माशीफळमाशीएकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनइतर उपायकीडनाशकांचा वापर करताना कलिंगड, खरबूज, काकडी ही पिके कीड व रोगास फारच संवेदनशील आहेत. या पिकांवर भुरी, केवडा व मर हे रोग आणि नागअळी, फुलकिडे व फळमाशी या किडींचे वेळीच नियंत्रण आवश्यक आहे. फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.
मर
15-21 दिवसांनंतर - या रोगाचे दोन प्रकार आहेत. एक बुरशीमुळे होणारी फ्युजारियम मर व दुसरा जिवाणुमुळे होणारी मर. फ्युजारियम मर या रोगाचा प्रादुर्भाव केवळ कलिंगडामध्येच होतो. तर जिवाणूजन्य मरचा प्रादुर्भाव काकडी व खरबुजामध्ये जास्त दिसून येतो. फ्युजारियम मर या रोगग्रस्त खोडाचा मधोमध उभा काप घेतल्यास खोडाच्या लांबीला समांतर तपकिरी रंगाची रेष (उतीचा थर) दिसते. लागवडीनंतर 21-25 दिवसांनी वेलाची एक बाजू वाळते व संपूर्ण पीक नाहीसे होऊ शकते. जिवाणूजन्य मर रोगग्रस्त खोडातून दुधासारखा चिकट द्रव स्रवतो.
केवडा
दमट हवामानात केव्हाही - हा सुद्धा बुरशीजन्य रोग असून खूपच हानिकारक आहे. दमट हवामानात याची लागण व वाढ खूप जोमाने होते. पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यावर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके ठराविक आकारापेक्षा जास्त वाढत नाही. परंतु मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरतात. यामुळे पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.
भुरी
40-50 दिवसांनंतर - हा बुरशीजन्य रोग असून केवड्याप्रमाणे हाही खूपच नुकसानकारक आहे. यामध्ये पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरीसारखे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात.
फुलकिडे
10 दिवसानंतर - नियंत्रणाच्या दृष्टीने ही कीड सर्वांत तापदायक आहे. किडीची मादी माशी पानांवर अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले व प्रौढ कीटक पाने, फुले व क्वचित खोड व फळे यामधील रस शोषून घेतात.
पांढरी माशी
12 दिवसानंतर - या किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. प्रौढ पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात व पाने व फुलांतील रस शोषतात. त्यामुळे फुले गळतात. या किडीमधून एक चिकट द्रव स्रवतो, त्यावर बुरशी वाढते.
फळमाशी
40-50 दिवसांनंतर - खरबूज व कलिंगड या दोन फळांसाठी ही कीड अतिशय हानिकारक आहे. किडीची मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात. त्यामुळे फळे कुजतात व त्याचा घाणेरडा वास येतो.
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
फवारणी (लागवडीनंतर 25 दिवसांनी )
मर रोगाच्या नियंत्रणासाठी- कॉपर ऑक्झिक्लोराईड (50 टक्के ईसी) 2.5 ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे.
चौथी फवारणी (लागवडीनंतर 35 दिवसांनी) प्रति लिटर पाण्यासाठी मात्रा
केवडा रोग- मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम किंवा झायनेब (72 टक्के डब्ल्यूपी) 4 ग्रॅम.
फळमाशीच्या नियंत्रणासाठी- एन्डोसल्फान दीड मि.लि.
पाचवी फवारणी (लागवडीनंतर 45 दिवसांनी) प्रति लिटर पाण्यासाठी मात्रा
भुरीच्या नियंत्रणासाठी- प्रोपिनेब (70 टक्के डब्ल्यूपी) 1.5 ग्रॅम मि.लि. किंवा पेनकोनॅझोल (10 टक्के ईसी) 1 मि.लि.
फुलकिडे, फळमाशीच्या नियंत्रणासाठी- प्रति लिटर पाण्यासाठी मात्रा
एन्डोसल्फान (35 टक्के ईसी) 1.5 मि.लि. किंवा ट्रायझोफॉस (40 टक्के ईसी) 1 मि.लि.
इतर उपाय
मागील पिकांचे अवशेष नष्ट करावेत व पिकांची फेरपालट करावी.
पीक नेहमी तणमुक्त ठेवावे.
रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.
पूर्वी जर हे पीक मर रोगास बळी पडले असेल तर त्या जमिनीत पुढील पाच वर्षे हे पीक घेऊ नये.
पिकांवरील नुकसानीची लक्षणे लक्षात घेऊन कोणती कीड वा रोग आहे याची खात्री तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्यावी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाचे उपाय योजावेत.
या पिकांवर करपा, विषाणूजन्य रोग तर नागअळी, पट्टेदार भुंगे यांचाही प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार होतो. त्यांचाही अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय योजावेत.
कीडनाशकांचा वापर करताना
पीक उत्पादनासाठी जमिनीची निवड, बियाणे, बीजप्रक्रिया यापासून ते काढणी, साठवणूक, पॅकिंग इत्यादीपर्यंतच्या सर्व गोष्टींच्या सविस्तर व तपशीलवार नोंदी ठेवाव्यात.
केंद्रीय कीटकनाशक मंडळाने परवाना दिलेली सर्व कीडनाशके बाजारात उपलब्ध आहेत; परंतु कोणत्याही कीडनाशकांचा सर्व पिकांवर वापर करणे योग्य नाही. कीडनाशकांसोबत जे माहितीपत्रक असते, त्यावर कीडनाशक कोणत्या पिकावर,
केव्हा, कशासाठी व किती प्रमाणात वापरावे, वापरताना व वापरल्यानंतर काय सावधानता बाळगावी याची माहिती अनेक भारतीय भाषांमध्ये दिलेली असते. प्रत्येक शेतकऱ्याने ही माहिती अवश्य वाचून तिचे काटेकोर पालन केले पाहिजे.
कीडनाशकांच्या मात्रा व दोन फवारणीतील अंतर प्रमाणित शिफारशीनुसार ठेवले, तर अवशेष मर्यादा योग्य राखता येतील.
फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा. रासायनिक कीडनाशकांचा वापर पिकाच्या सुरवातीच्या काळात करावा. फलधारणा आणि काढणीच्या काळामध्ये गरज पडल्यास वनस्पतिजन्य व जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
फळे आणि भाजीपाला पक्व व काढणीयोग्य झाल्यानंतर फवारणी करू नये; परंतु फवारणी करणे अटळ झाल्यास पर्याप्त काढणीपूर्व कालावधी उलटल्यानंतरच फळांची तोडणी करावी. ज्या कीडनाशकांचा काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी कमी दिवसांचा आहे त्यांची फवारणी जरुरीप्रमाणे उशिरा करण्यास हरकत नाही; परंतु ज्यांचा काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी जास्त आहे अशी कीडनाशके पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळातच फवारावीत.
कीडनाशकांची निवड करताना शिफारस केलेली, कमी मात्रांमध्ये अधिक परिणामकारक कीडनियंत्रण करणारी, मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानिकारक असलेली कीडनाशके निवडावीत.
पीक संरक्षणाच्या सर्व उपलब्ध पद्धतींचा सुयोग्य ताळमेळ घालून रासायनिक कीडनाशकाचा नियंत्रित व माफक वापर करावा.
Share your comments