1. कृषीपीडिया

मका व ज्वारीवरील नवीन लष्करी अळीची ओळख

KJ Staff
KJ Staff


नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव सध्या मका व ज्वारी या पिकावर जास्त प्रमाणात आढळून येत आहे. ही कीड नवीन असल्यामुळे शेतकरी बांधवांनी ओळखता येणे थोडेसे अवघड जाते. तसेच या किडीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होण्याची क्षमता खूप जास्त आहे व ही बहुभक्षी, खादाड असल्यामुळे या किडीकडे विशेष लख देण्याची गरज आहे. त्याकरीता वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

 • ओळख :

पतंग : नर पतंगाचे समोरचे पंख करडया व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. मादी पतंगाचे समोरचे पंख पूर्णपणे करड्या रंगाचे असतात. नर-मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरी असतात. पतंग निशाचर असून संध्याकाळी मिलनासाठी जास्त सक्रिय असतात.

 

अंडी : अंडी पुंजक्यात घातली जातात. अंडी घुमटाच्या आकाराची, मळकट पांढरी ते करडया रंगाची असतात. ही  अंडीपुंज केसाळ आवरणाने झाकलेली असतात.

अळी : पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ सें.मी. लांब असते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळया रंगाच्या तीन रेषा असतात. डोक्यावर उलटया इंग्रजी Y अक्षरासारखे चिन्ह असते तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. तसेच शरीरावर काळे ठिपके असतात. मागच्या बाजुने दुस–या वलयावर चौरसाच्या आकारात चार काळे ठिपके असतात.

कोष : कोष सुरुवातीला हिरवट असून नंतर लालसर तपकिरी रंगाचे असतात.

 

 • जीवनक्रम : मादी पतंग पानावर पुंजक्यामध्ये अंडी घालते. एका पुंजक्यात १०० ते २०० अंडी असतात. एक मादी ८०० ते १२०० अंडी घालते. अंडयातून २ ते ३ दिवसात अळया बाहेर निघतात. अळीची वाढ १४ ते ३० दिवसात पूर्ण होते व जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ ते १२ दिवसाची असते. पतंग जवळपास ७ ते १२ दिवस जगतात. अशाप्रकारे ३२ ते ४६ दिवसामध्ये एक जीवनक्रम पूर्ण होतो.
 • नुकसानीचा प्रकार : नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका व ज्वारी पिकावर सर्व अवस्थेत आढळून येतो. या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान करते. सुरुवातीच्या अवस्थेतील अळया पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसून येतात. मोठया अळया पाने कुरतडून खातात त्यामुळे पानांना छिद्रे पडलेली दिसतात. अळी ही पोंग्यामध्ये शिरुन आत भाग खाते. पानांना छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठा दिसून आल्यास या अळीच्या प्रादुर्भाव आहे असे समजावे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास ४० ते ७० टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
 • एकात्मिक व्यवस्थापन :
 • हंगाम संपल्यावर पिकाचे अवशेष वेचून त्यांची विल्हेवाट लावावी.
 • जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील कोष प्रखर सुर्यप्रकाशाची उष्णतेने मरुन जातील किंवा पक्षी वेचून खातील.
 • पेरणी एकाच वेळी करवी. टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी व पिकाची फेरपालट करावी.
 • मित्र कीटकांचे संवर्धन करावे. मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते.
 • शेत तणमुक्त ठेवावे. रासायनिक खताचा जास्त वापर करने टाळावा.
 • पीक ३० दिवसापर्यंतचे असल्यास बारीक वाळू किंवा बारीक वाळू व चून्याचे ९:१ प्रमाण करून पोंग्यात टाकावे.
 • अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
 • सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत तसेच सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करण्यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.

 

 • या किडीचे नैसर्गिक शत्रु जसे परोपजिवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलेनोमस, चिलोनस) व परभक्षी कीटक यांचे संवर्धन करावे.
 • ट्रायकोग्रामा प्रीटीओसम या गांधीलमाशीने परोपजीवीग्रस्त अंडी १.२५ लाख प्रति हेक्टरी शेतामध्ये ३ वेळा १५ दिवसाच्या अंतराने सोडावे.
 • ५ % प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ५ % निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फ़वारणी करावी.
 • मेटा–हायजियम अॅनिसोप्ली ५० ग्रॅम किंवा नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • रासायनिक कीटकनाशके :
 • बीजप्रक्रिया : स्यानट्रानिलीप्रोल १९.८% + थायामिथॉक्झाम १९.८% या मिश्र कीटकनाशकाची ६ मिली / किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
 • विषारी आमिषाचा वापर करावा यासाठी १० किलो साळीचा भुसा व २ किलो गुळ २-३ लिटर पाण्यात मिसळून २४ तास सडण्यासाठी ठेवावे. वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये १०० ग्रॅम थायोडीकार्ब ७५ डब्ल्युजी मिसळावे. हे विषारी आमिष पोंग्यामध्ये टाकावे.
 • १०-२० % प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी ५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ % डब्ल्युअजी ४ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ % एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

   रासायनिक किटकनाशकाची फवारणी करताना काय काळजी घ्यावी

 • एकाच रासायनिक किटकनाशकाची फवारणी हंगामात दोनपेक्षा जास्त वेळा करु नये.
 • चारा पिकावर रासायनिक किटकनाशकाची फवारणी टाळावी.
 • एकात्मिक कीड व्यवस्थापनाकडे जास्त भर दयावा.

लेखक- 

डॉ. राजरतन खंदारे            डॉ. सारिका टिमके                   डॉ. अनंत बडगुजर

       संशोधन सहयोगी             पीएच.डी. विद्यार्थिनी                 सहायक प्राध्यापक

    (मो.नं. 8275603009)      (मो.नं. ८४५९९५००८१)          (मो.नं. 7588082024) 

कृषि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters