केळी फळपिकानंतर सर्वात जास्त उत्पाद्कीय क्षमता असलेल्या पपई पिकाची लागवड आपल्या संपूर्ण राज्यात होते. सर्वसधारणपणे जुन-जुलै, फेब्रुवारी - मार्च, तसेच ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पपई लागवड केली जाते. पपई लागवडीसाठी रोप तयार करुन ४० ते ४५ दिवसांचे रोप लागवडीसाठी वापरले जाते. पपई शेतीत अन्नद्रव्ये व्यवस्थापनाला विशेष महत्त्व दिले आहे. आपल्या भागात उपलब्ध असणाऱ्या सर्व संकरीत जाती आपल्या १६-१८ महिन्यांच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांना उत्तम प्रतिसाद देतात. पपईच्या विक्रमी उत्पादनासाठी १ ते २ वेळा खत देण्याऐवजी एकूण खतांची मात्रा विभागून वेगवेगळ्या पीक अवस्थेमध्ये देणे आवश्यक असते. यामध्ये रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक असते. योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी, अधिक उत्पन्नाकरिता लागवडीअगोदर माती परिक्षण करून घेणे आवश्यक आहे. जमिनीच्या दर्जा पाहून सेंद्रिय खतमात्रा वापरणे जरुरीचे आहे. योग्य अन्नद्रव्ये नियोजनामुळे जमिनीचा पोत सुधारतो, निचरा उत्तम राहतो आणि जमिनीची पाणीधारणक्षमता वाढते, परिणामी विक्रमी उत्पादन मिळते.
सेंद्रिय खते -
मध्यम खोल साधारण जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी एकरी २५-३० बैलगाड्या गावखत आणि गाळ जमिनीत टाकावा. भारी व खोल जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी एकरी १५-२० बैलगाड्या गावखत व गाळ जमिनीत टाकावा. गावखत उपलब्ध नसेल तर शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. मात्र हे खत उत्तम कुजलेले असावे, त्यात न कुजणाऱ्या वस्तूंचा समावेश नसावा.
रासायनिक खते -
पूर्व मशागतीच्या वेळी गावखत व तलावातील गाळ टाकल्यानंतर; लागवडीनंतर ५० ग्रॅम प्रति झाड १०:२६:२६ द्यावे. त्यानंतर खालीलप्रमाणे रासायनिक खतांचा वापर करावा.
लागवडीनंतर १ महिन्याने- १०० ग्रॅम १०:२६:२६,
लागवडीनंतर २ महिन्याने- २०० ग्रॅम एम.ओ.पी.
लागवडीनंतर ३ महिन्याने- २५० ग्रॅम डी.ए.पी.
लागवडीनंतर ४ महिन्याने- २५० ग्रॅम डी.ए.पी.
लागवडीनंतर ५ महिन्याने- २५० ग्रॅम डी.ए.पी.
लागवडीनंतर ६ महिन्याने - २५० ग्रॅम १९:१९:१९
लागवडीनंतर ७ महिन्याने- २५० ग्रॅम १९:१९:१९
लागवडीनंतर ७ महिन्याने- २०० ग्रॅम एम.ओ.पी.
शेणकाला रबडी -
या खतांशिवाय शेणकाला रबडी वापरली तर दर्जेदार व वजनदार फळे मिळतात. केवळ रबडीमुळे झाडांना सुक्ष्य अन्नद्रव्ये देणे शक्य होते. रबडी दिल्याने झाडांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात उपयुक्त जीवाणू मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यांच्या कार्यामुळे झाडांना नत्र, स्फुरद व पालाश अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात. रबडी वापरामुळे दर एकरी ८० ते ८५ टन उत्पादन मिळालेली उदाहरणे आहेत.
रबडी तयार करण्यासाठी १०० किलो शेण ४०० लिटर पाण्यात भिजत घालावे. शेणाबरोबरच १० किलो फेरस सल्फेट, १० किलो मेंग्नीशियम सल्फेट व १० किलो बोराक्स मिसळावे. हे मिश्रण काठीने हलवून चांगले एकजीवी करावे. २४ तासंनातर पुन्हा ते काठीने हलवावे. हि रबडी वापरताना
यात पुन्हा ६०० लिटर पाणी मिसळून ते एकजीवी करून २४ तास ठेवून मग वापरावे. या प्रक्रियेत सर्व सुक्ष्य अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात.
हे मिश्रण दर झाडी एक लिटर दर महा किमान सात वेळा दिल्यास परिणाम दिसून येतो. ठिबकाच्या खाली रेख पद्धतीचा वापर करून रबडी देण्यात यावी. रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर रबडीचा वापर करावा. रबडी मिश्रण दिल्याने पाने गर्द हिरवी होतात; पिवळी दिसत नाहीत. झाडाची जोमदार वाढ होते तसेच फळांची संख्या आणि फळांचे वजन वाढते. फळातील पोकळी कमी होऊन गर वाढतो.
Share your comments