लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची महत्त्वाच्या मागणीची दखल घेत यापुढे किसान रेल्वे आठवड्यातून चार दिवस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.
गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमवेत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत मंत्री पवार यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेची दखल घेत मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातून आठवड्यातून तीन दिवस सोडण्यात येणारी किसान रेल आता चार दिवस सोडण्यात येणार आहे. यामुळे आता शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथून सोमवारपासून किसान रेल्वे रवाना झाली. किसान रेल्वेला सद्या आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार असा तीन दिवस होती. आठवड्यातून चार ते पाच दिवस किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली होती. डॉ. पवार यांनी रेल्वे मंत्रींशी चर्चा करून सोमवारपासून लासलगाव येथे किसान रेल्वेला थांबा देण्यात आला.
सोमवारी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी लासलगाव रेल्वे स्टेशन येथे किसान रेल्वेचे स्वागत केले. व्हीपीचे पूजन केले. यावेळी स्मिता कुलकर्णी, राजाभाऊ चापेकर, मुख्य पार्सल आधिकरी विजय जोशी, सतीश सोळसे, राम साळवे, सागर शिरसाठ, कुणाल केदारे आदी उपस्थित होते. लासलगाव येथून दानापूरला ९६ टन कांदा रवाना करण्यात आला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळिंबांसह फळे व भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी नावाजलेली आहे.
सध्या लासलगाव व परिसरात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्षमाल पाठविण्यासाठी येथील व्यापारी व शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून लासलगाव व परिसरातील शेतमाल किसानसेवा रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरगांवी पाठविता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या लासलगाव स्टेशनवर किसानसेवा रेल्वेचे सध्या एकच VP, पार्सलव्हॅन आहे, त्याऐवजी चार ते पाच पार्सलव्हॅनची गरज आहे. ते वाढवण्यात यावे, अशी मागणी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे.
Share your comments