1. कृषीपीडिया

वसुंधरेचे आदर्श पाईक होवूयात!

सूर्यापासून तब्बल १५ कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या पृथ्वीवर सुमारे १५ लाख वर्षांपूर्वी ‛माणूस' प्राणी अस्तित्वात आला.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वसुंधरेचे आदर्श पाईक होवूयात!

वसुंधरेचे आदर्श पाईक होवूयात!

सूर्यापासून तब्बल १५ कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या पृथ्वीवर सुमारे १५ लाख वर्षांपूर्वी ‛माणूस' प्राणी अस्तित्वात आला.अमिबा, एकपेशीय सजीव आणि हळूहळू गुंतागुंत असलेले बहुपेशीय सजीव काळाच्या ओघात या पृथ्वीवर अस्तित्वात आलेत. याचवेळी समांतरपणे निसर्गही विकसित झाला आणि मग ‛मनुष्य व निसर्ग' या दोन्ही घटकांची सुंदर नाळ जुळली जी आजतागायत कायम आहे.एवढ्या साऱ्या वर्षांत वसुंधरेने आपल्याला ओंजळ भरभरून दिले. जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी निसर्गाने आपल्याला देऊ केल्यात आणि हुशार माणसाने त्या पर्यायांचा योग्य विनियोग करत आपल्या गरजाही भागवल्या.परंतु खरा प्रश्न इथून पुढे चालू होतो, जेव्हा या गोष्टींचा अतिरेक वाढतो तेव्हा, जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी आपण इतर घटकांकडे सुनियोजित कानाडोळा करतो तेव्हा, जेव्हा विकासाच्या नावाखाली आपण पृथ्वीतलावरील नैसर्गिक घटकांवर क्रूरतेचा कळस रचतो तेव्हा ! 

              आपली पृथ्वी आपलं सर्वस्व आहे. इथली जमीन, हवा,इथलं पाणी,डोंगर,नद्या,सागर, वने, अन्य वन्य व पाळीव प्राणी,पक्षी,नांनाविविध झाडेझुडपे,या सर्वांमध्ये असलेली जैवविविधता आणि या सर्वांमध्ये समन्वय साधणारा माणूस हे सर्व पृथ्वीचाचं भाग आहेत.त्यामुळे या सर्वचं घटकांना अनन्यसाधारण महत्व आहे. यातल्या एखादा घटकही वरखाली झाला म्हणजे निसर्गाचे रौद्ररूप काय असते, हे आपण बऱ्याचवेळा अनुभवले आहे.त्याला सरळ सरळ ‛निसर्गाचा लहरीपणा' म्हणून आपण मोकळे होऊन जातो.परंतु त्याच्या मुळाशी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला कळते की माणसाची कृती या गोष्टींना बऱ्याच अंशी कारणीभूत आहे.

कोणकोणत्या समस्या आहेत वसुंधरे समोर ?

(परिणामी माणसासमोर)

१) हवामान बदल : भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने २०२० साली प्रसिद्ध केलेल्या ‛भारतीय प्रदेशावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' या अहवालात काही निष्कर्ष मांडले आहेत.

• औद्योगिक क्रांती पश्चात जागतिक तापमान १ ℃ ने वाढले आहे.

• हरितगृह वायू याच प्रमाणात वातावरणात मिसळत राहिले तर २१ व्या शतकाच्या शेवटपर्यंत सरासरी तापमान ५℃ किंवा त्यापेक्षाही जास्त वाढू शकते.याही पुढे जात, या अहवालानुसार हवामान बदलावरील २०१५ च्या पॅरिस कराराची सर्व वचने पूर्ण जरी झाली तरी या शतकाच्या सरतेशेवटी जागतिक तापमान ३℃ ने वाढलेले असणार..

• हरितगृह वायुंमुळे तापमान वाढ, त्यामुळे ध्रुवांवरील बर्फ वितळणे, परिणामी एकंदरीत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, ओझोनच्या थराला छिद्र पडणे,उष्णतेच्या लाटेमुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम,अशा अनेक समस्या पुढे येणार आहेत.

२) वाढते प्रदूषण :

वाढते औद्योगिकीकरण, मानवी वसाहतींसाठी भूसंपादन, विकासकामे, वाढती लोकसंख्या या सर्वांमुळे जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचे निश्चितच दूरगामी परिणाम होणार आहेत.

•IQAir संस्थेच्या अहवालानुसार (२०२१)जगातील सर्वात प्रदूषित २० शहरांमध्ये भारतातील जवळजवळ १४ शहरे आहेत.यात राजधानी दिल्लीचाही समावेश आहे.

