कंदमाशी ही कीड महाराष्ट्रातील हळद उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही कीड हळदीमध्ये अत्यंत घातक व नुकसानकारक आहे. ही कीड कंदकुज होण्यास मुख्यत: कारणीभूत आहे.त्याकरिता कंदकुज आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कंदमाशीचे व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या
उपाययोजना कराव्यात जेणेकरून पुढे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.Measures should be taken so that further damage can be avoided.कंदमाशी - कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.या किडीच्या अळ्या उघड्या कंदामध्ये शिरून
त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा कंदामध्ये नंतर बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. अशा झाडांची पाने पिवळी पडतात आणि खोड व कंद मऊ होतात आणि त्यांना पाणी सुटून ते कुजतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते.सततचा पाऊस आणि जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.
व्यवस्थापन:१. ऑगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.२.जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
३.उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.४.पीक तण विरहित ठेवावे.५.जमिनीतून क्लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी.६.कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
७. कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.८.हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.९.तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे.८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.
(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.अशाप्रकारे कंद माशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन भविष्यात होणारे नुकसान टाळावे.
डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी ०२४५२-२२९०००
Share your comments