इस्रायल मधील तेल अविव विद्यापीठाच्या वनस्पती विज्ञान आणि अन्न सुरक्षा विभागातील लिलॅक हडनी यांच्या अभ्यास गटाने असे सिद्ध करून दाखविले आहे की त्रास झाल्यावर वनस्पती किंकाळ्या फोडतात. तो आवाज 5 मीटरपर्यंत जातो. त्या आवाजाची वारंवारता 20 हजार ते 1 लाख हर्टझ इतकी असते. मानवी कानाची श्रवणक्षमता 20 ते 20 हजार हर्टझ इतकीच असल्याने या वनस्पतीच्या किंकाळ्या आपल्याला ऐकू येत नाहीत. मात्र वनस्पतींवर अंडी घालणाऱ्या पतंगांना ते आवाज ऐकू येतात. जास्त आवाज करणार्या झाडापासून पतंग दूर राहणे पसंत करतात.
टोमॅटो तसेच तंबाखू या वनस्पतींवर हे प्रयोग करण्यात आले. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा किंकाळ्यांची नोंद घेण्यात आली आहे. या प्रयोगात वनस्पतींना पाण्याचा तीव्र अभाव आणि खोड खुडणे अशा प्रकारचे त्रास देण्यात आले.
तोंड नसूनही वनस्पती हे श्रवणातीत आवाज कशा निर्माण करतात?
वनस्पतींमध्ये जलवाहिन्या असतात. वनस्पतींना कोणत्या प्रकारची इजा झाली, पाण्याची कमतरता झाली, कीटकांचा हल्ला झाला तर या जलवाहिन्यांमध्ये बुडबुडे तयार होतात. ते फुटतांना श्रवणातीत आवाज होतात. याच वनस्पतींच्या किंकाळ्या. या अन्य वनस्पतींना ऐकू येतात का? त्यामुळे त्या सावध होतात का? याबद्दल प्रो. हडनी म्हणतात की वनस्पती आवाज करतात असे आम्हाला आढळले मात्र त्यांना ते आवाज ऐकण्यासाठी अवयव कुठे आहे याबाबत शोध चालू आहे. परागीभवन करणाऱ्या कीटकांच्या आवाजाला वनस्पतींच्या फुलांतून प्रतिसाद मिळतो असे आम्हाला आढळले मात्र श्रवणातीत ध्वनी नेमका कुठून ऐकत असतील ते अजून कोडे राहिले आहे.
हडनी यांनी प्रथम आपले प्रयोग नीरव शातंता असणाऱ्या बंद खोल्यांमध्ये केले आणि नंतर आवाजबंद नसलेल्या हरितगृहांमध्येही केले. पाण्याअभावी सुकणाऱ्या टोमॅटोच्या रोपातून तासाला 35 वेळा तर तंबाखूच्या रोपातून तासाला केवळ 11 वेळा आवाज आले. तर खोड वा पाने खुडली जाताना टोमॅटोने ताशी 25 आणि तंबाखूने ताशी 15 वेळा आवाज केले.
हरितगृहात सुपोषित टोमॅटोचे पाणी दहा दिवस तोडले तेव्हा पहिल्या तीन दिवसात अत्यल्प आवाज आले.
चौथ्या ते सहाव्या दिवसात किंकाळ्याचे प्रमाण वाढत गेले. त्यानंतर वनस्पती वाळल्यावर हे आवाज बंद झाले. या काळात टोमॅटोची वारंवारता 50 हजार हर्टझ तर तंबाखूची 55 हजार हर्टझ होती. खोडाला आघात होताना हीच अनुक्रमे 57 आणि 58 हजार हर्टझ होती
या प्रयोगाबद्दलची अधिक माहिती bioRxiv येथे मिळेल.डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात हे तपासण्यासाठी 1900 साली विद्युत चुंबकीय क्षेत्र वापरले होते. वरील प्रयोगात श्रवणातीत ध्वनीचा वापर केला आहे.प्रो. हडनी यांच्या प्रयोगांच्या पुनर्तपासण्या चालू आहेत. वनस्पती संशोधनात यामुळे एक नवा मार्ग सापडू शकतो हे नक्की.
लेख संकलित आहे.
डाँ.मानसी पुणेकर
Share your comments