• सरासरी दिवसाला माणूस २२,००० वेळेस श्वासोच्छवास घेतो. त्यासाठी जवळपास १६ किलो हवेची आवश्यकता असते.त्यामुळे या हवेत किंचित प्रमाणातही सल्फर डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड असला तरी त्याचे विपरीत परिणाम नकळतपणे आपण भोगत असतो. सर्दी, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास,फुफ्फुसांचे निकामी होणे असे अनेक गंभीर परिणाम असू शकतात.

• शेतीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, पिकांचे अवशेष शेतातच जाळल्याने ( पंजाब,हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे) देशाच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. पिकाचे एक टन अवशेष जाळल्यास त्यातून अंदाजे १४६० किलो कार्बन डायॉक्साईड, १९९ किलो राख, ६० किलो कार्बन मोनॉक्साईड, २ किलो सल्फर डायॉक्साईड एवढे प्रदूषण होते.

३) ओझोन थराचा ऱ्हास: 

रेफ्रिजरेटर, ए.सी. यामध्ये वापरला जाणारा क्लोरोफुरो कार्बन जवळजवळ ६० ते ४०० वर्ष तसाच टिकून राहतो.त्यातला क्लोरीन घटक वेगळा होऊन ओझोन सोबत क्रियाशील होतो.त्याचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर होऊन सूर्याची अतिनील किरणे रोखून धरण्याची ओझोनची क्षमता कमी होते.परिणामी एकूण तापमान वाढ, त्वचेचे कॅन्सर आणि पुढे दृष्टिहीनता असे वाईट परिणाम उद्भवतात.अशी भीती वर्तवण्यात आली आहे की पुढच्या चाळीस वर्षांमध्ये सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

४) वाढती लोकसंख्या: मर्यादित संसाधने आणि वापरकर्त्यांची वाढती संख्या यामुळे पृथ्वी आणि तिच्या नैसर्गिक संसाधनांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास १० जणांच्या स्वयंपाकामध्ये १५ लोकं जेवणासाठी असणार.त्यामुळे अर्थातच लोकांना उपलब्ध होणाऱ्या संसाधनांचा दर्जा कमी होऊ शकतो आणि मग त्यातूनच पुन्हा एकदा प्रदूषणाला आमंत्रण मिळते.

जश्या समस्या आहेत तसे काही चांगले पाऊलं सुद्धा सरकार, एनजीओ आणि लोकं यांच्या समन्वयातून वेळोवेळी घेतले गेले आहेत.

१) २०२१ च्या फॉरेस्ट सर्व्हे रिपोर्टनुसार पूर्वीच्या परिस्थितीत सुधारणा होऊन आता देशात ८०.९० दशलक्ष हेक्टर जंगले व झाडे आहेत. हे प्रमाण देशाच्या भौगोलिक प्रदेशाच्या २४.६२% टक्के एवढे आहे.(तरी हे प्रमाण ३३% एवढे असणे अपेक्षित आहे )

२) महाराष्ट्र शासनाने ‛माझी वसुंधरा' या उपक्रमांतर्गत जनतेत ‛बदलते वातावरण आणि नागरिकांची जबाबदारी' याविषयी जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. यात पंचमहाभूते (अग्नी,पृथ्वी,पाणी,हवा,आकाश) तत्वांना प्राधान्य देऊन शाश्वत विकासाची संकल्पना मांडली आहे.

३) मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‛सह्याद्री देवराई' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षरोपणाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.‛मी आणि माझे' या मर्यादेच्या पलीकडे जाऊन निसर्गासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचा महत्वपूर्ण संदेश यातून दिला गेला आहे.

 सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो ?

• ३ R चे पालन - रिड्यूस( कमी करणे), रीयुज (पुनर्वापर), रिसायकल

• कमीत कमी एक झाड लावणे

• सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे

• पाण्याची बचत करणे

• इतरांमध्ये जनजागृती आणि निसर्गासाठी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणे

महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की , ' या पृथ्वीवर प्रत्त्येकाची गरज पूर्ण करण्यासाठीची संसाधने उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही'! गांधीजींचं हे वाक्य लक्षात ठेवूयात आणि आपल्या कृतीतून खऱ्या अर्थाने या वसुंधरेचे आदर्श पाईक होवूयात !

 

- योगेश भानुदास पाटील.

ybpatil1999@gmail.com

English Summary: Let's be the ideal pike of the planet! Published on: 13 May 2022, 08:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters