1. कृषीपीडिया

जाणून घेऊया कीटकांविषयी माहिती

प्रौढ कीटकापासून पुन्हा प्रौढ कीटकाची निर्मिती या दरम्यानचा कालावधी आणि निरनिराळ्या अवस्था म्हणजे कीटकांचे जीवनचक्र. ही जीवनचक्रे विविध प्रकारची असतात

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घेऊया कीटकांविषयी  माहिती

जाणून घेऊया कीटकांविषयी माहिती

कीटकांमध्ये काही ठळक अपवाद सोडले तर लिंगे भिन्न असतात. कीटकांच्या बहुतेक माद्या, काही अपवाद सोडल्यास फलनानंतर अंडी घालतात. मात्र, काही कीटक अंडी घालण्याऐवजी लहान पिल्लालाच जन्म देतात. उदा., मावा कीटकाची मादी अंडी न घालता अर्भकांना जन्म देते. अशा जननास जरायुजता असे म्हणतात.

मैथुनानंतर माद्या अंडी घालतात. ती अतिशय लहान असून सुटीसुटी, निरनिराळ्या असतात. काही अंडी अलगअलग घातलेली असतात तर काहींचे पुंजके असतात. झुरळ, खंडोबाचा घोडा यांसारख्या कीटकांत अंडी पिशवीत म्हणजे अंडसंपुटात घालती जातात. माद्यांची अंडी घालण्याची क्षमताही भिन्न असते. अंडी घालणार्‍या कीटकांच्या काही जातींत मादी हिवाळ्यात केवळ एकच अंडे घालते, तर वाळवीची राणी प्रतिसेकंदास एक याप्रमाणे हजारो अंडी घालते. पिकाचे नुकसान करणार्‍या किटकांच्या माद्या एका वेळी १०० ते ४०० अंडी घालतात. अंड्यांतून बाहेर पडल्यानंतर कीटकांची वाढ होते.

कीटकविज्ञानाच्या अभ्यासकांनी कीटकांच्या वाढीचे अरूपांतरण आणि रूपांतरण असे प्रकार केले आहेत.

अरूपांतरण : आदिम गणातील प्रारंभिक पंखहीन कीटकांची वाढ होत असताना जननेंद्रिये व बाह्य जननांगे यांच्या विकासाशिवाय कोणतेही स्थित्यंतर होत नाही. सामान्यपणे, कीटकांमध्ये अंडे, अळी, कोष आणि प्रौढ कीटक अशा विकासाच्या अवस्था असतात. अरूपांतरण वाढीच्या प्रकारात अंड्यातून बाहेर पडणारा कीटक म्हणजे लघुरूपी प्रौढ कीटक असतो. त्याची वाढ होऊन प्रौढ कीटक तयार होते. उदा., कसर.

रूपांतरण :

अंड्यातून बाहेर पडल्यानंतर कीटकांची क्रमश: वाढ होऊन त्यांच्या शरीरात स्थित्यंतरे घडून येतात. अशा निरनिराळ्या अवस्थांमधून कीटकांच्या होणार्‍या विकासाला रूपांतरण म्हणतात. रूपांतरणाचे अथवा कीटकांच्या जीवनचक्राचे मुख्यत: दोन प्रकार आहेत: अर्धरूपांतरण आणि पूर्णरूपांतरण. अर्धरुपांतरण या प्रकारात कीटकाची वाढ अंडे, कुमारावस्था आणि प्रौढावस्था या क्रमाने होते, तर पूर्णरुपांतरण प्रकारात कीटकाची वाढ अंडे, अळी, कोशावस्था आणि प्रौढावस्था या क्रमाने होते.

अर्धरूपांतरण :

याला अपूर्ण जीवनचक्र असेही म्हणतात. अपूर्ण जीवनचक्रात अंडे उबविले की, त्यातून पिलू बाहेर पडते. या पिलामध्ये जननेंद्रियाची आणि पंखांची पूर्ण वाढ झालेली नसते. यास कुमारावस्था म्हणतात. या पिलाचे वैशिष्टय असे की, त्याचे रुप हुबेहूब त्याच्या जनकासारखे असते. आकाराने मात्र ते खूप लहान असते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमार आणि प्रौढ आई-वडिलांचे खाद्य सारखेच असते. प्रौढावस्था येण्यासाठी त्याला तीन किंवा चार वाढीच्या अवस्थांमधून जावे लागते. प्रत्येक वेळेला कात टाकली जाते.

कात टाकणे म्हणजे शरीरावरील बाह्य त्वचा निघून जाते. या क्रियेला निर्मोचन म्हणतात. एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जात असताना शरीराची आकाराने वाढ होते. तसेच पंखांचीही वाढ होते. चौथी अवस्था पूर्ण होत असाताना पंखांची आणि पोटाच्या मागील खंडभागातील जननेंद्रियाची वाढ पूर्ण झालेली असते. शेवटची कात टाकली गेली की कुमार प्रौढावस्थेत जातो. चतुर, नाकतोडा, झुरळ, खंडोबाचा घोडा, पान-ढेकूण इत्यादींमध्ये अपूर्ण जीवनचक्र असते.

पूर्णरूपांतरण :

पूर्णरुपांतरणाला परिपूर्ण जीवनचक्र असेही म्हणतात. परिपूर्ण जीवनचक्रात अंडे उबवले की, त्यातून डिंभ किंवा अळी बाहेर पडते. या अळीचा आकार आणि रूप आई-वडिलांपेक्षा भिन्न असतो. खाद्यही वेगळे असते. ही अळी चार-पाच अवस्थांतून जाते. प्रत्येक अवस्थेनंतर कात टाकली की, अळीची लांबी-रूंदी आणि वजन वाढत जाते. शेवटच्या अळी अवस्थेची पूर्तता होण्याआधी अळी खाणे थांबविते आणि एका जागी स्थिर होते. काही अळ्या (फुलपाखरे, रेशमाचा किडा) लाळेपासून रेशीमधागा बनवून स्वत:च्या शरीराभोवती गुंडाळतात आणि कोष तयार करून कोषावस्थेत जातात. काही अळ्या (काही पतंग आणि डास) आपल्या शरीराच्या बाह्य आवरणातच कोषावस्थेत जातात.

कोषात अळीचे संपूर्ण परिवर्तन होऊन प्रौढ कीटक बाहेर पडतो. फुलपाखरू, रेशमाचा किडा, मधमाशी, मुंग्या इत्यादींमध्ये परिपूर्ण जीवनचक्र असते.

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

bondes841@gmail.com

9404075628

English Summary: Know about some insect information Published on: 31 December 2021, 04:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters