1. कृषीपीडिया

जाणून घ्या नांगरणीशिवाय शेती

प्रताप चिपळूणकर हे गेली ४० वर्षे शेती करत आहेत. शेतीविषयातले ते पदवीधर आहेत, आणि त्यांचा सूक्ष्मजीवशास्त्राचाही अभ्यास आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या नांगरणीशिवाय शेती

जाणून घ्या नांगरणीशिवाय शेती

प्रताप चिपळूणकर हे गेली ४० वर्षे शेती करत आहेत. शेतीविषयातले ते पदवीधर आहेत, आणि त्यांचा सूक्ष्मजीवशास्त्राचाही अभ्यास आहे. प्रामुख्याने ऊस आणि भात ही पिके ते घेतात. त्यांचा अभ्यास आणि शेतीतले अनुभव या दोन्हीच्या आधारे नांगरणीशिवाय शेती पद्धतीविषयी त्यांनी या पुस्तकात माहिती दिलेली आहे. पुस्तकातील लेख आधी ऍग्रोवनमध्ये लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध झालेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी द्विरुक्ती दिसते, पण संवर्धित शेतीविषयी बरीच माहिती या पुस्तकामधून मिळते. हे पुस्तक आणि प्रताप चिपळूणकरांचं एक व्याख्यान या दोन्हीमधून मिळालेली / मला समजलेली माहिती इथे एकत्र दिली आहे.

 (Resource conservation technology) संवर्धित शेतीचा भर प्रामुख्याने गरजेपुरती नांगरणी किंवा नांगरणीशिवाय शेती यावर असतो. माणसाच्या किंवा शेतीच्या इतिहासामध्ये नांगराचा शोध, पशूंकडून नांगरणी, लाकडाऐवजी लोखंडी नांगराचा वापर हे प्रगतीचे टप्पे मानले गेलेले आहेत.

पूर्वमशागत जितकी चांगली, जितकी खोल नांगरट तितकं उत्तम पीक हा विचार इतक्या काळापासून रुजलेला आहे. नांगरणी कमी करणे हा विचार विसाव्या शतकात प्रथम पुढे आला. रासायनिक खतांचा वापर, यंत्रांच्या वापरामुळे जमीन कठीण बनणे आणि जमिनीची धूप ही यामागची मुख्य कारणे होती. १९६० मध्ये शून्य मशागतीवर पेरणीचे यंत्र विकसित होणे आणि तणनाशकांचा उपयोग करून तण नियंत्रण हे दोन शोध लागल्यानंतर व्यापारी तत्त्वावर शून्य मशागतीचे प्रयोग प्रत्यक्ष शेतांमध्ये सुरू झाले. भारतामध्ये हे तंत्र खर्‍या अर्थाने वापरात आले ते १९९६ नंतर. खरीप भाताची काढणी झाल्यावर जमीन नांगरून मग गहू पेरणी होईपर्यंत खूप वेळ जाऊन गव्हाला थंडीचा काळ कमी मिळाल्याने उत्पन्न घटत होते, त्यामुळे पेरणीपूर्वी मशागत न करता, भाताचे काड तसेच ठेवून पेरणी करणारी यंत्रे विकसित केली गेली. पुढे या यंत्रांमध्ये अनेक सुधारणा झाल्या. हे तंत्र वापरतांना त्याचे अनेक फायदे लक्षात आले. फक्त भातानंतर गव्हाचे पीक लवकर घेता यावे म्हणूनच ही पद्धत वापरावी असे नाही, तिचे इतरही अनेक फायदे आहेत.

शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावर अनेक मर्यादा पडतात. बाहेरून उचलून हे खत शेतात आणून टाकणे जिकिरीचे आणि महाग पडते. त्याऐवजी आधीच्या पिकाचे काड, मुळांचा भाग असे बरेचसे अवशेष शेतातच ठेवून ते शेततच कुजू दिले, तर त्यापासून कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चात उत्तम खत जागेवरच मिळते. त्यातही चिपळूणकर यांचा अनुभव असा, की उसाचे निव्वळ पाचट कुजवले तर जे खत मिळते, त्यापेक्षा खोडकी आणि मुळे (तोडणीनंतर जमिनीत राहणारा भाग) कुजवल्यावर मिळालेले खत अधिक चांगल्या दर्जाचे असते.

त्यांनी झाडाच्या कुजणार्‍या भागांचे ३ गटात वर्गीकरण केले आहे. पाने, कोवळे देठ असे सेल्युलोजपासून बनलेले भाग हे कुजण्यास हलके, हेमीसेल्युलोजपासून बनलेला देठाचा भाग हा मध्यम कुजणारा, तर लिग्निनपासून बनलेला बुंधा आणि मुळे हा कुजण्यास जड भाग. वनस्पतीचा घटक कुजण्यास जितका जास्त जड, तेवढा तो जमिनीच्या सुपीकतेसाठी फायदेशीर असतो. वेगळ्या भाषेत चिपळूणकर असं सांगतात, की झाडाचा जो भाग जाळून जास्त ऊर्जा मिळते, तोच भाग कुजून जमिनीला जास्त सुपीकता मिळते. कुजायला जड पदार्थ बुरशी कुजवते. कुजायला हलके पदार्थ जीवाणू कुजवतात. लवकर कुजवणारे, मध्यम कुजवणारे, जड कुजवणारे अशा सर्व प्रकारच्या जीवांना जमेनीत खाद्य मिळाले तर जमिनीत जैविक सुपीकता येते. सहज कुजवणारे सूक्ष्मजीव जी कणरचना निर्माण करतात, ती पाण्यात अस्थिर असते, पाण्यामुळे ती कणरचना सहज बदलते आणि योग्य निचरा होत नाही. याउलट जड पदार्थ कुजवणारे सूक्ष्मजीव जी कणरचना निर्माण करतात, ती पाण्यात स्थिर राहते.

जमिनीखाली कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, तेंव्हा सेंद्रीय पदार्थ कुजवणारे जीवाणू कुजणार्‍या पदार्थातील अन्नद्रव्यांबरोबरच त्या परिसरात उपलब्ध असणारी सर्व अन्नद्रव्ये स्वतःच्या वाढीसाठी वापरतात, आणि यामुळे तिथे वाढणार्‍या झाडांच्या मुळांना जीवाणूंशी स्पर्धा करावी लागते, पीकाची उपासमार होते. सेंद्रीय पदार्थ पूर्ण कुजल्यावर मगच पीकाला पुरेशी अन्नद्रव्ये मिळू शकतात. रोटाव्हेटरने नांगरणी केली, तर सेंद्रीय पदार्थाचे बारीक तुकडे होऊन मातीत मिसळतात, कुजण्याची प्रक्रिया भरभर होते, आणि कुजवणार्‍या जीवाणूंची वेगाने वाढ झाल्याने पीकाच्या उपासमारीचा धोका वाढतो. त्यामुळे जमिनीखालची मुळे शक्यतो जमिनीखालीच सावकाश कुजू द्यावीत. पिकाचे तुकडे वरच्यावर करून त्याचे आच्छादन करावे. मुळांना धक्का न लावल्यास ती कुजण्याचा वेग अतिशय मंद राहतो आणि पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत राहतात.

- प्रताप चिपळूणकर

English Summary: Know about plough free farming Published on: 18 January 2022, 01:17 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters