वर उल्लेखिलेल्याशिवाय अमोनिया ॲनहायड्रस (८२% नायट्रोजन), द्रवरूप अमोनिया (२५% नायट्रोजन), अमोनिया क्लोराइड-कॅल्शियम कार्बोनेट (१५% नायट्रोजन), अमोनियम नायट्रेट-अमोनिया (३७–४१% नायट्रोजन), कॅल्शियम नायट्रेट (१५·५% नायट्रोजन), कॅलुरिया (कॅल्शियम नायट्रेट-यूरिया, ३४% नायट्रोजन), यूरिया-अमोनिया विद्राव (३३·५–४५·५% नायट्रोजन), यूरिया-फॉर्माल्डिहाइड (३८% नायट्रोजन) इ. रसायनांचा वापर खत म्हणून करतात.
फॉस्फरसयुक्त खते : नायट्रोजनयुक्त खतांनंतर किंवा तितक्याच महत्त्वाच्या खतांचा म्हणजे फॉस्फरसयुक्त खतांचा क्रम लागतो. ह्या खतांमधील फॉस्फरसाचे प्रमाण फॉस्फरस पेंटॉक्साइडामध्ये (P2O5) व्यक्त करण्यात येते. ह्या खतांमुळे वनस्पतींच्या वाढीस उत्तेजन मिळते, रोगप्रतिकारास मदत होते, रोपे जोरात येतात, लवकर व जलद बहर येतो. फॉस्फरस वनस्पतींच्या जीवद्रव्यात (पेशीतील जीवनावश्यक जटिल द्रव्यात) आढळतो. सर्व वनस्पती फॉस्फरस HPO4–– किंवा H2PO4– ह्या ऋण विद्युत् भारित आयनाच्या (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या) स्वरूपात शोषून घेतात.
फॉस्फरसयुक्त खते ही फॉस्फेटाच्या स्वरूपातील असून ती पाण्यात विद्राव्य, अमोनियम सायट्रेटात विद्राव्य आणि पाण्यात अविद्राव्य अशा तीन प्रकारची असतात. पाण्यात विद्राव्य असणाऱ्या खतांत मोनोकॅल्शियम फॉस्फेट [CaH4(PO4)2] हे प्रमुख होय. हे सुपरफॉस्फेट, तिहेरी सुपरफॉस्फेट व अमोनियम फॉस्फेट यांमध्ये असते. मोनोअमोनियम फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट आणि मोनोपोटॅशियम फॉस्फेट हीदेखील पाण्यात विद्राव्य आहेत. पाण्यात अविद्राव्य पण अमोनियम सायट्रेटात विद्राव्य अशा फॉस्फेटात डायकॅल्शियम फॉस्फेट, धातुमळी (क्षारकीय), कॅल्शियम व पोटॅशियम मेटाफॉस्फेट, हाडांच्या चुऱ्याचा काही भाग यांचा समावेश होतो. पाण्यात अविद्राव्य अशा फॉस्फेटांत खनिज फॉस्फेट, हाडांचा चुरा यांमधील ट्रायकॅल्शियम फॉस्फेटाचा समावेश होतो.
सुपरफॉसस्फेट : सल्फ्यूरिक अम्लाची खनिज फॉस्फेटावर विक्रिया करून सुपरफॉस्फेट तयार करतात. विक्रियेनंतर तयार होणाऱ्या मोनोकॅल्शियम फॉस्फेट, जिप्सम इत्यादींच्या मिश्रणास सामान्य सुपरफॉस्फेट किंवा नुसतेच सुपरफॉस्फेट असे म्हणतात. त्यातून १६–२०% फॉस्फरस उपलब्ध होतो. ही खते ५·५ पेक्षा कमी pH [अम्लता व क्षारकता दर्शविणारे मूल्य, → पीएच मूल्य] असलेल्या अम्लीय जमिनींसाठी वापरत नाहीत. ती क्षारीय जमिनींसाठी वापरतात.
इ. स. १८४२ मध्ये लॉझ यांनी खनिज फॉस्फेट व सल्फ्यूरिक अम्ल यांच्यापासून प्रथम सुपरफॉस्फेट तयार केले. सध्या ते गुहा (डेन) पद्धतीने व दाणेदार सुपरफॉस्फेट पद्धतीने तयार करतात. गुहा पद्धतीत खनिज फॉस्फेट बारीक दळून क्षोभकयुक्त मिश्रकात नेतात. त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करतात. नंतर सर्व माल काँक्रिटाच्या प्रचंड गुहांमध्ये नेऊन ६–२४ तास ठेवून सुपरफॉस्फेट बनविण्याची विक्रिया पूर्ण करतात. नंतर तो गुदामात ८–१० आठवडे विक्रिया पूर्ण होण्यासाठी ठेवतात व मग विक्रीस पाठवितात.
दाणेदार सुपरफॉस्फेट तयार करण्यासाठी ‘ऑबरफॉस’ पद्धत प्रथम वापरली गेली. ती अद्यापिही ब्रिटन व कॅनडामध्ये वापरली जाते. इतरत्र सध्या ‘डेव्हिसन’ पद्धत वापरतात. गुहा पद्धतीतील गुहांमध्ये माल येईपर्यंत तीत व डेव्हिसन पद्धतीत साम्य आहे. डेव्हिसन पद्धतीत नंतर सर्व माल दाणे बनविण्याच्या फिरत्या यंत्रातून पाठवून तयार झालेले दाणे फिरत्या शुष्ककाने (सुकविण्याच्या उपकरणाने) सुकवितात व गुदामात ८–१० आठवडे सर्व माल विक्रिया पूर्ण होण्यासाठी ठेवतात. या पद्धतीत विक्रिया जास्त तापमानावर होत असल्यामुळे लवकर पूर्ण होते.
सुपरफॉस्फेट करड्या रंगाचे असून ते कोरडे व चूर्णरूप असते. काही वेळा ते ओलसर असून त्यास अम्लीय वास येतो. पावसापूर्वी किंवा पाणी देण्यापूर्वी सुपरफॉस्फेट दिल्यास ते जमिनीतील ओलाव्याने विद्राव्य होते. पाण्याशी संबंध आल्यावर ते वाहून जात नाही. सुपरफॉस्फेटची वाहकता मंद असल्यामुळे ते उपरिवेशन पद्धतीने देण्यास योग्य नाही.
तिहेरी सुपरफॉस्फेट : ह्यामध्ये सामान्य सुपरफॉस्फेटाच्या तिप्पट म्हणजे ४५–५०% फॉस्फरस असतो. हे खनिज फॉस्फेट व फॉस्फोरिक अम्ल यांच्या विक्रियेने तयार करतात. यामुळे जिप्सम न बनता मोनोकॅल्शियम फॉस्फेट बनते. खनिज फॉस्फेटात कार्बनी पदार्थ नसणे आवश्यक असते व फॉस्फोरिक अम्ल ६२% चे वापरतात. विक्रिया पूर्ण होण्यास ३०–४० दिवस लागतात. हे दाणेदार स्वरूपातही तयार केले जाते.
क्षारकीय धातुमळी : लोहनिर्मितीतील एक उप-उत्पादन. लोह खनिजात जो फॉस्फरस असतो तो मळीच्या स्वरूपात वेगळा करून (जटिल स्थितीत) दळून लोहविरहित करून खत म्हणून वापरतात. यूरोपमध्ये अद्यापही याचा उपयोग खत म्हणून केला जातो. जपानमध्ये मात्र १९५७-५८ पासून त्याचा वापर बंद केला आहे. धातुमळी काळसर तपकिरी चूर्णरूप असून ती जड असते. भारतात मात्र अशा धातुमळीतील फॉस्फरसाचे प्रमाण कमी असल्यामुळे (३–८%) तिचा वापर कमी आहे. सामान्यतः तीत १७–२०% फॉस्फरस असतो. धातुमळी वापरताना ती जमिनीत मिसळली गेली की नाही हे पाहणे जरूर असते.
अमोनियायुक्त सुपरफॉस्फेटे : सुपरफॉस्फेटामध्ये साधारणपणे २% मुक्त अम्ल असते. त्यामुळे पोती कुजतात, लोखंडाशी संपर्क आल्यास ते गंजते, जमिनीची अम्लता वाढते इ. दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी सुपरफॉस्फेट तयार झाल्यावर त्यात सजल अमोनिया मिसळून मुक्त अम्लाचे उदासिनीकरण करतात. अशा सुपरफॉस्फेटाला अमोनियायुक्त सुपरफॉस्फेट असे म्हणतात. अमोनियीकरणासाठी सजल अमोनिया वापरल्यास सुपरफॉस्फेट दाणेदार स्वरूपात मिळविता येते. साधारणपणे ४०–८०% सजल अमोनिया वापरतात
अमोनियीकरणाने सुपरफॉस्फेटामध्ये २·५–३·३% नायट्रोजन येतो. हे प्रमाण वाढविण्यासाठी सजल अमोनियात यूरिया किंवा अमोनियम नायट्रेट मिसळतात आणि नायट्रोजनाचे प्रमाण १०% पर्यंत वाढविता येते. अमोनियीकरणात अमोनिया जास्त वापरला गेला, तर विद्राव्य फॉस्फेटाचे रूपांतर अविद्राव्य फॉस्फेटात होते.
खनिज फॉस्फेट : खनिज फॉस्फेटाचा उपयोग सुपरफॉस्फेट इ. खते बनविण्यासाठी केला जातो. परंतु ते तसेच अतिसूक्ष्म चूर्णाच्या स्वरूपात खत म्हणूनही वापरले जाते. यातून २०–४०% फॉस्फरस मिळतो. अम्लीय व ह्मूमसाचे प्रमाण जास्त असलेल्या व जिच्यात फळझाडे, चहा, कॉफी यांसारखी पिके घेतात अशा जमिनींकरिता खनिज फॉस्फेट वापरतात.
कॅल्शियम मेटाफॉस्फेट : एका टाकीत फॉस्फरस जाळून त्यात खनिज फॉस्फेटाचे बारीक कण सोडून हे खत तयार केले जाते. यात ६४% फॉस्फरस असतो. यातून हायड्रोफ्ल्युओरिक अम्ल उपपदार्थ म्हणून मिळते. ह्या खताच्या निर्मितीस खर्च जास्त येतो.
ऊष्मीय फॉस्फेटे : जर्मनीत खनिज फॉस्फेट, दाहक सोडा व वाळू फिरत्या भट्टीत तापवून तापपीडित फॉस्फेट हे खत तयार करतात. हे जटिल खत असून त्यातील सो़डियम कॅल्शियम फॉस्फेट हे संयुग पाण्यात अविद्राव्य पण सायट्रेटात विद्राव्य असते.
जपान-अमेरिकेत खनिज फॉस्फेट सर्पेंटाइन किंवा ऑलिव्हीन यांच्याबरोबर विद्युत् भट्टीत वितळवून ‘थर्मोफॉस’ नावाचे खत तयार करतात. यात १९–२४% फॉस्फरस असतो. हे सायट्रेटात विद्राव्य आहे.
Share your comments