फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. काट्यांसारखी अनेक टोके असतात. त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गऱ्यामध्ये एक बी असते. तिला आठोळी म्हणतात.
फणसाला इंग्रजीमध्ये जॅक फ्रुट असे म्हणतात. फणसाची लागवड महाराष्ट्रातील कोकण भागात होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकारमानाने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.
फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
१.बारका
बारका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात. कोकणात या प्रकारच्या फणसाचा रस काढून तो तांदळाच्या रव्यात मिसळून सांदणे हा गोड पदार्थ करतात.
२. कापा
कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बारक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.
आता माघार नाही ! दिवसा विजेसाठी 'स्वाभिमानी' न्यायालयात...
फणसाचे आरोदायी फायदे
• फणसामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशिअम ,सोडियम,आणि लोह असे खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
• कॅल्शिअमने हाडे बळकट होतात. पोटॅशिअम भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
• तसेच व्हिटॅमिन अ ,ब , के, क ,फॉलीक ऍसिड, नायसिन आणि व्हिटॅमिन बी ६ सुद्धा अधिक असते.,.
• लाल पेशींना चालना देणारे मॅगनीज ,मॅग्नेशिअम आणि कॉपर यात असल्याने ऍनिमियाचा त्रास आटोक्यात येतो .
• व्हिटॅमिन क युक्त असल्याने नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारायला मदत होते.
• फणसामध्ये डाएटरी फायबर्स आणि पाण्याचे प्रमाणहि मुबलक असते. यामुळेच पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
• फणसामध्ये अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो
फणस प्रक्रिया
• फणस नाशवंत असल्याने त्यावर प्रक्रिया केली तर बहूमुल्यवर्धीत उत्पादने घेता येतात. फणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून श्रीखंड, सुकवलेले फणस, रस पेय ,खाकरा ,जॅम, जेली, फणसपोळी, स्क्वॉश आणि पल्प इत्यादी बनविण्याच्या प्रकिया उद्योगास संधी आहेत.
• फणसाच्या गरापेक्षा बीमध्ये अधिक प्रमाणात पोषकतत्त्वे असतात. फणसाचे बी उकडून किंवा भाजून खातात. बिया वाळवून पीठ करून विविध पदार्थात वापरतात. यापासून उपवासाची शेव, चकली, कटलेट, थालीपीठ, रोजच्या आहारातील पोळी असे अनेक मूल्यवर्धित पदार्थ करता येतात.
• फणसाच्या ७५ टक्के पक्व गरापासून वेफर्स, तसेच लोणचे असे टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.
फणस श्रीखंड
साहित्य : दही, फणसाचा पल्प , साखर, वेलची
कृती :
• दही सुती किंवा मलमलच्या कापडामध्ये बांधून ६ ते ८ तास टांगून ठेवावे.
• त्यातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर आपल्याला चक्का मिळेल.
• चक्क्यामध्ये ६० ते ७० टक्के बारीक केलेली साखर मिसळावी. (१ किलो चक्क्यासाठी ५०० ते ७०० ग्रॅम साखर हे प्रमाण चक्क्याच्या आम्लतेनुसार कमी जास्त करावे.)
• साखर, वेलची आणि चक्का चांगला एकजीव करून घ्यावे नंतर त्यामध्ये १५ टक्के फणस पल्प मिसळावा.
• अशाप्रकारे फणस श्रीखंड खाण्यास तयार आहे . फणस श्रीखंडाला प्लास्टिक कंन्टेनरमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवावे.
आनंदाची बातमी : आता सोने तारण ठेवून मिळणार शेतीसाठी कर्ज
फणस जॅम
साहित्य : १ किलो पिकलेल्या फणसाचे गरे, १ ते सव्वा किलो साखर, १० ते १२ ग्रॅम सायट्रिक अॅसिड, १० ग्रॅम पेक्टीन प्रति किलो, खाण्याचा पिवळा रंग आवश्यक असल्यास.
कृती:
• प्रथम पिकलेल्या फणसाचे गरे घेऊन त्यात थोडे पाणी घालून मऊ होईपर्यत शिजवून घ्यावेत.
• नंतर हा पल्प एका बारीक गाळणीतून गाळून घ्यावा.
• एक स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात वरील पल्प शिजवण्यास ठेवावा.
• त्यात हळूहळू वरीलप्रमाणे साखर,पेक्टीन थोड्या पाण्यात एकत्र करून मिसळून घ्यावे. व सायट्रिक अॅसिड मिसळून सारखे ढवळत राहावे
• मिश्रण ६८ ते ७० टक्के होईपर्यंत सातत्याने ढवळत राहावे.
• हा जॅम ८२ ते ८५ अंश सेल्सिअस तापमान असताना जारमध्ये भरून, हवाबंद करावा.
• हे जार सामान्य तापमानापर्यंत थंड करावेत.
४६ कारखान्यांची धुराडी बंद; शिल्लक ऊसाचे काय?
सुकवलेले फणस
कृती:
• बिया काढलेल्या गऱ्यांचे दोन किंवा चार तुकडे करावेत.
• उकळत्या पाण्यामध्ये २ मिनिटांसाठी बुडवून ब्लांचिंग करावे.
• त्यानंतर लगेच गार पाण्यामध्ये थंड करावेत.
• ट्रेमध्ये एक थरामध्ये एकमेकांना स्पर्श न होता ठेवावेत.
• ड्रायरमध्ये ५५ अंश सेल्सिअस तापमानाला ते ७-८ तास ठेवावेत.
• त्यातील पाण्याचे प्रमाण ५ टक्क्यापर्यंत कमी झाल्यानंतर आर्द्रतारहित बाटल्यामध्ये भरून हवाबंद करावेत. त्यासाठी पॉलीप्रोपॅलीन पाऊच वापरता येतात.
लेखक
कु.सोनाली सिद्धार्थ सावंत,
सहाय्यक प्राध्यापिका,
तंत्रज्ञान अधिविभाग (अन्न तंत्रज्ञान विभाग),
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, ७०२०१२१२९३.
Share your comments