आपल्या सोयाबीन तूर उडीद मूग हरभरा टोमॅटो मिरची वांगी कांदा हळद संत्रा डाळिंब, पपई या व यासारख्या अनेक पिकावर जमिनी द्वारे बियाण्याच्या मार्फत पसरणारे अनेक रोग हे फायटोप्थोरा, फ्युजॅरियम,Sclerotium, Rhizoctonia यासारख्या हानीकारक बुरशीमुळे होऊ शकतात. या हानिकारक बुरशी मुळे मर,मूळकुजव्या, कॉलर रोट,खोडकुज मूळकूज यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेतकरी बंधूंनो ह्या जशा हानीकारक बुरशी आहेत तसेच निसर्गाने शेतकऱ्यांना वरदान ठरणारी ट्रायकोडर्मा नावाची मित्र बुरशी सुद्धा जमिनीमध्ये उपलब्ध करून दिली आहे.बदलत्या हवामानामुळे, बदलत्या पीक पद्धतीमुळे,वाढत्या सिंचनामुळे जमिनीतील रोगकारक बुरशीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच वेळा रासायनिक बुरशीनाशके वापरून देखील शेतकऱ्यांना पीक जळणे, उबळणे, मर ,मुळ कुज खोड कुज यासारख्या रोगाचे प्रभावी व्यवस्थापन मिळत नाही त्यासाठी सुरुवातीपासून दर्जेदार ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास या जमिनीतून प्रादुर्भाव होणाऱ्या रोगाचे प्रभावी व्यवस्थापन मिळू शकते.(२) ट्रायकोडर्मा रोग व्यवस्थापनात कसे कार्य करते?ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी जमिनीतील हानीकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व त्यातील पोषक द्रव्ये शोषून फस्त करते त्यामुळे अपायकारक बुरशीचा बंदोबस्त मिळतो.
ट्रायकोडर्मा ही बुरशी अन्नद्रव्य शोषणासाठी शत्रु बुरशी बरोबर स्पर्धा करते त्यामुळे अपायकारक बुरशीला लागणारे कर्ब नत्र व्हिटॅमिन इत्यादीची कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते. याव्यतिरिक्त ट्रायकोडर्मा ही बुरशी Glyotoxin व Viridin नावाची प्रतिजैविके निर्माण करते. ही ही प्रतिजैविके रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरतात. ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीचे कवक तंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढतात त्यामुळे रोगकारक बुरशीचे कवक तंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे जमिनीतून होणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगाचे प्रभावी व्यवस्थापन मिळते.(३) ट्रायकोडर्मा कोणत्या रूपात उपलब्ध होऊ शकते?ट्रायकोडर्मा पावडर व द्रव स्वरूपात उपलब्ध होऊ शकते(४)) ट्रायकोडर्माचा वापर कसा करावा?(a) ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया : सोयाबीन तुर उडीद मूग हरभरा यासारख्या पिकात पेरणीपूर्वी चार ते पाच ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी. द्रव स्वरूपात ट्रायकोडर्मा उपलब्ध असल्यास सर्वसाधारणपणे पाच ते दहा मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.(b) ट्रायकोडर्माचा जमिनीत वापर : जमिनीतून वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध करता दर्जेदार ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास साधारणपणे 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकरी एक ते दोन किलो ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी जमिनीत
पसरवून वखराची पाळी देऊन चांगले मिक्स केल्यास हळूहळू पोषक वातावरणात ही मित्र बुरशी जमिनीत वाढायला लागते व शत्रू बुरशी पासून प्रतिबंध देते. सोयाबीन तूर उडीद मूग हळद या व यासारख्या अनेक पिकांमध्ये या पद्धतीने ट्रायकोडर्माचा वापर करता येतो. शेडनेट हाऊस व पॉलिहाऊसमध्ये सुद्धा भाजीपाला फुल पिक लावण्यापूर्वी जमिनीत अशा पद्धतीने ट्रायकोडर्माचा वापर केल्यास मूळकूज मर कॉलर रोट यासारख्या रोगाचा शेडनेट हाऊस मध्ये चांगला प्रतिबंध मिळू शकतो. सतत दोन ते तीन वर्ष जमिनीत योग्य पोषक वातावरणात ट्रायकोडर्माचा वापर केल्यास जमिनीत ट्रायकोडर्मा वाढीस चालना शकते मिळू शकते. फळ पिकात उदाहरणार्थ संत्रा मोसंबी पपई यासारख्या पिकात शिफारशीप्रमाणे शेणखतात मिक्स करून जमिनीत ट्रायकोडर्माचा वापर करता येईल.(c) ट्रायकोडर्माचा ठिबक सिंचनाद्वारे जमिनीत वापर : संत्रा मोसंबी लिंबू पपई, हळद,मिरची वांगे टमाटे कांदा या व इतर फळ व भाजीपाला पिकामध्ये द्रवरूप ट्रायकोडर्मा साधारणपणे एकरी दोन ते पाच लिटर एक दिवस आड ड्रीप चालवून विभागून ट्रायकोडर्माचा वापर करून जमिनीतील बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधकरिता बरेच शेतकरी वापर करतात व व त्यांच्या या बाबत चांगला अनुभव आहे असे सांगतात.(d) ट्रायकोडर्मा चा द्रावणात रोपे बुडवून वापर : भाजीपाल्याची ची रोपे गादीवाफ्यावर लागवडीसाठी तयार झाल्या नंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा या बुरशीचे 500 ग्रॅम अधिक पाच लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करावे व या द्रावणात रोपाची मुळे पाच मिनिटे बुडवून नंतर त्याची लागवड करावी.ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात उपलब्ध असल्यास साधारणता 500 मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा पाच लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व या द्रावणात रोपाची मुळे पाच मिनिटे बुडवून नंतर त्याची लागवड करावी.
(४) ट्रायकोडर्मा चा प्रभावी वापर करण्यासाठी घ्यावयाची काळजी.(a) ट्रायकोडर्माची कार्यक्षमता वाढण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात टाकावे.(b) ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकिट किंवा बॉटल घरी नेल्यानंतर थंड जागी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी व शक्य तितक्या लवकर तिचा वापर करावा.(c) रासायनिक निविष्ठा बरोबर एकत्र करून ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू नये. ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम ऍझोटोबॅक्टर पीएसबी या जैविक खताची बीज प्रक्रिया करता येते. रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास प्रथम करावी नंतर ट्रायकोडर्मा सारख्या जैविक निविष्ठाची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक बुरशी नाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्मा ची मात्रा दुप्पट करावी.(d) ट्रायकोडर्माचा वापर करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे करावा.(e) ट्रायकोडर्मा खरेदी करता कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या जैविक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळा ,तसेच इतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या नामांकित कंपन्या व मान्यताप्राप्त उद्योजक यांचेकडून खरेदी करू शकता.(५) ट्रायकोडर्मा संदर्भात उपलब्धता व इतर बाबतीत अधिक माहिती करता श्री भगवान देशमुख जैविक किड व्यवस्थापन प्रयोग शाळा कृषी विज्ञान केंद्र वाशिम यांचे 90 11 97 0 522 या क्रमांकावर आवश्यकतेनुसार संपर्क करू शकता.
राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम
Share your comments