पूर्वमशागतीच्या वेळी भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
रब्बी हंगामात लागवड सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये करावी. लागवडीसाठी रुचिरा, मालदांडी 35 - 1, एम.पी. चारी, फुले अमृता या जातींची लागवड करावी. हेक्टरी 40 किलो बियाणे लागते.
पेरणी 30 सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. पिकाची वाढ झपाट्याने वाढत असल्याने सुरवातीला पहिली खुरपणी लवकर करावी.पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात असताना कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रति हेक्टरी 500 ते 550 क्विंटल एवढे आहे. ज्वारीच्या चाऱ्यात आठ ते दहा टक्के प्रथिने असतात.
मका
कमी कालावधीत भरपूर हिरव्या वैरणीच्या उत्पादनासाठी मक्याची लागवड करावी. मक्याच्या चाऱ्यापासून मुरघासही तयार करता येतो.
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन निवडावी. अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते व भरपूर उत्पादन मिळते. योग्य मशागत करून शेणखत मिसळून ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद - 2, विजय या जातींची निवड करावी.पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. कोणत्याही परिस्थितीत पेरणी बियाणे फोकून करू नये.पेरणीच्या वेळी 50 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा.
पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी.
कापणी साधारणपणे 50 टक्के पीक फुलोऱ्यात (65 ते 70 दिवसांनी) आल्यावर करावी. हिरव्या चाऱ्यात नऊ ते अकरा टक्क्यांपर्यंत प्रथिने असतात. प्रति हेक्टरी 500 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
Share your comments