1. कृषीपीडिया

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन

KJ Staff
KJ Staff


राज्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने, बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भागात बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे, अशा भागात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, तर काही शेतकरी कांदा काढणीनंतर, ऊस तोडणीनंतर गव्हाच्या पेरणीच्या तयारीत आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करण्याची शिफारस केली आहे. पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी येते.त्यामुळे 15 डिसेंबर नंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. तरी देखील खरीपातील कांदा, ऊस काढणीनंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यामुळे कांद्याची रोपे फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. जीत्राबाला जगवावे कसे असा प्रश्न त्यास पडला आहे. त्या अनुषंगाने पाण्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेख गव्हाचे पाणी व्यवस्थापन व आंतरमशागत कसे करावे याबाबत आहे.   

पाणी व्यवस्थापन:

भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी 15 दिवसाच्या अंतराने 7 पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस 10-12 दिवसाच्या अंतराने 8 ते 10 पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर होणारे परिणाम खाली नमूद केले आहेत.

 • मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर 21-25 दिवसांनी):
  या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात गहू काढणीस लवकर येतो व उत्पादनात घट येते.

 • फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर 55-60 दिवसांनी):
  ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.

 • पीक फुलोऱ्यात येणे (पेरणी नंतर 70-80 दिवसांनी):
  परागीभवन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते.

 • दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर 90-100 दिवसांनी):
  या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.

 • दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर 100 दिवसांनी):
  या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.

ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी दयावे.

 • एकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर 21-25 दिवसांनी दयावे.
 • दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी व दुसरे 55-60 दिवसांनी दयावे.
 • तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 55-60 दिवसांनी तर तिसरे 70-80 दिवसांनी दयावे.
 • चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 55-60 दिवसांनी तर तिसरे 70-80 दिवसांनी दयावे तर चौथे पाणी 90-100 दिवसांनी दयावे.
 • पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 40-45 दिवसांनी तर तिसरे 55-60 दिवसांनी, चौथे पाणी 70-80 दिवसांनी तर पाचवे 90-100 दिवसांनी दयावे.
 • अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे, त्या क्षेत्रात नेत्रावती, एन आय 5439 व एच डी 2189 या वाणांचे पेरणी करण्याचे नियोजन हंगामाच्या सुरुवातीला करणे आवश्यक आहे. अशा रीतीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन करावे.

आंतरमशागत:

पेरणी नंतर 21-30 दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकाची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकाचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो. गव्हात चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागती मुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

गहू पिकातील अरुंद पानांचे आणि रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी दर हेक्टरी आयसोप्रोटयुरॉन (50%) दोन ते तीन किलो किंवा मेटासल्फूरॉन मेथाईल (20%) हेक्टरी 20 ग्रॅम  किंवा 2-4-डी (सोडियम) अधिक 2% युरिया 600 ते 1,250 ग्रॅम 600 ते 800 लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्या नंतर 10 ते 12 दिवस पाणी देवू नये. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. तसेच फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा पॉवर स्प्रे वापरू नये.

खुरपणी नंतर द्या उर्वरित नत्राची मात्रा

 • बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे 21-30 दिवसांनी) प्रती हेक्टरी 60 किलो नत्र (130 किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रती हेक्टरी 40 किलो नत्र (87 किलो युरिया) द्यावा.
 • पीक 55 ते 70 दिवसांचे असताना 19:19:19 या विद्राव्य खताची दोन टक्के या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. (10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम 19:19:19)
 • दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (10 लि.पाण्यात 200 ग्रॅम युरिया)

डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
9404032389

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters