शहरातील सांडपाण्यात बरीच पोषक द्रव्ये असतात. परंतु ते जसेच्या तसे जमिनीस देता येत नाही. कारण त्यामध्ये असलेले सूक्ष्मजंतू जमिनीत जातात तसेच जमिनीच्या छिद्रांमध्ये सांडपाणी अडकून छिद्रे बंद होतात आणि जमीन नापीक बनते. यासाठी सांडपाणी वापरण्यापूर्वी त्याच्यावर विशिष्ट क्रिया करणे आवश्यक असते [→ वाहितमल].
मेंढरे बसविणे : भारताच्या काही भागांत खतासाठी शेतात शेळ्यामेंढ्या बसविण्याची पद्धत आहे. सामान्यत: उन्हाळ्यातच मेंढरे बसविण्यात येतात. सु. १,००० जनावरे एक रात्रभर शेतात बसविल्यास त्या शेताला दोन टन खत दिल्यासारखे होते. शेळ्यामेंढ्यांच्या लेंड्या झटपट वाळतात. त्यामुळे त्यांमधील नायट्रोजन अमोनियाच्या रूपात निघून जात नाही. पावसाळा सुरू झाला म्हणजे या लेंड्या कुळवाने जमिनीत मिसळवून घेतात. या पद्धतीत शेळ्यामेंढ्यांनी खाल्लेल्या अनेक प्रकारच्या तणांचे बी लेंड्यातून शेतात पडून तणांची वाढ होते.
राख : भारतात अद्यापही राखेचा उपयोग खत म्हणून करण्यात येतो. गुऱ्हाळे, चुली इत्यादींमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांपासून मिळणारी राख यासाठी वापरतात. या राखेतून फॉस्फरस व पोटॅश प्रामुख्याने मिळतात. आंबा, पेरू, अननस यांसारख्या फळझाडांकरिता खत म्हणून ही राख वापरतात.
संहत स्वरूपाची भरखते : पेंड हे या प्रकारचे खत होय. जी पेंड जनावरांना अखाद्य आहे अशीच पेंड खत म्हणून वापरतात. यातून जमिनीला नायट्रोजन मिळतो. सर्वसाधारणतः पेंड दिल्यावर तिचे जमिनीत अपघटन होते व ७–१० दिवसांत पोषक द्रव्ये मिळू शकतात. मोहवाच्या पेंडीचे अपघटन होण्यास दोन महिने लागतात. घाण्याच्या पेंडीपेक्षा गिरणीतील पेंडीचे लवकर अपघटन होते. नांगरण्यापूर्वी काही दिवस आधी पेरणीच्या वेळी वा पीक उगवल्यावर पेंड दिली जाते. पेंडीपासून ४–७% नायट्रोजन मिळतो. भारतात सु. ७–८ लक्ष टन अखाद्य पेंड खतासाठी वापरतात. सर्वसाधारणतः पेंड ऊस, कापूस, भाजीपाला व फळझाडे यांसाठीच वापरली जाते. खाद्य पेंडही खत म्हणून काही वेळी वापरली जाते.
खाटीकखान्यात मारण्यात येणाऱ्या जनावरांपासून मिळणारे रक्तखत किंवा वाळलेले रक्त हे पेंडीप्रमाणेच खत म्हणून वापरतात. ते सर्व प्रकारच्या पिकांना व जमिनींना चालते. ते जमिनीत जलद मिसळते. त्यात १०–१२% नायट्रोजन व १–२% फॉस्फोरिक अम्ल असते.
हाडांचा चुरा खत म्हणून वापरल्यास फॉस्फेटे भरपूर प्रमाणात मिळतात. ताजी हाडे चुरा करून वापरल्यास त्यातील वसेमुळे (स्निग्ध पदार्थांमुळे) जमिनीमध्ये त्यांचे अपघटन होण्यास विरोध होतो. यासाठी हाडे उच्च दाबाखाली वाफारून किंवा विद्रावक–निस्सारणाने (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या साहाय्याने वेगळे करण्याच्या प्रक्रियेने) त्यातील वसा वेगळी करतात आणि नंतर हाडे दळतात. हाडांच्या चुऱ्यात नायट्रोजन असल्यामुळे तो खनिज फॉस्फेटापेक्षा खत म्हणून अधिक चांगला असतो. ज्या जमिनीत सेंद्रीय पदार्थ भरपूर आहेत अशा अम्लीय जमिनीत हाडांचा चुरा खत म्हणून वापरतात.
मत्स्यखत हे सुकविलेले मासे किंवा त्यांचा चुरा ह्या स्वरूपात वापरतात. त्यात ४–१०% नायट्रोजन व फॉस्फोरिक अम्ले असतात. ती जमिनीत जलद मिसळतात. सर्व पिकांना व जमिनीत ती वापरता येतात.
काही वेळा मासे न सुकविता त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करतात व तेच ओलसर स्थितीत खत म्हणून विकले जाते. सल्फ्यूरिक अम्लामुळे माशांमधील फॉस्फेटाचे सुपरफॉस्फेट बनते व ते सडत नाहीत.
ग्वानो हे खत पक्षी, मासे इत्यादींचे अपशिष्ट असून त्याचा खत म्हणून बऱ्याच देशांत फार पूर्वीपासून उपयोग करण्यात येत आहे [→ ग्वानो].
कोंबड्यांच्या खुराड्यात कोंडा वा लाकडाचा भुस्सा पसरतात. त्यामध्येच कोंबड्या मलविसर्जन करतात. असा कोंडा किंवा भुस्सा खत म्हणून वापरला जातो. त्यामध्ये नायट्रोजन २%, फॉस्फेट १·२५% व पोटॅश ०·७५% असतात. भारतात काही ठिकाणीच असे खत गोळा करतात.
Share your comments