बुऱ्हाणपूर. तापी नदीचा किनाऱ्यावर वसलेल एक ऐतिहासिक शहर. ह्या शहराचे प्रथमतः नाव ऐकताच मनात इतिहासातील ऐका धड्याची आठवण झाली. मुघल साम्राज्याचे प्रवेशद्वार म्हणजे बुऱ्हाणपूर. छत्रपतींचा आग्रा भेटी दरम्यान ह्याच गावातून महाराज आणि त्यांचा सैन्याने प्रयाण केले होते. सुर्यादेवाचा सुवर्ण कृपेने हा बुऱ्हाणपूरचा बलाढ्य किल्ला आणि त्याचे विशाल बुरुज आणखीनच सुंदर दिसतात. प्रवास करते वेळेस तिथली जमीन,पीक पद्धती आणि वातावरणाचा अंदाज घेतल्यावर अस वाटत होतं की जणु काय आपण विदर्भात आलो आहोत. बुऱ्हाणपूरचा पूर्वेला विदर्भ आहे,पश्चिमेला खानदेश आणि उत्तरेला मध्य प्रदेश. इथे केळी, कपाशी, तुर, सोयाबीन आशा पिकांची लागवड केली जाते.तरीही केळीचा चाहत्यांची संख्या खुप आहे.इथे नजर जाईल तिथपर्यंत केळी आणि फक्त केळीच.
केळीचा शेतीकडे बघितल्यावर बऱ्याच गोष्टी नवीन वाटू लागल्या. इथ केळीची रोपं खुप उंच वाढतात आणि त्यांचा बुंधाही लहान असतो. थोडं आणखी निरखून बघितल्यास अस जाणवलं की दोन झाडांमधील अंतर खुप कमी आहे.
इथे पाच फूट × पाच फुटावर केळीची लागवड केली जाते. आमचा शेती मध्ये आम्ही सहा फूट× सहा फूट किंवा पाच फूट दोन झाडांमधील अंतर ठेवतो. त्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळते आणि झाडाचे मुख्य अन्न सुर्यप्रकाशावर प्रत्येक झाडाला ताव मारता येतो.आमचा भागात झाडांचा बुंधाही मोठा असतो. जेवढा झाडाचा बुंधा मोठा तेवढा चांगला घड पडणार. दोन झाडांमध्ये पुरेसे अंतर दिल्यामुळे ऐका झाडास चाळीस किलो किंवा तीस पस्तीस किलोचा घड मिळवणे सोपे जाते.इथे झाडांची दाटी एवढी होते की तीन ते चार महिन्यानंतर त्यामध्ये फवारणी करणे अशक्य होते. घडांची निसवण झाल्यास पानांवर करपा किंवा सिगाटोका आला की पीक राम भरोसे. त्याच ठिकाणी जर हे अंतर ६×६ किंवा ५ फूट ठेवले तर शेवट पर्यंत पिकावर फवारणी करणे शक्य होते.
ह्या भागात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे रासायनिक खतांचा वारेमाप वापर केला जातो. एकरी लाख रुपयाचा हप्ता प्रति वर्ष रासायनिक खतांचा गाव गुंडास द्यावा लागतो. एवढा खर्च आणि त्यामानाने उत्पादन फक्त २५टन/एकर. २५टन उत्पादन निघण्यासाठी आम्ही फक्त पंचवीस हजार खर्च करायचो.
रासायनिक खतांचा अतिवापरामुळे सांगली आणि कोल्हापूरचा हजारो हेक्टर जमिनी नापीक झाल्या आहेत.रासायनिक खते मोजूनमापून न वापरल्यास जो आमचा वर्तमानकाळ आहे तो तुमचा भविष्यकाळ ठरू शकतो. एवढ्या वारेमाप रासायनिक खतांचा वापर होतो , पण शेणखताची दखलही घेतली जात नाही. शेणखताची किंमत खूप आहे असे ही नाही. फक्त बुऱ्हाणपूर नाही तर सर्व शेतकऱ्यांचे एकच गणित चुकते ते म्हणजे खतांवर आपण जे पैसे खर्च करतो त्यातील सर्वाधिक पैसे रासायनिक खतांवर केले जातात. त्याचा ना त्या पिकाला फायदा होतो,ना त्या शेतजमिनीला फायदा होतो. वाढत्या उत्पादन खर्चाचा बोज्याखाली शेतकरी दबून जातो. काही शेतकरी आठवड्याला एक पोटॅशचे पोते ठिबक मधून सोडतात.जिथे आम्हास पाच किलो पुरेसे होते तिथे दर आठवड्याला एक गोणी रिक्त केली जाते. खतांवर होणाऱ्या खर्चाचे तीन भाग असावेत आणि तिन्हींचे हिस्से समप्रमाणात असावेत. आपण जर शंभर रुपये खर्च करणार असू तर त्यातील फक्त ₹३३.३३/- हे रासायनिक खतांवर खर्च करावेत, ₹३३.३३/- रुपयांचा दुसरा भाग हा शेणखतास खर्च करावा आणि तिसरा आणि शेवटचे ₹३३.३३/- हे जिवाणू खते,जीवामृतास खर्च करावेत. हा समतोल राखल्यास शेतीही शाश्वत होऊन जाईल.जमिनीचा ढासळणाऱ्या पोताला सशक्त आधार मिळेल.
शेतामध्ये सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे इथे जमीन दगडासारखी घट्ट आहे. अर्ध्या फुटाखाली इथे आपण नांगर लावू शकत नाही.जिवाणू व मित्रबुरशींचा अभावामुळे इथे सिगाटोका आणि करपा बुरशींना मोकळे रान आहे. त्यांना पोषक वातावरण मिळाल्यास ह्या बुरशींचा प्रकोप सुरू होतो.आणि दोन झाडांमधील अंतर कमी असल्यामुळे फवारणीही करणे जवळपास अशक्य होते.
आज केळीने नीचांकी दर मिळवला आहे.त्याच वेळी खतेही भाव खात आहेत. आता आपल्याला पूर्वीसारखे खतांवर वारेमाप पैसे खर्च करून आपली शेती शाश्वत होणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे खुप गरजेचे आहे. खतांचा आंधळा वापर करण्यापेक्षा दिलेल्या खतांमधील किती प्रमाणात झाडाला उपलब्ध झाली ह्यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करूनही पिकावर मॅग्नेशियमची कमतरता दिसत असेल तर जमीनीचा आरोग्याचा दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.
Share your comments