1. कृषीपीडिया

बटाटा पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन; संपुर्ण किडींची माहिती

बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र २१ लाख हेक्टर असून उत्पादन ५१३१० मिलियन टन आहे. देशाच्या मानाने महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र ११.०९ लाख हेक्टर एवढेच असून उत्पादनही कमी आहे. भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे.

KJ Staff
KJ Staff

बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र २१ लाख हेक्टर असून उत्पादन ५१३१० मिलियन टन आहे.  देशाच्या मानाने महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र ११.०९ लाख हेक्टर एवढेच असून उत्पादनही कमी आहे. भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मुळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश , बिहार , पश्चिम बंगाल , पंजाब आणि आसाम या राज्यात बटाट्याची लागवड प्रामुख्याने होते. बटाट्याखालील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्यापेक्षा अधिक क्षेत्र या पाच राज्यातील आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे , सातारा , अहमदनगर , नाशिक , बीड , नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात लागवड केली जाते.  बटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक असून  आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा वापर केला जातो .  बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ' ब ' आणि ' क ' जास्त प्रमाणात असते . तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात.  त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे .  हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास अल्पावधित अधिक पैसा मिळवून देऊ शकते.

हेही वाचा : आता बटाटा लागवड होणार जलद; महिंद्रा कंपनीने लॉन्च केले बटाटा लागवडीचे यंत्र

 

बटाटा पिकावर मुख्य किडी मावा , फुलकिडे , तुडतुडे , पांढरीमाशी , कोळी , तसेच हेलीकोव्हर्पा , स्पोडेप्टेरा , देठ कुरतडणारी अळी कट वर्म , बटाट्यावरील पाकोळी आणि हुमणी. किडीच्या प्रादुर्भाव  अधिक असतो.

महत्वाच्या किडी :-

 मावा :-

या कीटकांच्या अनेक जाती या पिकावर नोंदवीलेल्या आहेत.  त्यापैकी मायझस परसिकी , अफिस फ्यबी , अफिस गोसीपी या महत्वाच्या जाती आहेत. ही कीड पानांच्या खालच्या बाजूवर राहून रस शोषून घेतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानेखाली मुरडतात.प्रथमतः पिवळी पडतात व नंतर गळून जातात. ही कीड विषाणूजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करते. मावा किडीच्या शरीरातून चिकट स्राव पानांवर पसरून त्यावर बुरशी वाढते.  प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊन पर्यायाने उत्पादनात घट येते.

 

तुडतुडे

तुडतुडे


तुडतुडे
:-

बटाटा पिकावरील आम्रस्का बीगुटूला बीगुटूला, इंपोयासका केरी, इंपोयासका फ्यबी आणि इंपोयासका सोलानीफोलिया या जातीची तुडतुडे आढळतात.  तुडतुडे पानातील शिरेच्या जवळ राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने वाकडी होऊन पिवळी पडतात.  हवेत आर्द्रता जास्त असल्यास याकिडीचे प्रमाण वाढते. कीटक , विषाणूपासून होणाऱ्या रोगाचा प्रसार करतात.  त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा विषाणू रोगपासून होणारे नुकसान फार होते.

फुलकिडे :-

या किडीचे प्रौढ , तसेच पिल्ले झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर विशेषतः न उमललेल्या पानात आढळतात फुलकिडे पानांचा पृष्ठभाग खरडून निघणारा अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानांवरील भागावर पिक्कट पिवळसर हिरवे, तर खालील बाजूस तांबडे चट्टे पडतात.  नुकसान ग्रस्त पाने जाडसर आणि वक्र होतात.  तीव्र प्रादुर्भावाने झाडांची वाढ खुंटते व कधी - कधी झाडे पूर्णपणे वाळतात. .

पांढरी माशी

पांढरी माशी

पांढरीमाशी :-

प्रौढ व पिल्ले पानातील रसशोषण करतात. या किडीच्या शरीरातून चिकट स्त्राव पानांवर पसरुन त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो .

. कोळी : -

कोळी ही कीड अतिशय सूक्ष्म असून, ती पानांचा पृष्ठभाग खरवडून येणारा रस शोषण करते.  त्यामुळे पानावर पांढुरे चट्टे पडतात. प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे काळपट पडून चकाकतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग सुकून वाळतो.  झाडाची वाढ खुंटते , पानावर हे कीटक रेशमी धाग्याने जाळी तयार करतात. उत्पादनात फार मोठी घट येते.

तंबाखूचे पाने खाणारी अळी ( स्पोडोप्टेरा ) :-

अळ्या दिवसा जमिनीत लपून राहतात, रात्रीच्या वेळी बटाटा पिकाची पाने खाऊन फस्त करतात. अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. काही वेळेस या अळ्या जमिनीत पोसणारे बटाटे देखील पोखरून खातात, त्यामुळे उत्पादनात घट येते.

 

देठ कुरतडणारी अळी (कट वॉर्म) :-

अळी काळपट रंगाची असून , तिला स्पर्श होताच वेटोळे करून मातीत पडते. अळी रात्रीच्या वेळी रोपांचे देठ जमिनी जवळ कुरतडून टाकते, कोवळी पानेखाते . त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर मरतात. रोपची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते . ३०-५० टक्कयापर्यंत होते .

. बटाटा पोखरणारी अळी (पोटेटो ट्यूबर मोथ ) :- ही कीड जगभर आढळून थोरमिया औपेरिकूलेला या नावाने ही कीड जगभरात ओळखली जाते.  अळ्या पानात , देठात तसेच कोवळ्या खोडात शिरुन ते पोखरुण खातात. जमिनीतील उघड्या पडलेल्या बटाट्यांवर मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरतात व बटाटे पोखरतात. अळ्या गराच्या आत किंवा खाली बोगदे पाडतात. त्यांची विष्टा डोळे व अंकुराजवळ दिसते . त्यामुळे बटाट्याचे वजनात घट यते , बटाट्याची प्रत सुद्धा खराब होते. प्रादुर्भाव झालेले बटाटे खाण्यासाठी निरुपयोगी ठरतात. शेतातील बटाट्याचे ३० ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होते .

. हुमणी :-

या किडीची अळी अवस्था ही पिकास अत्यंत हानीकारक आहे. अळ्या जमिनीत राहून पसरणाऱ्या बटाट्यांवर , तसेच बटाट्यांच्या मुळांवर आपली उपजीविका करतात.  पिकांच्या मुळांचा नाश झाल्यामुळे पीक सुकू लागते व नंतर मरुन जाते . प्रादुर्भाव ग्रस्त बटाटे सडतात.

 


बटाटा
पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन :

  1. बटाटे लागवडीपूर्वी कीड विरहित व निरोगी असलेले बटाट्याचे बियाणे निवडावे म्हणजे शेतात किडींचे प्रमाण वाढणार नाही .
  2. उगवणी नंतर येणाऱ्या रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी बटाटे बियाणे लागवडी पूर्वी इमिडाक्लोप्रिड (१७.८% एस.एल.) चार मि.लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून १० मिनिटे प्रक्रिया करावी व नंतर लागवड करावी .
  3. शिफारशीनुसार योग्य अंतरावर लागवड करावी .
  4. शेतकऱ्याने रोग प्रतिकारक जातींचीच लागवड करावी .
  5. आठवड्यातून २ ते ३ दिवसांतून पिकाचे पाहणी करावी .
  6. पिकांमध्ये तसेच कडेने सापळा पिके लावावीत .
  7. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतात पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा .
  8. पोकोळी , स्पोडेप्टेरा , देठ कुडतडणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी पिकास वेळेवर भर द्यावी .
  9. कामगंध सापळ्यांचा वापर करावा . उदा . पाकोळी , स्पोडोप्टेरा , देठ कुडतडणारी अळी .
  10. रस शोषणाऱ्या किडी विषाणुजन्य रोगांचा प्रसार करीत असतात. त्यामुळे पीक उगवणीनंतर झाडांची कोवळी पाने आणि शेंडेयांवर वेळेवर लक्ष ठेवून शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी .
  11. पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पीक उगवल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव होतो. आर्थिक नुकसान पातळीनुसार स्पायरोमायसीफेन (२२.९ ई.सी.) १० मि.लि. किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यू.जी.) ४ किंवा डायमिथोएट (३० टक्के ) १५ मि.ली. यांपैकी एका कीटकनाशकाची १० लीटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार आलटून पालटन फवारणी करावी .
  12. बटाट्यावरील अळी वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये एकरी ६ ते ७ पक्षी थांबे उभारावेत .
  13. पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा आणि देठ कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतात गवताचे लहान-लहान ढीग रात्रभर ठेवावेत . सकाळी अळ्यांसह गवताचे ढीग नष्ट करावेत .
  14. पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळींचे अंडीपुंज दिसल्यास नष्ट करावेत .
  15. पाने पिवळी पडल्यास अथवा पाने जाळीदार धरलेली असल्यास अशा पानांवर अळीपुंज असतात . ते नष्ट करावेत .
  16. पाने खाणाऱ्या स्पोडेप्टेरा अळीसाठी बुरशीजन्य कीटकनाशक न्यूमोरिया रीलाय ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
  17. अळी वर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस (२० इ.सी.) २० मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस (५० इ.सी.) दोन मि.ली. किंवा लॅम्बडासायलोथ्रीन (५ इ.सी.) ६ मि.लि. यांपैकी एका कीटकनाशकाची १० लीटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार आलटून पालटून फवारणी करावी .

 लेखक 

)  सहा.प्रा. श्री. रुपेशकुमार ज. चौधरी

      (वनस्पती रोगशास्त्र विभाग,)

      केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय, चामोर्शी, गडचिरोली.

)  श्री. आशिष विजय बिसेन  

       (वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग)

       भा.कृ.अनु..- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.
                                               

English Summary: Integrated pest management on potato crop Published on: 03 October 2020, 05:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters