रमेश वर्पे, संचालक जीवन जाधव, लक्ष्मण देठे, मधुकर बोऱ्हाडे, विकास दरेकर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
राज्यातील शिल्लक उसाला मिळणार अनुदान
इंदापूर तालुक्यास पहिल्यांदाच सलग २१ दिवस पाणी, शेतकऱ्यांमध्ये समाधान...
तापमान वाढीने केला कहर, हजारो एकरावरील पिकांना लागत आहे आग..
Share your comments