रखरखत्या उन्हात या लिंबू पाण्याचा प्रत्येक घोट कसा सुखावणारा वाटतो. मला आठवतंय काहीच महिन्यांपूर्वी अगदी 10 रुपयाला 4-5 लिंबं तरी विकत घेता यायची. पण आता हे काही शक्य नाही. कारण ऐन उन्हाळ्यात लिंबं भयंकर महाग झाली आहेत. पण असं का झालंय? याची मुख्य कारणं काय? आणि या दरवाढीचा शेतकऱ्यांना किती फायदा होतोय आणि कुणा-कुणाला फटका बसतोय? याचबद्दल जाणून घेऊयात.
आपण महागाईबद्दलच बोलतोय तर सुरुवातीला महाराष्ट्रात सध्या लिंबाचे भाव काय आहेत ते पाहुयात पण हे दर फक्त एका लिंबाचे दर आहेत.
तर सध्या मुंबईत एक लिंबू 8 ते 15 रुपयाला मिळतंय. तेच नाशिकमध्ये 10 ते 12 रुपयांना एक लिंबू विकत घेता येतंय, कोल्हापुरात एका लिंबासाठी 8 ते 10 रुपये मोजावे लागत आहेत. नागपुरात 10 रुपयाला एक तर पुण्यात एक लिंबू 8 ते 10 रुपयांना मिळतंय.
कधी विचार तरी केला होता का की एक लिंबू इतकं महाग होईल?
लिंबांचं उत्पादन एक शेतकरी वर्षातून 3 वेळा घेऊ शकतो. हे तुम्हालाही माहिती असेलच पण असं जरी असलं तरी लिंबाला सगळ्यांत जास्त मागणी उन्हाळ्यातच असते. लोकांना लिंबू हे उन्हाळ्यातच खायला आवडतात आणि म्हणूनच या सीझनमधील उत्पादन हे अत्यंत महत्त्वाचं असतं.
मग आत्ताच लिंबाचे दर असे अचानक का वाढलेत?
तर याचं पहिलं कारण आहे सध्या कमालीचं वाढलेलं तापमान. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश या लिंबू उत्पादक राज्यांत सध्या पारा कमालीचा चढला आहे. या तापमानामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं, उभी राहिलेली पीकं खराब झाली. एवढंच नाही तर गुजरातमध्ये नुकतंच वादळानं धुमाकूळ घातला या वादळामुळेही लिंबाच्या पीकाला चांगला फटका बसला आहे.
यातच या दर वाढीचं दुसरं कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या वाढलेल्या किमती. पेट्रोल-डिझेल महाग झाल्यानं वाहतुकीचा खर्च वाढलाय. हा खर्च वाढल्यानं भाजीपालासुद्धा महाग झालाय.
आणि तिसरं कारण आहे मागणी आणि पुरवठ्याचं बिनसलेलं समीकरण. अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे लिंबाचं उत्पादन घटलं पण असं असलं तरी मागणी मात्र तशीच आहे. या मागणीमुळेच फेब्रुवारी महिन्यात 50-60 रुपयाला मिळणारी लिंबं आता चक्क 200 ते 250 रुपयांच्या घरात पोहोचली आहेत असं म्हटलं जातंय.
शेतकऱ्यांना याचा किती फायदा?
आता तुम्ही म्हणाल यात शेतकऱ्याचा फायदाच आहे मग, तर सध्या लिंबाचं सगळ्यात जास्त उत्पादन आंध्र प्रदेशात होतंय, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि तामिळनाडूचा नंबर लागतो. अर्थात देशभरातून जवळजवळ 37.17 लाख टन लिंबाचं उत्पादन दर वर्षी घेतलं जातं. या वाढलेल्या दरामुळे शेतकरी थोडासा खुश झाला आहे.
या दरवाढीचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला, त्यातच महाराष्ट्रातील बार्शीत राहाणारे आणि लिंबाची शेती करणारे विजय खेतमाळी यांनी आम्हाला सांगितलं की, “यंदा लिंबाला सर्वाधिक दर मिळतो आहे. आतापर्यंत 200 रुपये प्रती किलो इथपर्यंत हा दर गेला आहे. पावसामुळे आणि उष्णतेमुळे नुकसान तर झालंय. मात्र मागणीही तितकीच वाढली आहे. त्यामुळे कमी उत्पादन जरी झालं तरी वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी आपलं नुकसान टाळू शकणार आहे.”
सध्या लिंबाचे भाव चढलेत पण मे महिन्यात जेव्हा नवं पीक येईल तेव्हा हे दर परत कमी होतील अशी आशा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करतायत. पण त्यासाठी उन्हाचा पारा कमी होणंही तितकंच गरजेचं आहे.
खरंतर हाच सिझन असतो जेव्हा आपल्याला लिंबू सरबत प्यायची सगळ्यांत जास्त इच्छा असते. पण नेमका आत्ताच हा भडका उडालाय. पण सोशल मीडियावर मात्र मीम्स आणि कार्टून्सचा पाऊस पडलाय.
Share your comments