1. कृषीपीडिया

भाजीपाला शेती, वांग्याचे रोपे लावल्यानंतर ‘या’ किडीचा होतो प्रादुर्भाव

वांग्यावरील अळींचे व्यवस्थापन

वांग्यावरील अळींचे व्यवस्थापन

भाजीपाला शेतीत अनेक प्रकारचे भाजीपाल्यांचे उत्पन्न घेतले जाते. अनेक शेतकरी वांग्याचे पीक घेत असतात. या पिकात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो, तर शेतकरी बंधूंनो आज आपण वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी व तिचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी काही मूलभूत बाबी जाणून घेणार आहोत.

वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा नुकसानीचा प्रकार : शेतकरी बंधूंनो वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी एक महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव रोप लावल्यानंतर काही आठवड्यात सुरू होतो सुरुवातीला ही अळी पानाच्या देठात, कोवळ्या शेंड्यात, फुलात किंवा फळात शिरून आतील भाग खाते.या किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात.

पीक फुलोऱ्यावर आल्यावर ही अळी वांग्याची कळी पोखरून आत शिरते त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून सुकून जमिनीवर गळून पडतात. वांग्याला फळे लागल्यानंतर या किडीची अळी अवस्था सुरुवातीला वांग्याच्या फळाला भोक करून फळात शिरते व तिच्या विष्टेद्वारे प्रवेश द्वार बंद करते, त्यामुळे बाहेरून फळ किडलेले आहे हे ओळखू येत नाही. नंतर ही अळी फळात शिरल्यावर वांग्याचा गर खाते व तिची विष्ठा आतच सोडते व अशी कीडग्रस्त फळे अयोग्य ठरतात. सुरुवातीला अळी ही पांढऱ्या रंगाची असते नंतर १५ ते २० दिवसांनी ती गुलाबी रंगाची दिसते.

वांग्यावरील शेंडा व फळ  पोखरणाऱ्या अळी करिता एकात्मिक व्यवस्थापन योजना : 

वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार खालील एकात्मिक व्यवस्थापन करावे.

 (1) या किडीच्या व्यवस्थापनाकरिता शेतकरी बंधूंनी सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच एकट्या-दुकट्या प्रादुर्भावग्रस्त झाडाचे शेंडे व व फळे तोडून अळ्यासहित त्यांचा नायनाट करावा.

(2) वांग्याचे पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी वांगी पिकांमध्ये एकरी चार ते पाच कामगंध सापळे पीकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. त्यात शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीची गोळी (Lure) वापरावी. या कामगंध सापळ्यात वांग्यावरील शेंडे अळी व फळ पोखरणाऱ्या अळीचे नर पतंग अडकून नर व मादी पतंगाच्या मिलनात अडथळा निर्माण होऊन या किडीच्या पुढील पिढीचा प्रतिबंध केला जातो..

(3)  सुरुवातीला  Azadirachtin आझादिराच्छिन एक टक्के  ईसी (नीम बेस्ड) १०००० पीपीएम ३० मीली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

 

उपलब्धतेनुसार प्रति एकर ६० हजार ट्रायकोग्रामा चीलोनिस या मित्र गांधीलमाशीची अंडी म्हणजेच साधारणत २ ते ३ ट्रायकोकार्ड प्रती एकर वांग्याच्या पानाच्या मागच्या साईडने चिटकून ठेवल्यास या अंड्यातून बाहेर पडणारी ट्रायकोग्रामा ही मित्र गांधील माशी वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या अंड्यात अंडे घालून या शत्रु किडीचा नाश करते.

 ४ ) वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेल्यास वर निर्देशित उपाय योजनेबरोबर गरजेनुसार योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशित प्रमाणात फवारणी करावी.  

५) Chlorantraniprole क्लोरानट्रानिप्रोल १८.५ एससी ४ मिली अधिक १० लिटर पाणी किंवा Lambda Cyhalothrin लॅंबडा सिहॅलोथ्रिन ५ % EC पाच मिली अधिक १० लिटर पाणी किंवा  Thiodocarb थिओडाकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी  १५ ते २० ग्रॅम अधिक १० लिटर पाणी  किंवा  Pyriproxyfen पायरीप्रॉक्सीफेन ५ टक्के + Fenpropathrin फेनप्रोपाथ्रीन  १५ ईसी या संयुक्त कीटकनाशक १० मिली १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी.

६) गरजेनुसार व प्रादुर्भावानुसार किटकनाशकाचा पुन्हा वापर करावयाचा झाल्यास एकच एक कीटकनाशक न वापरता तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सल्ला घेऊन कीटकनाशक बदलून फवारणी करावी.

 

 कीडनाशके फवारणी करताना अनेक कीडनाशकाची एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे व प्रमाण पाळावे. कीडनाशकांची फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा तसेच सुरक्षा किटचा वापर करावा तसेच फवारणी केल्यानंतर संबंधित कीडनाशकांचे अंश फळ किंवा भाजीपाला बाजारात नेण्यापूर्वी राहणार नाहीत यासाठी रसायने फवारल्यानंतर पीक काढणीपूर्व कालावधी लक्षात घेऊन पिकाची काढणी करावी व कीडनाशकांचे अंश संबंधित पिकात राहणार नाहीत, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

टीप : (१) रासायनिक कीटकनाशके फवारणी करण्यापूर्व लेबल क्‍लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच कीटकनाशकाचा वापर करावा.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters