1. कृषीपीडिया

गहू पिकावरील कीड व रोग नियंत्रण

गहू पिकावर अनेक किडीं येत असल्या तरी आपल्या विभागात या पिकावर मुख्यतः खोडकिडी, मावा, तुडतुडे, वाळवी इत्यादी व पानावरील व खोडावरील तांबेरा , करपा, काणी इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या उपाययोजना कराव्यात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
गहू पिकावरील कीड व रोग नियंत्रण

गहू पिकावरील कीड व रोग नियंत्रण

१) मावा -  गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असतो. हे किटक लांब व वर्तुळाकार असते. या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोड व चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या किडीचे नियंत्रणासाठी शेतामध्ये पिवळे चिकट कार्डचा (स्टिकी ट्रॅप) वापर एकरी पाच ते दहा या प्रमाणात लावावे. तसेच थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) एक ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड पाच ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

२) तुडतुडे :

हे किटक आकारने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातुन रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन ती वाळु लागतात. व पिकांची वाढ खुंटते तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ईसी) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.

३) वाळवी किंवा उधई -

या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसुन येतो. ही किड गव्हाच्या रोपाची मुळ खाते. व त्यामुळे रोपे वाळतात व संपूर्ण झाड मरते

वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावे आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे तसेच फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आणि जमिनीमध्ये निंबोळी पेंड २०० किलो प्रति हेक्टरी टाकावी.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

 तांबेरा

गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार :

विविध भागांत तापमानाच्या अनुकूलतेनुसार गव्हावरील तांबेऱ्याचे विविध प्रकार आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण मध्य भारतात खोडवरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोन प्रकार आढळून येतात. उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत परिसरात पिवळा तांबेरा दिसून येतो.

२) पानांवरील नारिंगी तांबेरा :

हा रोग पक्सिनिया रेकॉनडिटा या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पाने व देठांवर आढळतो. गव्हाची पाने व खोडावरील देठांवर नारंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर ही लक्षणे दिसतात. रोगग्रस्त पानांवरून हलके बोट फिरविल्यास नारिंगी रंगाची भुकटी बोटास लागते. या तांबेरावाढीस १५ अंश सेल्सिअस ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्याक असते.

 

३) पिवळा तांबेरा :

हा रोग पक्सिनिया स्ट्रीफोरमीस या रोगकारक बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये पिवळ्या रंगाचे बारीक पूरळ पानांच्या शिरांवर सरळ रेषांत दिसून येतात. गव्हावरील पिवळा तांबेरा हा रोग प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळतो.तसेच वाढीस अनुकूल तापमान १५ अंश ते २० अंश सेल्सिअस असते. या रोगाची तीव्रता जास्त आर्द्रता व पर्जन्यवृष्टीच्या ठिकाणी वाढते. पिवळा तांबेरा हा महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही.

४) काळा व नारिंगी तांबेरा रोगाचा प्रसार :

गहू पिकावरील तांबेरा रोगाची बुरशी फक्त गव्हाच्या जिवंत पिकावरच आपले अस्तित्व टिकवू शकते. ज्या वेळेस मैदानी प्रदेशातील गव्हाची काढणी संपते, त्या वेळेस या बुरशीचे बीजाणू नाश पावतात. गव्हावरील तांबेऱ्याची बुरशी ही दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी व पलणी टेकड्यांवर वर्षभर असते.

 

तांबेरा नियंत्रणासाठी उपाय

रोगाचा प्रादुर्भाव होताच २०० मि.लि. प्रोपिकोनॅझोल प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. किंवा दोन ग्रॅम मॅन्कोझेबकिंवा दोन ग्रॅम

कॉपर ऑक्झिंक्लराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तांबेरा रोगास बळी न पडणाऱ्या किंवा तांबेरा प्रतिकारक्षम जातींची शिफारशीनुसार निवड करावी. रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते. सध्या लागवड करण्यात येणाऱ्या काही जातींत पानांवरील नारिंगी तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आणि काही संशोधन संस्थांनी अलीकडे विकसित केलेल्या गव्हाच्या जाती तांबेरा प्रतिकारक आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पंचवटी, गोदावरी, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू- ३४, तपोवन किंवा नेत्रावती हे सर्व वाण तांबेरा प्रतिकारक आहेत.

एक वेळा तांबेरा प्रतिबंधक जातीची लागवड केल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या गव्हाचा वापर शेतकरी पुढील वर्षी बियाणे म्हणून करू शकतात. कारण गव्हामध्ये परस्पर संकर नसतो किंवा हे पीक स्वपरागीकरण (सेल्फ पॉलिनेटेड) करणारे आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक असणाऱ्या जातींची उत्पादन क्षमता जास्त असते. या जाती खतांच्या वाढीव मात्रांना चांगला प्रतिसाद देतात, तसेच त्या बुटक्यार असल्याने वाऱ्याने लोळतही नाहीत.

 

 काजळी किंवा काणीः

हा रोग युस्टीलँगो ट्रिटीसी या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. ही बुरशी गहू पिकाच्या फुलांवर वाढते. दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. ही काळी भुकटी म्हणजेच काणी. या रोगाची थंड आणि आर्द्र हवामानात अधिक वाढ होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

पानावरील करपाः

हा रोग अल्टरनेरिया ट्रिटीसिना या रोगकारक बुरशी मुळे होतो. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात अल्टरनेरिया करपा हा रोग येतो. रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पान करपते. १९ ते २० सेल्सियस तापमान, सतत दमट हवामान असल्यास या रोगाचा प्रसार होतो.गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच *मॅन्कोझेब* हे बुरशीनाशक २५ ग्रॅम अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

 

संकलन:-प्रविण सरवदे

English Summary: Pest and disease control on wheat crop Published on: 07 November 2021, 08:00 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters