शास्त्रीय पद्धतीने दर्जेदार कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान

24 November 2020 12:23 PM By: KJ Maharashtra

कांदा हे कंद प्रवर्गात मोडणारे अतिशय महत्वाचे भाजीपाला पिक आहे. जगात भारत कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत अग्रेसर असला, तरी प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या बाबतीत बराच मागे आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची लागवड केली जाते. कांद्याच्या प्रती हेक्टरी उत्पादन वाढीसाठी उच्च प्रतीच्या बियाणाची आवश्यकता असते पर्यायी कांदा बिजोत्पादन हे अतिशय महत्वाचे ठरते. कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करतात. नंतर दुसऱ्या वर्षी या मातृकंदापासून बिजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो.

कांदा बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि तंत्र याकडे शेतकर्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा जातीची शुद्धता खालावत जाते. आकार, रंग आणि कांदा तयार होण्याच्या काळ यात एकसारखेपणा राहत नाही. परिणामी जोड कांदे व डेंगळे यांचे प्रमाण वाढते. उत्कृष्ट दर्जाचे कांदा बियाणे तयार करण्याविषयी शास्ञीय माहिती घेऊ.

जमीनिची निवड -

 • कांदा बिजोत्पादनासाठी सुपिक, मध्यम ते मध्यम भारी, वाळूमिश्रित, भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
 • तसेच चोपण, क्षारयुक्त, हलक्या अथवा मुरमाड जमिनीत कांदा बिजोत्पादन चांगले होत नाही अथवा घेऊ नये.

हवामान-

 • कांदा हे मुख्यत: हिवाळी हंगामातील पीक आहे. महाराष्ट्रातील सौम्य हवामान कांदा लागवडीस उपयुक्त आहे.
 • कांदा लागवडीपासून १ ते २ महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
 • ढगाळ व पावसाळी वातावरण हानिकारक ठरते.
 • बीजधारणा होऊन ते पक्व होण्याच्या सुमारास तसेच काढणीच्या वेळी हवा कोरडी, भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान पोषक ठरते.

विलगीकरण अंतर-

 • अनुवांशिक शुद्धता राखण्याकरिता, परागीभवन प्रकारावरून विलगीकरण अंतर ठरविले जाते.
 • कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते.
 • त्यामुळे दोन भिन्न जातींच्या बिजोत्पादन क्षेत्रामध्ये ५ मीटर तर पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनाकरीता अनुक्रमे १००० व ५०० मीटर अंतर आवश्यक आहे.

बिजोत्पादन पद्धती- कांद्याचे उत्पादन दोन पद्धतीने करता येते.

 

 • बियांपासून बी तयार करणे :-

या प्रकारात प्रथम ऑगस्ट मध्ये बियांपासून रोपे तयार केली जातात व नंतर रोप लागवण केली जाते. कांदा तयार झाल्यानंतर काढणी न करता तसाच शेतात ठेवला जातो. याच कांद्यापासून एप्रिल-मे महिन्यात बी तयार होते. परंतु या प्रकारात अनुवांशिक शुद्धता राखण्यात अडथळे येत असल्याने हि पध्दत आपल्याकडे वापरली जात नाही.

 • कांद्यापासून बी तयार करणे

दर्जेदार बिजोत्पादनासाठी या पद्धतीला शेतकऱ्यांची पसंती आहे. या पद्धतीमध्ये, प्रथम नेहमीप्रमाणे कांद्याचे पिक घेतले जाते व त्यापासून मिळालेल्या कांद्याचे (बेणे) बिजोत्पादन घेतले जाते. या पद्धतीचे दोन उपप्रकार आहेत.

 1. एकवर्षीय पध्दत

या पद्धतीमध्ये मे-जून महिण्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार करावीत. रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी. कांदा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला कावला जातो. हा काढलेला कांदा दोन ते तीन आठवडे शेतात सावलीत सुकवला जातो. जोड आणि डोंगळ कांदे काढून मध्यम आकाराचे एककेंद्री व रंग, आकाराने सारखे असणारे कांदे (बेणे) निवडून लागवड नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये केली जाते. जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत फुलांचे दांडे बाहेर पडून में महिन्यापर्यंत बी तयार होते. महाराष्ट्रात या पद्धतीचा खरीप जातीच्या बिजोत्पादनासाठी वापर केल्या जातो.

 1. दीवर्षीय पद्धत

या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिण्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार केली जातात. रोपांची पुनर्लागवड डिसेंबर-जानेवारी महिन्यात केली जाते. मे महिन्यात कांदा काढणी करावी. यातून मध्यम आकाराचे, बारीक मानेचे व जातीच्या गुणधर्मानुसार कांदे निवडून त्यांची साठवणूक केली जाते. निवडलेल्या कांद्यांची (बेण्यांची) ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते. डिसेंबर-जानेवारी मध्ये फुलकांडे निघून में पर्यंत बी तयार होते. या पद्धतीचा रबी जातीच्या बिजोत्पादनासाठी वापर केल्या जातो.

बेण्याची निवड व लागवड-

 • कोणत्याही कांद्याच्या जातीच्या ब्रीडर किवा फौंडेशन सीड पासून तयार केलेल्या कंदामधून पुढे बिजोत्पादणासाठी कांदे निवडावे.
 • बिजोत्पादनाकारीता बेण्याचा (कांद्याचा) आकार आणि वजन यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
 • बेणे हे नेहमी बारीक मानेचे, मध्यम आकाराचे व जातीचा गुणधर्म (रंग, आकार) दाखवणारे तसेच साठवणूकीस उत्तम असेच निवडावे.
 • जोड, डोंगळ असलेले, मोठ्या आकाराचे, सालपट निघालेले, कोंब आलेले व रोगट कांदे (काजळी असलेले) अजिबात वापरू नयेत.
 • लागवडीकरिता २.५ ते ३.५ से.मी. व्यासाचे, ४० ते ५० ग्रॅम वजनाचे कांदे वापरल्यास १५ ते २० किंटल बेणे लागते तर ४.५ ते ६.५ से.मी. व्यासाचे व ६० ते ७० ग्रॅम वजनाचे कांदे वापरल्यास २५ ते ३० किटल बेणे लागते.
 • लागवडीची पद्धत म्हणजे सरी वरंबा व सिंचन यानुसार हि मात्रा बदलते.

 

लागवडीची पध्दत व अंतर-

 • लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
 • लागवडीसाठी कांद्याचा मानेकडचा १/४ भाग कापून टाकावा जेणेकरून कोंब लवकर बाहेर पडतील.
 • ऑक्टोबर – नोव्हेंबर च्या लागवडीकरिता सरी पद्धत व दोन ओळीतील अंतर ६० से.मी तर दोन झाडांमधील अंतर ३० से.मी. ठेवावे.
 • कंद मातीमध्ये पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी, कंद उघडे पडल्यास नांगे येणे, झाडाची संख्या कमी होणे या गोष्टी घडतात.

 

खत व्यवस्थापन-

 • लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर २०-२५ टन शेणखत, त्याच बरोबर २.५ किलो ट्रायकोडर्मा प्रती हेक्टरी चांगले मिसळावे.
 • कांदा पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फूरद व ५० किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
 • त्यानंतर ३० व ४५ दिवसांनी ५० किलो नत्र दोन भागात विभागून प्रति हेक्टरी दयावे.
 • १९:१९:१९ हे खत १ टक्के ३० आणि ६० व्या दिवशी फवारणी करावे, ०:०:५० ची फवारणी ६० व्या दिवशी करावी.
 • सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास, त्याची फवारणी ३० व्या दिवशी देऊ शकतो.

 

आंतरमशागत-

 • लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी या करावी.
 • आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.
 • ४०-४५ दिवसांनी निंदनी केल्यास तण नियंत्रित राहील. त्याच वेळी अर्धी सरी फोडून भर द्यावी. याबरोबर दांडे मोडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

 

पाणी व्यवस्थापन-

 • जमिनीच्या मगदुरानुसार लागवडीनंतर ८-१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • कांद्याच्या मुळापाशी पाणी साचणार नाही हो याची काळजी घ्यावी, बिजोत्पादन करताना विशेषकरून पिक फुलोर्यात आल्यानंतर आणि बीज धारणा होताना पाणी देणे आवश्यक आहे.

पिक संरक्षण-

 • कांद्यामध्ये फुलकिडे, फुले कुरतडणारी अळी व करपा या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने रासायनिक औषधांच्या फवारण्या निरीक्षणाअंती कराव्या.
 • तसेच कांद्याची पात चकचकीत असल्यामुळे त्यावर औषध थांबून राहण्यासाठी स्टीकर गरजेनुसार घ्यावे.
 • शक्यतो फुले उम्ल्यानंतर फवारणी करणे टाळावे.

 

क्षेत्रीय तपासनी संख्या व भेसळ काढणे-

 • बिजोत्पादन पद्धती नुसार कांदा बिजोत्पादन करताना पिकाच्या विवीध टप्यांवर क्षेत्रीय तपासणी करणे आवश्यक असते.

 

बियांपासून कांदा तयार करणे :- या पद्धतीमध्ये दोन क्षेत्रीय तपासण्या आवश्यक आहेत.

 

1 रोपांची पुनर्लागवड केल्यावर

 1. दुसरी कांदा काढणी वेळेस.

 

कांद्यापासून बी तयार करणे :- या पद्धतीमध्ये चार क्षेत्रीय तपासण्या कराव्यात.

 1. फुले येण्याच्या अगोदर,
 2. पिक फुलोऱ्यात असताना आणि
 3. बियाणे परिपक्व होताना.
 • बियाणाची शुद्धता राखण्यासाठी भेसळ काढणे अतिशय आवश्यक आहे.
 • बिजोत्पादन क्षेत्रातील रोगट तसेच जातीनुसार गुणधर्म न दाखवणारी झाडे काढून टाकावी.
 • लागवडीसाठी बारीक मानेचे, मध्यम आकाराचे व जातीय गुणधर्म असणारे कांदे निवडावेत.

पूरक पराग सिंचन -

 • कांद्यामध्ये परागीभवन प्रामुख्याने मधमाश्याद्वारे होते.
 • या मधमाश्या आपल्या बिजोत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या प्लॅाटच्या चारी बाजूने तसेच मधून जर गाजराचे, कारळाचे आणि मोहरीचे बी टाकले तर मधमाशाचे प्रमाण वाढते.
 • मधमाशा आकर्षित करणारे हि पिके कांदा पिकाच्या फुलोरा येण्याआधी फुले येतील, अश्या पद्धतीने लागवड करावी.
 • आपण मधमाश्याच्या पेट्या एकरी दोन किवा तीन फुले उमलल्यानंतर ठेऊ शकता.

 

इतर आवश्यक बाबी-

 • जातीच्या गुणधर्माशी न जुळणारे कांदे पायाभूत कांद्यामध्ये ०.१० टक्के (संख्येने) पेक्षा जास्त नसावे, तर प्रमाणित कांद्यामध्ये ०.२० टक्के (संख्येने) पेक्षा जास्त नसावे.

काढणी-

 • गोंडांचा रंग तपकिरी व त्यातून काळे बी दिसत असेल तर समजायचे बियाणे काढणीला आले आहे. असे गोंडे १०-१५ से.मी. देठ ठेऊन कापून घ्यावेत.
 • काढणी सकाळच्या वेळी फायदेशीर राहते. कारण सकाळच्या वेळी वातावरणात आद्रता असते. गोंड्यावर हलकासा ओलावा असल्याने बी गळून पडण्याची भीती राहत नाही.
 • सर्वच गोंडे एकाच वेळी परिपक्व ही होत नसल्याने, जसे तयार होतील तसे काढून घ्यावेत.
 • काढलेले गोंडे स्वच्छ जागेवर उन्हात वळवून घ्यावे व हलकेसे काडीने बदडून बियाणे वेगळे काढावे.
 • बियाणातील केरकचरा वेगळा करून बियाणे स्वच्छ करून घ्यावे. म्हणजे बियाण्याची शुद्धता चांगली राहील.

बी सुकवणे व बियाची साठवण-

 • मळणी केलेल्या बियात १० ते १२ टक्के आद्र॔ता असते. असे बी पुन्हा उन्हात सुकवून ६ ते ७ टक्के आद्र॔ता झाल्यानंतर साठवणीत ठेवावे. कारण त्यापेक्षा जास्त आद्र॔ता असल्यास बियांची उगवण क्षमता कमी होते.
 • स्वच्छ केलेले बियाणे कापडी पिशवी किंवा गोणीत साठवून ठेवावे, असे बियाणे १ वर्षापर्यंत टिकते.
 • परंतु बीजप्रक्रिया केलेले बियाणे प्लास्टिकच्या (४०० गेजची) हवाबंद बॅगेत सीलबंद करून ठेवल्यास २ ते ३ वर्षापर्यंत चांगले राहू शकते असे निदर्शनात येते.
 • ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाला हे बियाणे १० – १५ महिने नीट राहते. शीतगृहमध्ये १५ अंश सेल्सिअस तापमानाला आणि ३० ते ४० टक्के आद्र॔तेला बियाणे ३ ते ४ वर्ष टिकू शकते.

उत्पादन - सर्वसाधारणपणे कांदा बियाणाचे प्रती हेक्टरी ६-८ क्विंटल उत्पादन मिळते.

 

लेखक:

प्रा. सोमनाथ दत्तात्रय ढमाळ (MSc. Agri. GPB)

वनस्पतीशास्त्र विभाग,

श्रमशक्ती कृषि महाविद्यालय मालदाड,

मो.न.-७३८७२००७२०; ई-मेल-somnathdhamal4@gmail.com

 

onion onion seeds
English Summary: Onion seed production scientific method

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.