1. कृषीपीडिया

जाणून घेऊया जैविक शेती कशासाठी?

मी शरद के. बोंडे आपल्याला जैविक शेती कशासाठी करावी जाणून घेऊ

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घेऊया जैविक शेती कशासाठी?

जाणून घेऊया जैविक शेती कशासाठी?

जरी भारतात जैविक शेतीचा ४००० वर्षाचा इतिहास असला तरी आज भारतात तुलनेने खूप कमी शेतकरी जैविक शेतीचा अवलंब करत आहेत. जैविक शेती विषयी जगातल्या प्रगत देशामधील शेतकऱ्यांना आणि पाश्चात्य देशातील शेतकऱ्यांना आज भारतीय शेतकर्यांपेक्षा जास्त माहिती आहे आणि ते शेतकरी जैविक शेती पद्धतीचा आज चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेत. वास्तवात जैविक शेती पद्धती ५० ते ६० वर्षापूर्वी भारतात चांगल्या प्रकारे प्रचलित होती पण देशात हरितक्रांतीच्या गोंडस नावाखाली झालेल्या रासायनिक खतांच्या आगमनानंतर जैविक शेती पद्धती हळूहळू लयास गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जैविक शेती भारतातील असूनही आज बहुसंख्य भारतीय शेतकऱ्यांना ती माहित नाही पण जैविक शेतीचा अंगीकार केलेले बहुसंख्य शेतकरी आपणास पाश्चिमात्य देशात पाहण्यास मिळतात.शेंद्रिय शेतीचे किंवा जैविक शेतीचे अनेक फायदे आहेत. हि शेती पद्धती शेतकऱ्याच्या आणि पर्यायाने देशाच्या हिताची आहे यात वाद नाही. जैविक शेतीमुळे उच्च दर्जाचे उत्पादन तर शक्य होतेच पण त्यासाठी उत्पादन खर्च वाढत नाही, उलटपक्षी उत्पादन खर्च कमी होतो. जैविक पद्धतीने बनवलेली फळे, भाजीपाला, धान्य आणि दुध यांना रासायनिक खते आणि तृन नाशके वापरून केलेल्या उत्पादना पेक्षा जास्त बाजारभाव मिळतो. आज जैविक पद्धतीने बनवलेल्या शेतमालाला बाजारात जास्त भावतर मिळतोच शिवाय तो माल बाजारात लवकर विकला सुद्धा जातो. आंतरराष्ट्रीय बझार पेठेत सुद्धा जैविक मालाची निर्यात केली जाऊ शकते. शेंद्रिय शेती पाण्याची बचत करते. शेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शेतीसाठी पाणी कमी लागते. जैविक शेतीचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे या पद्धतीने पर्यावरणाचे रक्षण होते व जमिनीची धूप थांबून दुष्काळाचा जन्म होत नाही.

