याची लक्षणे तपासून योग्य उपाययोजना कराव्यात. वाढीच्या काळात अन्नद्रव्य व्यवस्थापन गरजेचे आहे.हळद लागवड होऊन १ ते ३ महिनांच्या कालावधी झाला आहे. बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. हळद सध्या शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे. हळदीची पाने पिवळी पडताना दिसत आहेत. जर पिवळेपणा वाढत गेल्यास पान अन्न तयार करू शकणार नाही. त्यामुळे उत्पादनात घट होऊन योग्य प्रत गुणवत्ता घटक जसे कुरकुमीनचे प्रमाण आदी वर देखील परिणाम होतो.*हळदीची पाने पिवळी पडण्याची कारणे*समस्यायुक्त जमिनीमध्ये लागवड हळद लागवडीसाठी क्षारपड जमीन (विद्युत वाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा जास्त),चोपण जमीन (सामू ८.५ पेक्षा जास्त आणि विनीमययुक्त सोडिअमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त ) आणि चुनखडीयुक्त जमीन (कॅल्शिअम कार्बोनेट चे प्रमाण शेकडा ५ पेक्षा जास्त) निवडलेली असेल तर अशा जमिनीत हळद पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश व कॅल्शिअम , मॅग्नेशिअम, गंधक) आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, बोरॉन) यांची उपलब्धता कमी होते.
हळदीच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडून वाढ खुंटते. परिणामी पानांवर कायम स्वरूपी पिवळसरपणा दिसून येतो.अशा जमिनीत हवा-पाणी खेळण्याचे प्रमाण व्यस्त राहते. जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमीन घट्ट बनते.जमिनीमध्ये नत्र, मॅग्नेशिअम आणि लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात.अधिक प्रमाणात पाऊस अधिक पावसामुळे जमिनीत पाणी साचून राहते, परिणामी जमीन संपृक्त होते. हवा खेळती राहत नाही.अशा स्थितीत मुळांना श्वासोच्छ्वास (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा येतो. पिकाला जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेता येत नाही. परिणामी शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.सततच्या पावसामुळे शेतात ओलावा कायम असल्यामुळे डवरणी करण्यास अडचण निर्माण होते. अति ओलाव्याने पाने पिवळी पडतात.अन्नद्रव्यांची कमतरता लागवडीपासून ते काढणीपर्यंत जातिपरत्वे हळद पीक नऊ महिने शेतात राहते.उत्पादनाचा स्रोत जमिनीत वाढणारे गड्डे (कंद) असल्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, नत्र युक्त खते जसे युरिया दिल्यास हळदीचे गड्डे खराब होतील. त्यामुळे हळद पिकास शिफारशीत मात्रेत नत्र युक्त खते मिळत नाहीत.
जमिनीतील अन्नद्रव्ये जसे नत्र, मॅग्नेशिअम आणि लोह यांची कमतरता असल्याने पाने पिवळी पडतात.ढगाळ वातावरणामुळे अपुरे प्रकाश संश्लेषणसतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. परिणामी पाने स्वतःचे अन्न (हरित द्रव्य) तयार करू शकत नाही, यामुळे पाने पिवळी पडतात.उपाययोजना जमीन व्यवस्थापनलागवडीसाठी मध्यम प्रतीची, भुसभुशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी, उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. जमिनीत गरजेपुरता सतत वाफसा असणे गरजेचे आहे. त्यामुळे बारीक तंतुमय मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते.चोपण, क्षारपड, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद लागवड करू नये. लागवडी पूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. त्यामुळे खतांचे नियोजन करणे सोयीस्कर होते.जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.८ टक्के पेक्षा जास्त असावे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर चांगले परिणाम दिसून येतात. अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा जमिनीतील सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतो.
चुनखडीयुक्त जमिनीत दरवर्षी भरपूर प्रमाणात सेंद्रिय खते मिसळल्यास आणि खोल नांगरट करून गंधकाचा वापर केल्यास चुनखडीचा पिकावरील वाईट परिणाम कमी करता येतो. हिरवळीची खते उदा. ताग, धैंचा घेऊन ती ४५ ते ५० व्या दिवशी जमिनीत गाडावीत.अधिक पाऊस झालेल्या प्रदेशांमध्ये शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेता बाहेर काढावे. कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे आळवणी किंवा फवारणी करावी.हळद बेण्यास जैविक (जीवाणू संवर्धक) बीजप्रक्रिया करावी. अझोस्पिरीलीम १० ग्रॅम + स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक १० ग्रॅम + व्हॅम २५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. ही जीवाणूजन्य खते जमिनीद्वारे दिलेली रासायनिक खते पिकाला सहज उपलब्ध करून देण्यास मदत करतात. प्रक्रिया केल्यामुळे बेणे कीड,रोगांना बळी पडत नाही.अन्नद्रव्यांचे नियोजन नत्राची कमतरता असल्यास युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रती लिटर पाणी) याप्रमाणे पानांवर फवारणी करावी.रासायनिक खतांचा वापर करताना नत्र अमोनिअम सल्फेटद्वारे, स्फुरद डाय अमोनिअम फॉस्फेटद्वारे आणि पालाश सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे हळद दिल्यास खतांची आणि पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
रासायनिक खते पृष्ठभागावर फोकून देऊ नयेत, ती जमिनीत पेरून मातीत मिसळून द्यावीत.सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. लोह हे फेरस सल्फेट द्वारे, झिंक हे झिंक सल्फेट द्वारे, बोरॉन हे बोरक्स द्वारे जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावे. नैसर्गिक चिलेट म्हणून त्याचा उपयोग होतो, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. हळदीला (पावडरला) गर्द पिवळा रंग येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुरकुमीन घटकाची योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी गंधक हे आवश्यक असते.पाने लोहाच्या कमतरतेमुळे पिवळी पडल्यास पानांवर ५० ग्रॅम फेरस अमोनिअम सल्फेट किंवा फेरस सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ३ ते ४ वेळा फवारणी करावी.फवारणीसाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चीलेटेड स्वरूपात असल्यास उपलब्धता वाढते. फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणीचे प्रमाण १० ते २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी असे ठेवावे. फवारणीसाठी शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-२ लिब्रेल चिलीमिक्स काॅबी, प्रिवी मायक्रोन्यूट्रीन, रानडे मिकनेल्फ ३२.या पैकी एक माती परीक्षण अहवाला नुसार खत घ्यावी जमिनीमध्ये लोह आणि जस्ताची कमतरता असल्यास शिफारशीत खत मात्रे बरोबर शिफारशीत प्रमाणात सुक्ष्म अन्नद्रव्ये हे रासायनिक खते तसेच शेणखतात मिसळून द्यावीत.
Share your comments