हळदीच्या बियाणे लागवडीसाठी एकरी 10-12 क्विंटल बेण्याची गरज असते, रोपनिर्मिती करुन लागवड केल्यास खर्चात बचत होते. तसेच हळदीची उन्हाळ्यात लागवड असल्याने अधिक तापमानात कंदांच्या उगवणीवर परिणाम होत असतो. उगवणीस सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागतो.
शिवाय उगवण शंभर टक्के न झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो व 15 मे ते 25 मेच्या दरम्यान लागवड केल्यास पुढे पाणी देण्याची अडचण भासू शकते. याकरिता हळदीचे रोपे बनवून लागवड केली जाते.
हळद रोपनिर्मितीकरिता एक डोळा पद्धतीचे ओले हळकुंड निवडावे. त्यास शिफारसयुक्त कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. रोपे वाढवण्यासाठी कोकोपीटचा वापर केला तर उत्तमच. यासाठी पॉली ट्रे व कप यांचाही वापर करावा लागतो.
हे ही वाचा- गुलखैरा शेती करा आणि कमी दिवसात मिळवा दुप्पट नफा, ही आहे एक औषधी वनस्पती
हळकुंडाचे डोळे लावल्यानंतर ट्रे एकावर एक ठेवून प्लॅस्टिक पेपरने सर्व बाजूंनी ते झाकून ठेवले जातात. सुमारे दहा दिवस तशा अवस्थेत ट्रे ठेवल्यानंतर ते काढून घ्यावेत. शेडनेट जाळीच्या सावलीत ते बेडवर घ्यावेत. 14 व्या दिवशी ह्युमिक ऍसिड व 19:19:19 या खताची फवारणी घ्यावी.
20 ते 22 दिवसांनी कोवळ्या पानांवर करपा प्रतिबंधक म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोपे चांगली वाढीस लागली की सुमारे 30 ते 35 दिवसांनी रोपांची पुनर्लागवड करावी. एकरी सुमारे 23 हजार रोपे पुरेशे होतात. पुनर्लागवड करण्याअगोदर बेड पूर्णपणे भिजवून घ्यावेत. त्यानंतरचे व्यवस्थापन हे बियाणे वापरुन केलेल्या हळद लागवडीप्रमाणेच करावे.
ओल्या हळकुंडापासून एक क्विंटलमध्ये एका एकरासाठी लागणारी सुमारे 22 ते 23 हजार रोपे तयार करता येतात.
या पद्धतीमुळे लागवड एक महिना उशिरा केली तरी चालते. जमिनीत हळकुंडे सुटण्यास लवकर सुरवात होत असल्याने उगवण क्षमता चांगली राहते. पर्यायाने उत्पादन वाढते. सात महिन्यांनी ओली हळद काढून ती मार्केट मध्ये विकता येते. हळदीच्या बियाणे लागवडीसाठी एकरी 10-12 क्विंटल बेण्याची गरज असते, रोपनिर्मिती करुन लागवड केल्यास खर्चात बचत होते. ही हळद लोणच्यासाठीही उपयोगी येते.
डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
9422221120
Share your comments