सर्वात प्रथम जैविक शेती पद्धती मातीच्या पुनुरुत्जीवनाचे कार्य करते. मागील कित्येक वर्षांमध्ये आपण रासायनिक पदार्थांचा आपल्या शेतीमध्ये वापर केला आणि बहुतांश शेतकऱ्यांनी प्रमाणापेक्षा जास्त रसायनांचा वापर केला. यामुळे माती अम्लधर्मि (असिडिक) बनत गेली. ज्या वेळी माती अम्लधर्मि होते त्यावेळी मातीतील शेंद्रिय घटकांचे रुपांतर वनस्पती उपयोगी पोषक तत्वामध्ये करणारे कृषी उपयुक्त जीवाणू नष्ट पावतात किंवा आकार्यशील बनतात. त्यामुळे वनस्पतींचे पोषण अशा मातीत व्यवस्थित होत नाही आणि त्याचा उत्पादनावर परिणाम पडतो. वर्षानुवर्षाच्या रासायनिक खतांच्या आणि कीटक नाशकांच्या प्रमाणापेक्षा जास्त उपयोगामुळे कृषी उपयोगी जीवाणूंची संख्या आणि शक्ती कमी कमी होत गेली. आज अनेक ठिकाणी माती पूर्णपणे अम्लधर्मि (असिडिक) बनली आहे आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होतो आहे. आम्लधर्मि (असिडिक) मातीचा दुसरा एक वाईट परिणाम हा आहे कि आम्लधर्मी मातीत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक तत्वे असलीतरी त्यांचा वनस्पतींना फायदा होत नाही कारण पोषक तत्वे पिके शोषु शकतील अशा विद्राव्य अवस्थेत मातीत राहत नाहीत. याचा अर्थ असा कि आम्लधर्मी मातीत बाहेरून पोषक तत्वे कितीही घातली तरी ती वनस्पतींना पोहचत नाहीत परिणामी उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम पडतो. मातीमधील आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी गुणांचे प्रमाण ठरवणाऱ्या एककाला pH (hydrogen potenz) असे संबोधतात. जर pH ६ ते ८ च्या मध्ये असेल तर या pH मध्ये बहुतांश वनस्पती किंवा पिके चांगल्या प्रकारे वाढतात. जर pH ७ च्या खाली असेल तर जमीन आम्लधर्मी बनते आणि जर pH ७ च्या वर असेल तर जमीन अल्कधर्मी बनते. बहुतांश पिकांच्या निकोप वाढीसाठी जमीन जास्त आम्लधर्मी किंवा जास्त अल्कधर्मी नसावी लागते. अति आम्लधर्मी किंवा अति अल्कधर्मी जमिनींचा पोत सुधारण्यासाठी शेंद्रिय खत मदत करते. शेंद्रिय खतामुळे अति आम्लधर्मी किंवा अति अल्कधर्मी जमिनीमधील माती शुद्ध किंवा 'neutral' होते आणि पिकांच्या वाढीसाठी जमीन सुयोग्य बनते.

शुध्द मातीच्या जमिनीमध्ये बिजांची अंकुरण क्षमता वाढवणाऱ्या फायदेशीर जीवाणूंची वाढ होते ज्यामुळे अशा मातीत बियांचे अकुंरण चांगल्या प्रकारे होते. शेंद्रिय खतामुळे मातीतील 'हुमस' वाढतो ज्यामुळे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध पोषक तत्वांची उपलब्धता वाढते. शेंद्रिय खताच्या उपस्थितीत पिकांना पोट्याशिअम, मग्नेशिअम, लोह, क्यालशिअम, फोस्फोरास, इत्यादी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे योग्य प्रमाणात प्राप्त होतात.जैविक शेतीमुळे पिकांचे चांगल्या प्रकारे पोषण होते आणि त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. जैविक शेती पद्धतीने निर्माण केलेली फळे, भाजीपाला किंवा पिके जास्त रुचकर तर लागतातच या शिवाय ती उच्च दर्जाच्या पोषक तत्वांनी युक्त असतात. या शिवाय जैविक शेतीमाल दृष्टीस अत्यंत मोहक आणि फ्रेश वाटतो. पिकांच्या चांगल्या पोशानामुळे पिकांच्या अंगी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे कीड नियंत्रणासाठी रासायनिक पदार्थांचा वापर कमी केला जाऊ शकतो. रसायन विरहित किंवा कमीतकमी रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे विषरहित शेती करणे शक्य होते. अशा प्रकारे जैविक शेती पद्धती मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसेंदिवस शेतांमध्ये वापरत येणाऱ्या रसायनांचे प्रमाण इतके वाढले आहे कि भारतात कित्येक ठिकाणी शेतीतील रासायनिक द्रव्ये जमिनीत जाऊन जमिनीतील पाण्यात तीमिसळल्याने तेथील पाणी आज पिण्यासाठी योग्य राहिले नाही. शेतीतील रसायनांच्या वापराने कित्येकांना क्यान्सर, किडनीक्षय यासारख्या असाध्य रोगांची लागण झाली आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.भारतात आणि इतर ठिकाणी केलेल्या अभ्यासात अजून एक महत्वाची बाब स्पष्ट झाली आहे ती हि कि जैविक खताच्या वापरामुळे पिकांसाठी लागणाऱ्या पाण्यात ३० ते ४० टक्क्या पर्यंत बचत होते. माती जास्त काळ पर्यंत आर्द्रता धरून ठेऊ शकते आणि कमी पाण्यात पिक घेत येते याचाच अर्थ असा कि जैविक शेती पद्धतीने दुष्काळाला रोखले जाऊ शकते.

आर्थिक बाबतीत विचार केला तर जैविक शेती पद्धती गरीब शेतकऱ्यांना गरिबीच्या दुष्ट चक्रातून बाहेर ओढू शकते. जैविक शेती मुळे उत्पनावरील खर्च खूप कमी होतो. भारतात ५० टक्क्या पेक्षाजास्त शेतकरी जैविक शेतीसाठी लागणारे शेंद्रिय किंवा जैविक खत शेतकरी आपल्या घरीच बनवू शकतात. भारतात गायी आणि म्हशींची तसेच इतर पाळीव प्राण्यांची संख्या खूप जास्त आहे. या प्राण्यांच्या शेणाचा वापर करून कोठल्याही गरीब शेतकऱ्याला आपल्या गोठ्याजवळ गांडूळ खत बनवता येऊ शकते. गांडूळ खत हे सर्वोत्तम प्रकारचे जैविक खत आहे. (गांडूळ खत कसे बनवावे यासाठी याच पानावर उजव्या बाजूला लिंक पहा). साधारणपणे ज्या शेतकऱ्याकडे २ ते ३ पशु असतील तो शेतकरी वर्षाला ७ ते १० टनपर्यंत गांडूळ खत बनवू शकतो या खताद्वारे तो ३ ते ६ एकर जमिनीत जैविक शेती पद्धतीचा वापर करून उत्पादन काढू शकतो. एखादा पशुपालक ४ ते ६ जनावरांचे शेण आणि गांडूळ वापरून जैविक खताची निर्मिती करून वर्षाला दुधाव्यतिरिक्त ५०००० ते ७०००० रुपये कमवू शकतो. जैविक शेती पद्धतीचा अवलंब करून भारतात कित्येक शेतकरी समृद्ध झालेले आहेत पण तरीही हे संख्या एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत नगण्य आहे.जैविक पद्धतीने निर्माण केलेल्या शेतमालाला अंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे.भारतातील जैविक माल युरोप, अमेरिका, जपान, कॅनडा इत्यादी या देशांना निर्यात केला जातो. सन २०१३ -१४ या वर्षात भारताने ४०३ दशलक्ष डॉलर किमतीच्या जैविक मालाची निर्यात अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केली आणि हि निर्यात १००० दशलक्ष डॉलर वर घेऊन जाण्याचे भारताचे ध्येय आहे.

जैविक मालाच्या निर्यातीतून अनेक ध्येय साध्य होऊ शकतात. एकतर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली जाऊ शकते आणि या क्षेत्रामध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आज देशात १५००० पेक्षा जास्त शेतांमध्ये किंवा ११ लाख हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर जैविक शेती केली जाते पण हि संख्या वाढण्यास अजून खूप वाव आहे. भारताने १३५ प्रकारची विविध उत्पादने सन २०१३ - १४ साली अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकली आणि ती उत्पादने वाढवण्यासाठी भारत शासनाचे 'कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण' (Agricultural and processed food products export development authority / APEDA) हि संस्था कार्यरत आहे.जैविक शेतकरी त्यांचा माल बाहेरच्या देशांना विकून फक्त आपलाच नाही तर देशाचाहि फायदा करू शकतात. या शिवाय भारतात सुद्धा जैविक शेतमालाला आज चांगली मागणी निर्माण झाली आहे. जैविक शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मेट्रो मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड आहे आणि हल्ली लहान शहरांमध्ये सुद्धा जैविक शेतमालाला प्राधान्य दिले जात आहे. जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आज फायद्याची ठरू शकते. चिकाटी, प्रायोगिक वृत्ती आणि अभ्यासाने जैविक शेतीद्वारे शेतकरी आजच्या युगात एक नवी शक्ती निर्माण करू पाहत आहेत. कालपर्यंत शेतीकडे तिरकस नजरेने पाहणारे उच्च शिक्षित युवक आज जैविक शेतीकडे वळत आहेत. एत्या दहा वर्षात जैविक शेतीच्या अंगीकारामुळे भारतात अनेक चांगल्या गोष्टी घटतील यात शंका नाही.

मित्रांनो या लेखातील विचार तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना जरूर पाठवा.

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोडे.

९४०४०७५६२८

ध्येय मातीला वाचवणं

Save the soil all together

English Summary: Let's find out why organic farming? Published on: 10 May 2022, 03:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters