1. कृषीपीडिया

मिश्रखतांतील घटकांचे प्रमाण

हे जमीन कशी व कोणत्या प्रकाराची आहे, तीत कोणती पिके घ्यावयाची आहेत यांवर अवलंबून असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मिश्रखतांतील घटकांचे प्रमाण

मिश्रखतांतील घटकांचे प्रमाण

हे जमीन कशी व कोणत्या प्रकाराची आहे, तीत कोणती पिके घ्यावयाची आहेत यांवर अवलंबून असते. उपयुक्ततेप्रमाणे ह्या खतांची सूत्रे ठरविली जातात. उदा., १०-६-४, २-१२-६, ०-१२-१५ इ. खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही मूलद्रव्ये नायट्रोजन, फॉस्फरस पेंटॉक्साइड व पोटॅशियम ऑक्साइड या स्वरूपातच नसली, तरी खतातील त्यांचे प्रमाण याच स्वरूपात व्यक्त करण्याची पद्धत आहे. इतर मूलद्रव्ये त्यांबरोबर असल्यास त्यांच्या प्रमाणांचाही उल्लेख केला जातो.

मिश्रखते दोन प्रकारांनी तयार करतात, पहिल्या प्रकारात ते वापरण्यापूर्वी शेतावर तयार केले जाते. ह्यात मिश्रण सिमेंटाच्या जमिनीवर करतात व ते लगेच वापरले जाते त्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे कारखान्यातच अगोदर तयार केलेले मिश्रण. सर्व खते शुष्क-मिश्रण संयंत्रात (यंत्र संचात) मिसळून, फॉस्फेटयुक्त व पोटॅशयुक्त खतांमध्ये अमोनिया मिसळून,

सुपरफॉस्फेटयुक्त व इतर खते मिसळून इ. विविध पद्धतीच्या यंत्रांनी हे मिश्रण तयार केले जाते. मिश्रखते बनविण्यापूर्वी निरनिराळी खते योग्य प्रमाणात घेऊन एकजिनसी होईपर्यंत मिसळतात. त्यापूर्वी त्यांचे रासायनिक विश्लेषण करण्यात येऊन पाहिजे त्या मिश्रणांचे मिश्रखत बनवितात. सर्व खते कुटून, चाळून फिरत्या मिश्रकात चांगली एकत्र करतात व नंतर पोत्यात भरून विक्रीस पाठवितात.

मिश्रखते बनविताना त्यांत विनिर्देशित प्रमाणानुसार पोषक द्रव्ययुक्त खते, मिश्रण घट्ट होऊ नये व जमिनीला प्रत्यक्ष देण्याच्या वेळी योग्य स्थितीत रहावे यांसाठी पीट, भुईमुगाची टरफले, भाताचा कोंडा यांसारखे कमी प्रतीचे जैव पदार्थ, मिश्रणातील नायट्रोजनयुक्त खत अम्लीय स्वरूपाचे असल्यास त्याच्या उदासिनीकरणासाठी डोलोमाइटी चुनखडकासारखे क्षारकीय पदार्थ तसेच मिश्रणाचे वजन आवश्यक तितके राखण्यासाठी वाळू, माती आणि राख यांसारखे अपशिष्ट पदार्थ मिसळतात.

दाणेदार खते : मिश्रखतांचा मुख्य दोष म्हणजे त्यांतील मिश्रण कित्येक वेळा एकजिनसी नसते. असे खत शेतात टाकल्यावर त्यातील घटक वेगवेगळ्या ठिकाणी पडू शकतात. तसेच ते भुकटीच्या स्वरूपात असल्याने वाऱ्याने उडून जाण्याची शक्यता असते. पेरणी यंत्रात ते अडकून कामात अडथळा येतो. हे दोष टाळण्यासाठी मिश्रखते दाणेदार स्वरूपात बनविली जातात. मिश्रखतांप्रमाणेच यूरिया, सुपरफॉस्फेट, अमोनियम सल्फेट इ. खतेही दाणेदार स्वरूपात तयार केली जातात.

नायट्राेजनयुक्त खतांसाठी वापरण्यात येणारी गुठळी पद्धती दाणेदार मिश्रखतांना उपयुक्त ठरत नाही. यासाठी निराळ्या पद्धती वापरतात. सुरुवातीस वापरली गेलेली पद्धत म्हणजे ‘ओली-सुकी’ पद्धत होय. ती प्रथम इंग्लंडमध्ये वापरली गेली. सध्या ती यूरोपमध्ये वापरली जाते. ह्या पद्धतीत पाणी किंवा वाफ वापरतात. यामुळे मिश्रखताचा गठ्ठा होतो व पुढे तो वाळवून त्याचे दाणे तयार करतात. ह्या पद्धतीने कमी प्रतीचे दाणे मिळतात व पद्धत खर्चिकही आहे.

दाणे तयार करण्याची आधुनिक पद्धती ही सापेक्षतः मोठ्या घनफळाच्या द्रव अवस्थेचा वापर करणे, कमीतकमी पाण्याचा वापर करून द्रव अवस्थेचे इष्ट ते घनफळ मिळविण्यासाठी उच्च तापमानावर विद्राव्य असलेल्या लवणांचा वापर करणे आणि द्रव व घन अवस्थांच्या प्रमाणांवर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवणे या तत्त्वांवर आधारलेली आहे. या पद्धतीत द्रव पदार्थ आणि घन पदार्थ दाणे बनविण्याच्या यंत्रात मिसळतात. येथे उच्च तापमानावर दाणे बनतात. नंतर ते सर्व चाळून वाळवितात. साठवण्यापूर्वी दाणे थंड केल्यास जास्त काळ टिकतात. दाणेदार खते विविध प्रकारांनी बनवितात, पण प्रत्येक पद्धतीत साधारणतः वरील टप्पे वापरले जातात.

काही वेळा पाण्याऐवजी सजल अमोनिया किंवा द्रवरूप नायट्रोजनयुक्त संयुगे वापरतात. यामुळे त्यातील मुक्त अम्ल उदासीन होऊन नायट्रोजनाचे प्रमाण वाढते. पण अमोनिया जास्त वापरला गेला, तर अविद्राव्य फॉस्फेटे तयार होतात.

दाणेदार खतांचा एक दोष म्हणजे त्यांतील घटक एकमेकांच्या अगदी सान्निध्यात असल्याने त्यांच्या एकमेकांशी रासायनिक विक्रिया होऊ शकतात.

द्रवरूप व वायुरूप खते : निर्जल अमोनियाचा खत म्हणून प्रथम जे. ओ. स्मिथ यांनी १९३० मध्ये वापर केला. पण त्याचा प्रत्यक्ष वापर १९५० नंतर अमेरिकेत वाढला. 

हा अमोनिया जमिनीत १५ सेंमी. खोल विशिष्ट यंत्राद्वारे दिला जातो.

सजल अमोनिया खत म्हणून वापरणे खर्चाचे आहे. तथापि तो निर्जल अमोनियासारखाच यंत्राद्वारे काही प्रमाणात वापरतात. सजल अमोनिया साठविण्यास व हाताळण्यास अवघड आणि खर्चिक असतो. तसेच त्यातील नायट्रोजनाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे ‘नायट्रोजन विद्राव’ या नावाने ओळखले जाणारे विद्राव वापरणे सोयीचे ठरते. ह्या विद्रावांत मुक्त अमोनिया नसतो व नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असते. या विद्रावांतील घटकांचे प्रमाण निरनिराळे असते. अशा एका प्रमुख विद्रावात अमोनियम नायट्रेट, यूरिया आणि पाणी यांचे मिश्रण असते. उच्च संहती आणि जमिनीखाली देण्याची जरूरी नसल्यामुळे यूरिया–अमोनियम नायट्रेट विद्राव हे खत लोकप्रिय झाले आहे. याशिवाय यूरिया आणि अमोनियम नायट्रेट यांचे पाण्यातील विद्रावही वापरतात ह्यांशिवाय द्रवरूप मिश्रखतेही तयार करतात. ही खते लहान कारखान्यांत बनवून स्थानिक रीत्या वापरतात. द्रवरूप खते फार पूर्वीपासून वापरात आहेत. पण मोठ्या प्रमाणावर ती १९५० नंतरच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान येथे वापरण्यात येऊ लागली आहेत. द्रवखते उष्ण-मिश्रण पद्धत  शीत-मिश्रण पद्धत या पद्धतींनी तयार करतात.

 

शेतकरी मित्र

विजय भुतेकर सवणा

English Summary: Mixed fertilizer content limits Published on: 11 January 2022, 12:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters