पिकांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे असणे खूप गरजेचे असते. जर आपण पिकांना लागणाऱ्या पाण्याचा विचार केला तर ते अति जास्त प्रमाणात देखील चालत नाही आणि कमी प्रमाण देखील पिकांना हानिकारक ठरते. त्यामुळे भरघोस उत्पादनासाठी पिकांना व्यवस्थित पाण्याचे नियोजन करणे खूप गरजेचे असते. आपण पिकांना द्यायच्या पाण्याचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये हे खूप आव्हानात्मक काम असते.
उन्हाळ्यामध्ये मका, ऊस, भुईमूग तसेच केळी सारखे पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. जर या पिकांपासून भरघोस उत्पादन हवे असेल तर पाण्याचे व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण या पिकांना उन्हाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे? या बद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
उन्हाळ्यात अशाप्रकारे करा पाण्याचे व्यवस्थापन
1- मका- जर आपण मका या पिकाचा विचार केला तर जास्त करून जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची सोय उन्हाळ्यामध्ये या पिकाच्या माध्यमातून होते. या पिकाचा दुहेरी वापर केला जातो तो म्हणजे एक धान्यासाठी व दुसरा म्हणजे जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी.
या पिकाची लागवड तीनही हंगामामध्ये करता येते. बाष्पीभवनावर आधारित हवामानाच्या 0.60 बाष्पाकांप्रमाणे 8 सेंटिमीटर खोलीचे प्रमाण आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दिल्यास उत्पादन चांगले मिळते.
2- ऊस- उसाच्या पिकाला पाणी भरपूर लागते. त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. ऊस पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही. जर ताण पडला तर उत्पादनात घट 100% येते.
त्यामुळे तुमच्या जमिनीची स्थिती म्हणजेच मगदूर पाहून दहा दिवसांच्या अंतराने ऊसाला पाणी देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला शक्य झाले तर पाचटाचे आच्छादन देणे गरजेचे असून पाण्याचे व्यवस्थापन करताना एक सरी सोडून पाणी दिले तर पाण्यात बचत होते. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करत असाल तर ते एका दिवसाआड करणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:चिंता मिटली: द्राक्षावरील डाउनी मिल्ड्यू रोगावर प्रभावी स्वदेशी बुरशीनाशक तयार
3- कांदा-हे एक महत्त्वाचे पीक असून महाराष्ट्र मध्ये भरपूर ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते. जर कांदा पिकाला लागणारे पाण्याचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पाण्याची गरज या पिकाला असते व वाढीच्या कालावधीत जमिनीचा मगदूर पाहून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
4- कापूस- बरेच शेतकरी बागायती कपाशीची लागवड मार्च एप्रिल महिन्यामध्ये करतात. त्यासाठी कपाशीची खोली जमिनीत 90 सेंटिमीटर ते एक मीटर असणे गरजेचे असून बाष्पीभवन गुणांक प्रमाणे 7 सेंटीमीटर खोलीचे पाणी 0.75 गुणांकास दिल्यास कपाशीचे उत्पादन चांगले मिळते.
तसेच कपाशी पिकाची पाने फुटण्याची व फूले लागण्याच्या वेळेस तसेच फुलोरा अवस्था व बोंडे वाढण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचे व्यवस्थापन काटेकोर करणे गरजेचे आहे. यावेळेस कपाशीला पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कपाशी पिकाच्या वानांचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर एकूण पाण्याची गरज लागते.
5- भुईमूग-उन्हाळी भुईमूग साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लावला जातो.उन्हाळी भुईमूग पिकास 70 ते 80 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते व ते 12 ते 13 पाळ्याच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. भुईमूग पिकाला आर्या लागण्याच्या वेळेस तसेच शेंगा भरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडू देऊ नये.
तसे पाहायला गेले तर या पिकास कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा ताण सहन होत नाही म्हणून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी व्यवस्थापन करावे.
Share your comments