जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते-
जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. (एक एकरात ८ टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
स्फुरद व पालाश:-
सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.
जमिनीचा सामू:-
सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी (CEC):-
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.
सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.
कर्बाचा पुरवठा:-
कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करुन देतात.
सेंद्रिय खतांचा परिणाम:-
सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
Share your comments