सध्याचे ढगाळ वातावरण आणि सततचा रिमझिम पाऊस यामुळे बऱ्याच भागात उसावर पायरीला (पाकोळी)या रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पायरीला ह्या कीडीचे वेळेवर व्यवस्थापन न केल्यास ही कीड जास्त प्रमाणात नुकसान करू शकते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ह्या किडीला ओळखून खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.किडीची ओळख - या किडीची मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये आणि आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला शिरेजवळ ४-५ ओळीत पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते, एका पुंजक्यामध्ये ३० ते ४० अंडी असतात. अंड्यावर मेणचट दोऱ्यासारखे आवरण असते.
अशा अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात ज्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात आणि शरिरावर मेणचट आवरण असते. तर प्रौढ फिकट पिवळसर रंगाची आणि पाचरीच्या आकाराची असतात. नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे - ही कीड वर्षभर सक्रिय असते परंतु वाढीसाठी सर्वात जास्त अनुकूल काळ जुलै ते सप्टेंबर या महिन्यात असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ उसाच्या पानातील रस शोषून घेतात The pupae and adults of these insects suck the sap from the sugarcane leavesत्यामुळे उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात, तसेच हि किड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ तिच्या शरीरातून बाहेर सोडते त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखा रंग चढून पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते.
वाढीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास उसाच्या उत्पादनात घट होते तर पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्यास साखर उताऱ्यात घट होते.एकात्मिक व्यवस्थापन - १.उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी त्यामुळे कीडनाशकाची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल.२.ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.४.नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.५. जुनी वाळलेली पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत जेणेकरून पुढे होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल.६.पानावर अंडी पुंज आढळून आल्यास अशी पाने अंडी पुंजासह जमा करून नष्ट करावीत ७.निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू ठेवावा.
८.वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.९.व्हर्टिसिलियम लिकॅनी अथवा मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.१०.इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे व इतर मित्र कीटकांचे संवर्धन करावे जेणेकरून नैसर्गिकरित्या किडींचे व्यवस्थापन होईल त्याकरीता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.११.उपलब्ध झाल्यास इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे ४००० ते ५००० कोष अथवा ४ ते ५ लाख अंडी शेतामध्ये सोडावीत.१२.रासायनिक व्यवस्थापनकरिता प्रति पान ३ ते ५ पिल्लं किंवा प्रौढ अथवा १ अंडीपुंज दिसून आल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के ६०० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के २०० मिली प्रति एकर फवारावे.आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी
डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी ०२४५२-२२९०००
Share your comments