1. कृषीपीडिया

गव्हाची उशिरा पेरणी

बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास 30 टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने एकंदरीतच गहू लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
wheat

wheat

बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास 30 टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने एकंदरीतच गहू लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे.

बागायत उशिरा पेरणीची शिफारसही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही शेतकरी 15 डिसेंबर नंतरही गव्हाची  पेरणी करतात. वास्तविक 15 नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते.

हवामान:

गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी 25 अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.

गव्हाचे वाण आणि पेरणी:

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी निफाड 34 (एनआयएडब्लू-34), एकेएडब्लू-4627 किंवा फुले समाधान एनआयएडब्लू 1994 या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाढ्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने 18 से.मी. अंतरावर पेरावे. पेरणी करतेवेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (40:40:40) म्हणजेच 87 किलो युरिया, 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. उर्वरित नत्राचा हप्ता 87 किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी दयावा.

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात बागायती वेळेवर (15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर) पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान (एनआयएडब्लू 1994) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. वेळेवर पेरणीखाली उत्पन्न 46.12 क्विंटल प्रति हेक्टर तर उशिरा पेरणीखाली उत्पन्न 44.23 क्विंटल/हेक्टर मिळते. तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम. टपोरे व आकर्षक दाणे, हजार दाण्याचे वजन 43 ग्रॅम, प्रथिनांचे प्रमाण 12.5 ते 13.8 टक्के, चपातीची प्रत उत्कृष्ठ व प्रचलित वाणांपेक्षा सरस, प्रचलित वाणांपेक्षा 9 ते 10 दिवस लवकर येतो.

बीजप्रक्रिया:

गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम  प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम अॅझोटोबॅकटर व 250 ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.

पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 से.मी खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

तण व्यवस्थापन:

बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यानी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.
हेही वाचा:प्रक्रिया उद्योग : केळीपासून बनवा चिप्स अन् बरंच काही…

पाणी व्यवस्थापन:

जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (15 दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी दयावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने शेवटचे पाणी 80 ते 85 दिवसा दरम्यान दयावे. बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.

जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी गव्हास पाणी दयावे. दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी दयावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी 20 ते 22, दुसरे 42 ते 45 व तिसरे 60 ते 65 दिवसांनी दयावे. अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे उत्पादन घ्यावे.

डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
डॉ. राहुल कडू (कनिष्ठ संशोधन सहयोगी)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
9404032389

English Summary: Late Sowing of Wheat Published on: 20 November 2018, 05:45 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters